आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूट उच्चाटन करण्यास सरकार कटिबद्ध-डॉ. हर्ष वर्धन
Posted On:
20 FEB 2020 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 20 फेब्रुवारी 2020
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे सांगून आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते आज मुंबईत भारतीय वैद्यक संशोधन परिषद-राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
वंधत्व निवारणावर महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या डॉ. सुभाष मुखर्जी यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.
वर्ष 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी संस्थेच्या संचालकांनी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले. 2025 पर्यंत क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकार कटिबद्ध आहे. तसेच वर्ष 2022 पर्यंत ‘शून्य अतिसार रुग्ण’ ध्येय गाठण्याचे त्यांच्या मंत्रालयाने ठरविले असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. यासाठी संशोधक करत असलेल्या अथक प्रयत्नांची सरकारला जाण असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधानांचा नवा भारताचा दृष्टीकोन विषद करतांना सांगितले की, त्यांचे मंत्रालय आरोग्यासंबंधी सूटू न शकलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना आयुष्मान भारत आणि सर्वांसाठी आरोग्य मिशन यापुढे प्राधान्य देणार आहे.
आपल्या भाषणात त्यांनी प्रसूती काळात होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. माता मृत्यू दराचे प्रमाण कमी करण्यास भारताला यश मिळाले आहे. मात्र, एकाही मातेचा मृत्यू होऊ नये किंवा तिचा जीव धोक्यात येऊ नये हे बघणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. संसदेच्या पुढील अधिवेशनात एमटीपी, गर्भपात आणि सरोगसी याबाबत तीन विधेयकं मांडण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1603901)
Visitor Counter : 181