पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये एका भव्य मेळाव्यात (सामाजिक अधिकर्ता शिबीर) दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांना सहायक उपकरणांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण


प्रत्येकाला लाभ मिळावा आणि सर्वांना न्याय दिला जावा ही सरकारची जबाबदारी : पंतप्रधान

गेल्या 5 वर्षांमध्ये देशभरामध्ये जवळपास 9 हजार मोठ्या वितरण शिबिरांचे आयोजन : पंतप्रधान

Posted On: 29 FEB 2020 8:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सामाजिक अधिकर्ता शिबिरामध्ये जवळपास 27 हजार ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगजनांना आवश्यक असलेल्या उपकरणांचे वितरण केले. या महावितरण शिबिराचे आयोजन सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना- आरव्हीवाय आणि एडीआयपी योजनांच्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सशक्त बनवण्यासाठी करण्यात आले होते.

याप्रसंगी उपस्थित जनसमूहाला मार्गदर्शन करताना, पंतप्रधान मोदी यांनी संस्कृतमधील प्राचीन वाक्प्रचार ‘‘स्वस्तिः प्रजाभ्यः परिपालयंतां, न्यायेन मार्गेण मही महीशाः’’चा वापर केला. या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे की, लोकांना समान न्याय उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असं स्पष्ट करून मोदी यांनी आपल्या सरकारच्या ‘‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’’ या धोरणाचा पायाच संस्कृतमधल्या या वचनाशी निगडीत आहे, असं स्पष्ट केलं. या भावनेतून आमचे सरकार समाजातल्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कार्य करीत असल्याचं  त्यांनी सांगितलं. या देशाच्या 130 कोटी भारतीयांचं  रक्षण करणं हे माझ्या सरकारचं  सर्वात पहिलं  आणि मुख्य काम आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांगजन आहेत, आदिवासी, दलित असे कोणीही असो, या सर्वांच्या हिताचं रक्षण करण्याला आमच्या सरकारचं  प्राधान्य आहे.

आज आयोजित करण्यात आलेल्या सहायक उपकरण वितरणाच्या भव्य मेळाव्याविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, त्याचा हा एक भाग आहे. याआधीच्या सरकारच्या काळामध्ये फारच क्वचित असे कार्यक्रम आयोजित केले जात होते. गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या सरकारने देशाच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचे जवळपास 9हजार मेळावे भरवले आहेत.

गेल्या पाच वर्षांत सरकारने दिव्यांगजनांना 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त उपकरणे आणि साहित्यांचे वितरण केले असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.

नवभारताच्या विकासामध्ये दिव्यांगजन युवक आणि मुलांचीही समान भागीदारी आवश्यक आहे. यामध्ये मग औद्योगिक क्षेत्र असो अथवा सेवा क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र, या सर्वांमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाचा वाटा असला पाहिजे, हे जाणून सरकार सर्वांना प्रोत्साहन देत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

दिव्यांगजनांच्या अधिकाराचे अधिनियम लागू करणारे आमचे पहिले सरकार आहे, असं सांगून पंतप्रधानांनी आम्ही दिव्यांगतेच्या असलेल्या 7 श्रेणींमध्ये विस्तार करून त्या 21 श्रेणी केल्याचेही स्पष्ट केले. त्याचबरोबर दिव्यांगजनांच्या उच्च शिक्षणासाठी असलेला आरक्षणाचा कोटा 3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढवल्याची माहिती दिली. 

गेल्या पाच वर्षांमध्ये देशातल्या अनेक संस्थांच्या इमारती, 700 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा आणि विमानतळांचा परिसर दिव्यांगजनांसाठी सुलभ बनवण्यात आला आहे. उर्वरित सरकारी कार्यालयांच्या इमारतीही सुगम्य भारत मोहिमेअंतर्गत दिव्यांगांसाठी सुलभ बनवण्यात येणार आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

आज प्रयागराज इथं आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराविषयी माहिती देताना सांगण्यात आलं की, लाभार्थींची संख्या, वितरित करण्यात येणा-या साहित्याची संख्या आणि वितरित करण्यात येत असलेल्या उपकरणांची गुणवत्ता यांच्या संदर्भामध्ये देशात आत्तापर्यंत आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये सर्वात मोठा मेळावा आहे. या महामेळाव्यामध्ये 26हजारांपेक्षा जास्त लाभार्थींना 56 हजारांपेक्षा जास्त मदत उपकरणांचे वितरण करण्यात आले. या साहित्यांची किंमत 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

या उपकरण आणि साहित्याच्या माध्यमातून दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक विकास करणे सोईचे ठरावे, हा उद्देश या शिबिराचा आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1604868) Visitor Counter : 107


Read this release in: English