आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोनो विषाणूंवरील नियंत्रणासाठी भारताची मजबूत आरोग्य सुविधा लक्ष ठेवून आहे - डॉ. हर्ष वर्धन
जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक ध्येय पूर्ण करण्यासाठी भारत सज्ज ; अन्य देशांना अनुकरणीय ठरतील अशा आरोग्य विषयक योजना तयार करा-डॉ.हर्ष वर्धन
Posted On:
22 FEB 2020 7:47PM by PIB Mumbai
मुंबई, 22 फेब्रुवारी 2020
कोरोना विषाणूंवर नियंत्रणासाठी भारताची मजबूत आरोग्य सुविधा लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज मुंबईत सांगितले. त्याचबरोबर एबोला, निपाह विषाणू, स्वाइन फ्लू यासारख्या फैलावांना देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वी प्रतिकार केला आहे असेही ते म्हणाले . हर्षवर्धन आज , इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (आयआयपीएस) च्या शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन समारंभात बोलत होते.
डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक ध्येय पूर्ण करण्यासाठी भारत सज्ज असून, अन्य देशांना अनुकरणीय ठरतील अशा आरोग्य विषयक योजना आपण तयार केल्या पाहिजेत. याशिवाय देशातील लोकसंख्येनुसार डॉक्टरांच्या संख्येचे प्रमाण देखील जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मानकानुसार वाढायला हवे. आरोग्य क्षेत्रातील प्रगतीविषयी बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा नमूद केले की, वैद्यकीय आणि पदव्युत्तर जागा लक्षात येण्याइतक्या झपाट्याने वाढत आहेत, एआयआयएमएसची संख्या देखील सहा पासून २२ पर्यंत गेली आहे. आयुष्मान भारत योजना सुरू झाली आहे, दर्जेदार आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरामय कक्ष आणि प्रतिबंधात्मक आरोग्य केंद्र देखील उभारण्यात आले आहेत.
डॉ. हर्षवर्धन असेही म्हणाले की, ``एकाही महिलेचा गर्भावस्थेत असताना मृत्यू होता कामा नये आणि एकही बालक लसीकरणाशिवाय राहू नये. मी अतिशय कळकळीने हे ध्येय बाळगले आहे.`` याशिवाय टीबीचे निर्मूलन आणि अतिसाराचे शून्य मृत्यू, मलेरियामुळे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे आणि त्याचे निर्मूलन करणे ही देखील सरकारची महत्त्वाची उद्दिष्ट आहेत.
आयआयपीएस बाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, प्रतिष्ठित संस्थांची नावे ही क्वचितच सर्वेक्षण आणि संशोधनांमध्ये दिसत असतात. आणि अशा संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी क्वचितच बेरोजगार राहतात. याउलट ते यूएन आणि अन्य मान्यताप्राप्त संस्थांमध्ये काम करतात. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, जशी गरज असेल त्यानुसार, अशा बुद्धिमान व्यक्तींकडून देशासाठी काही भरीव योगदान दिले जावे अशी देशाची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आरोग्य क्षेत्रात अनेक मैलाचे दगड आजपर्यंत रोवण्यात आले आहेत. त्यांना येत्या २०२२ पर्यंत नवा भारत तयार करायचा आहे. ते असेही म्हणाले की, अखेरच्या टप्प्याकडे अजून पोहोचायचे आहे. संशोधक आणि प्रतिभाशाली युवकांनी पुढे यावे आणि चौकटी बाहेरचा विचार करून संशोधक वृत्तीने आरोग्य क्षेत्रातील न सोडविलेल्या समस्यांची उत्तरे शोधावीत, असे आवाहन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री श्री राजेश टोपे हे देखील या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, आयआयपीएसचा अभ्यासक्रम हा भविष्याचा वेध घेणारा, जागतिक स्पर्धा करणारा आहे. आयआयपीएसने गोळा केलेली सर्वेक्षण अहवालातील माहिती ही भारत सरकारसाठी तसेच अन्य राज्यांमधील प्रशासनांना अतिशय उपयुक्त ठरली आहे. सामाजिक लेखाजोखा आणि ताळेबंद मांडताना त्याची मोठी मदत झाली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या महासंचालक (सांख्यिकी) श्रीमती उषा बत्रा, विशेष महासंचालक (सीपीडब्ल्यूडी) श्रीमती रत्ना ए जेना, संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक, आयआयपीएस प्रा. के. एस. जेम्स, उप महासंचालक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे (सांख्यिकी) श्री. डी के ओझा आणि निवृत्त प्राध्यापक आणि आयआयपीएसचे संचालक यावेळी उपस्थित होते.
नोंद – आयआयपीएस हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अख्यारितील अभिमत विद्यापीठ आहे.
B.Gokhale/S.Sheikh/P.Kor
(Release ID: 1604082)
Visitor Counter : 182