संरक्षण मंत्रालय
सीमेपलिकडून दहशतवाद सुरू ठेवणे शत्रूला परवडणार नाही असा स्पष्ट संदेश बालाकोट हल्ल्याने दिल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
28 FEB 2020 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2020
सीमेपलिकडील दहशतवादी तळांवरून भारताविरोधात छूपे युद्ध परवडणारे नाही, असा स्पष्ट संदेश 2016 चा सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मधील बालाकोट हल्ल्यातून देण्यात आला आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत बालाकोट हल्ल्याच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते.
देशाच्या सेवेत सशस्त्र दलांनी केलेल्या त्यागाचे त्यांनी स्मरण केले आणि पुलवामा हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांचे बलिदान हे राष्ट्र कधीही विसरणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. भारताने बालाकोट हवाई हल्ल्यातून दिलेल्या प्रत्युत्तरामुळे यापुढे शत्रूला शंभर वेळा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. बालाकोट हल्ल्यातून भारताची संरक्षण क्षमता आणि दहशतवादाविरोधात स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार प्रतिबिंबित होतो असे ते म्हणाले. भविष्यात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला कुठलाही धोका उद्भवल्यास सरकार योग्य तऱ्हेने प्रत्युत्तर देईल, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले. दहशतवाद विरोधात या लढ्यात संपूर्ण जग भारताच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अलिकडेच आपण पाकिस्तानवर सामूहिक, राजनैतिक आणि आर्थिक दबावाचा परिणाम पाहिला. हफिज सईदसारखे दहशतवादी आज गजाआड आहेत. मात्र एवढे पुरेसे नाही, असे ते म्हणाले. जोपर्यंत दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करून देत असल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार ठरवले जात नाही तोपर्यंत पाकिस्तान दुटप्पीपणा आणि लबाडीचे धोरण चालूच ठेवेल, असे ते म्हणाले. नवीन तंत्रज्ञानाचा आणि सध्याच्या क्षमतांचा अभिनव पद्धतीने वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
M.Chopade/S.Kane/P.Kor
(Release ID: 1604656)
Visitor Counter : 160