आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणू संदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे राज्यसभेतील आजचे निवेदन
Posted On:
05 MAR 2020 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत, सद्यस्थिती व केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना यांची आज राज्यसभेत माहिती दिली. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले 80,270 रुग्ण आढळले असून 2981 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनच्या बाहेर जगातल्या 28 देशांमध्ये 12,857 जणांना कोरोनाची लागण झाली असून 220 जण दगावले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ही ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आपत्ती’ म्हणून जाहीर केली आहे. देशात 4 मार्चपर्यंत कोरोनाचे 29 रुग्ण आढळले आहेत. यापैकी तिघेजण केरळमध्ये असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. इटली व दुबईहून आलेल्या दोन रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आग्रा येथे सहा रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इटलीहून राजस्थान आलेला पर्यटक व त्याची पत्नी कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले आहे; तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य 14 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बसच्या भारतीय चालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. पंतप्रधान स्वत: नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. केंद्र सरकारने ही कोरोनाची लागण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. वेळोवेळी प्रवासासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांना आवश्यकता नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान, चीनच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
देशातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे; तसेच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागांमध्ये देखील तपासणी केली जात आहे.
चीनमधील हुबेई आणि बुहानमधल्या 647 भारतीय विद्यार्थी आणि अन्य व्यावसायिकांना विशेष विमानाद्वारे भारतात आणण्यात आले आहे. भारतीय दूतावास चीनमधल्या भारतीय समुदायाच्या नियमित संपर्कात आहे.
याशिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 6 मार्च रोजी सर्व राज्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत दिली आहे.
S.Phophale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1605368)
Visitor Counter : 216