पंतप्रधान कार्यालय

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 22 FEB 2020 8:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ओडिशा येथे आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, हे केवळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाही, तर भारतातील आगामी क्रीडा चळवळीची सुरूवात आहे. इथे तुम्ही केवळ एकमेकांचे स्पर्धक नाही तर ही स्पर्धा तुमच्या स्वतःशी सुद्धा आहे.

मी तुमच्याशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. परंतु, मी स्पर्धेच्या ठिकाणचा उत्साह, तेथील वातावरण, तुमच्यातील उत्सुकता, आवड या सगळ्यांना अनुभवतो आहे. भारताच्या इतिहासातील पहिली खेलो इंडिया विद्यापिठीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आजपासून ओडिशा इथे सुरू होत आहे. भारताच्या क्रीडा जगताच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारताच्या क्रीडा विश्वासाठी देखील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यातल्या युवकांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण करण्यामध्ये आणि युवकांमधील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा शोधण्यासाठी खेलो इंडिया मोहिमेने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१८ मध्ये जेव्हा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला, तेव्हा ३५०० खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला होता. मात्र, केवळ तीन वर्षात हा खेळाडूंचा आकडा आता दुपटीने वाढून सहा हजारांपेक्षा अधिक झाला आहे.

``चालू वर्षात खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांनी ८० विक्रम मोडले आहेत. त्यापैकी ५६ विक्रम आपल्या मुलींच्या नावावर आहेत. आपल्या मुली विजयी झाल्या आहेत. आपल्या मुलींनी कमाल केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की या मोहिमांमधून पुढे आलेली ही प्रतिभा कोणा मोठ्या शहरांमधील नाही तर लहानशा शहरांमधून आली आहे,`` पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, भारतात गेल्या पाच ते सहा वर्षांत क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि प्रसारासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. खेळाडूंमधील प्रतिभा शोधण्याची प्रक्रिया, प्रशिक्षण, तसेच निवड प्रकिया यातही पारदर्शकतेला महत्त्व दिले जात आहे.

``यातीलच काही खेळा़डू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोहिमेतील खेळाडूंनी देशाला विविध क्रीडा स्पर्धांमधून जसे की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स, यूथ ऑलिम्पिक्स यामधून २०० हून अधिक पदके मिळवून दिली आहेत. २०० पेक्षा अधिक सुवर्ण पदके मिळविण्याचे ध्येय आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या स्वतःच्या सादरीकरणात सुधारणा करा आणि तुमच्या आकांक्षांना नवी उंची द्या,`` असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/S.Sheikh/P.Kor



(Release ID: 1604548) Visitor Counter : 97


Read this release in: English