गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्र्यांची दिल्लीतल्या हिंसाचार प्रकरणी राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक

Posted On: 25 FEB 2020 7:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्ली हिंसाचार प्रकरणी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पक्षांतर्गत विरोध विसरुन अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा मुकाबला करावा असे आवाहन त्यांनी केले. दिल्ली पोलीस या प्रकरणी पुरेशी उपाययोजना करत असून उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांच्या सीमांवर ही लक्ष ठेवून आहेत असे ते यावेळी म्हणाले. गरज लागल्यास आणखी काही दलांना सुरक्षा व्यवस्थेसाठी पाचारण केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच माध्यमांनी सुद्धा मर्यादा ओलांडू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. स्थानिक शांतता समित्यांच्या कार्याला पुन्हा उजाळा देण्यात यावा आणि यात सर्व थरातल्या धर्मातल्या आणि विचारी लोकांचा समावेश असावा असंही त्यांनी म्हटले असून संवेदनशील भागात त्यांनी बैठका घ्याव्यात असे आवाहन शहा यांनी केले आहे. स्थानिक प्रतिनिधींशी विचारणा करून तसेच दिल्लीच्या नायब राज्यपालांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल असेही शहा यावेळी म्हणाले.

काल या हिंसाचारात बळी पडलेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या मृत्यूबद्दल यावेळी दु:ख व्यक्त करण्यात आले.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Kor



(Release ID: 1604359) Visitor Counter : 242


Read this release in: English