संरक्षण मंत्रालय

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांनी संयुक्तपणे विकसित केलेले नवीन स्फोटक शोधन उपकरण पुण्यात सादर

Posted On: 01 MAR 2020 8:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मार्च 2020

 

पुण्यात आज झालेल्या राष्ट्रीय स्फोटक शोधन कार्यशाळेत एक नवीन स्फोटक शोधन यंत्र सादर करण्यात आले. हे यंत्र दूर अंतरावरून देखील स्फोटके शोधू शकते. शुद्ध स्वरुपातील तसेच मिश्रण असलेली रसायने वापरून बनवलेल्या स्फोटकांबदृदल या यंत्राच्या माहितीकोषात माहिती भरल्यास तशी अनेक प्रकारची स्फोटके हे यंत्र शोधू शकते. आवरणाखाली असलेली स्फोटके शोधण्यातही हे यंत्र सक्षम आहे. पुण्याची उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा आणि बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे हे यंत्र विकसित केले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन आणि विकास खात्याचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते या राष्ट्रीय स्फोटक शोधन कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. पुण्याच्या उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळेच्या हिरक महोत्सवानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक दर्जेदार प्रयोगशाळा आहे. सतत होत असणाऱ्या तंत्रज्ञान विकासाबद्दल या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान वापरकर्त्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली जाते. या कार्यशाळेमध्ये अद्ययावत स्फोटक संशोधन तंत्रज्ञानाविषयी सहभागींना अवगत करण्यासाठी मदत होत असते.

स्फोटक शोधन तंत्रज्ञान ही काळाची गरज असून या तंत्रज्ञानाच्या आधारे संवेदनशील ठिकाणांवर घातपात करण्याचे समाजकंटकांचे मनसुबे हाणून पाडू शकतो, असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. रेड्डी यावेळी म्हणाले. विद्यापीठातील प्रज्ञावंत आणि डीआरडीओच्या संयुक्त प्रयत्नांमधून सुरक्षादलांना सहज वापरता येईल असे सुटसुटीत उपकरण तयार केल्याबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. डीआरडीओ, आयआयटी, प्रगत उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन केंद्र, हैद्राबाद विद्यापीठ, इतर विद्यापीठ आणि सहभागींपैकी अनेक तज्ञांच्या भाषणांचे संकलन असलेल्या एका स्मरणिकेचे त्यांच्या हस्ते विमोचन झाले.

डीआरडीओच्या प्रयोगशाळा, सैन्यदले, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राज्य पोलीस खाते, विद्यापीठे, औद्योगिक आस्थापनांमधून एकूण 250 प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते.

 

B.Gokhale/U.Raikar/P.Kor



(Release ID: 1604819) Visitor Counter : 184


Read this release in: English