पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संबंधित मंत्रालयांबरोबर कोविड -19 संदर्भात स्थितीचा घेतला आढावा
Posted On:
07 MAR 2020 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2020
पंतप्रधानांनी कोरोना विषाणूसंबंधी स्थितीचा आणि विविध मंत्रालयांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आज सकाळी आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे , कॅबिनेट सचिव राजीव गौबा, नीती आयोगाचे सदस्य डॉ विनोद के पॉल, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि आरोग्य, औषधी, नागरी उड्डाण, परराष्ट्र व्यवहार, आरोग्य संशोधन, गृह, नौवहन, एनडीएमएचे सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांनी कोविड-19 संबंधित सज्जता आणि प्रतिसादाबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सहाय्यक मंत्रालयांनी केलेल्या उपाययोजना आणि सद्यस्थिती यावर सादरीकरण केले. सादरीकरणात प्रवेशाच्या ठिकाणी देखरेख ठेवण्याच्या प्रमुख बाबींवर तसेच समुदाय, प्रयोगशाळा सहाय्य, रुग्णालयांची तयारी, वाहतूक आणि जोखीम यावर भर देण्यात आला.
औषध विभागाच्या सचिवांनी औषधांचा पुरेसा साठा, अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल साहित्य (एपीआय) आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या अन्य वस्तूंबद्दल माहिती दिली.
सर्व विमानतळ, बंदरे आणि सीमारेषांवर प्रोटोकॉलनुसार देखरेख कायम ठेवणे आणि विलगीकरणासाठी पुरेशा खाटा उपलब्ध करून देणे या संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ. हर्षवर्धन यांनी वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी राज्यांशी प्रभावी समन्वय राखण्याच्या गरजेवर भर दिला. नीती आयोगाच्या सभासदांनी रुग्णालयात भरतीसाठी क्षमता वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्राप्त झालेल्या विनंतीवर चर्चा झाली.
आतापर्यंत हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधानांनी सर्व विभागांची प्रशंसा केली. उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार भारताला प्रतिसादासाठी तयार राहावे लागेल असे ते म्हणाले. सर्व विभागांनी एकत्रिकरित्या काम करायला हवे आणि या रोगाबद्दल आणि घ्यावयाच्या खबरदारीबद्दल समाजात जागरूकता निर्माण करावी. कोविड-19 व्यवस्थापनासाठी जगभरातील आणि राज्यांतील सर्वोत्तम पद्धती जाणून घ्याव्यात आणि त्यांचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. तज्ञांच्या मतानुसार लोकांना शक्य तिथे गर्दी टाळण्याचे आणि काय करावे आणि काय करू नये याबाबत जागरूक राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात असेही त्यांनी नमूद केले. विलगीकरणासाठी पुरेशा जागा शोधण्यासाठी तसेच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आवश्यक त्या काळजीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इराणमधील भारतीयांची लवकर चाचणी आणि त्यांना परत आणण्यासंबंधी योजना आखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आगाऊ आणि योग्य योजना आखण्याची आणि वेळेवर प्रतिसाद देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1605679)