आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोनाबाबत भारत सरकारचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष, आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत असल्याची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती
Posted On:
10 FEB 2020 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020
कोरोना विषाणूचा प्रकोप आणि भारत सरकारने उचलेली पावले याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत निवेदन दिले.
9 फेब्रुवारीपर्यंतच्या स्थितीनुसार चीनमध्ये 37,198 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा 811 वर पोहोचला आहे. चीनबाहेर 27 देशांमध्ये (हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानसह) कोरोनाचे 354 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे सूचित होत आहे.
या रोगाबाबत, साथीच्या रोगांची जी मानके असतात, त्या दृष्टीने अजूनही संशोधन सुरु आहे.
व्यक्तीमध्ये विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर त्याचे रोगात रुपांतर होण्यास दोन आठवडे लागू शकतात. ताप, खोकला, श्वसनास त्रास ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. 10 ते 20 टक्के प्रकरणांमध्ये जीवरक्षक प्रणालीची गरज भासू शकते. लागण झालेल्या व्यक्तीच्या निकट राहणाऱ्या व्यक्तीसही या रोगाची लागण होते.
देशात आतापर्यंत केरळमध्ये या रोगाचे तीन रुग्ण आढळले असून ते चीनमधल्या वुहान इथून आले आहेत. या व्यक्तींना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पावले उचलण्यात आली असून परिस्थितीचा आपण दररोज आढावा घेत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
चीनमध्ये न जाण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. 18 जानेवारी 2020 पासून 21 विमानतळांवर प्रवाशांची चाचणी केली जात आहे. हाँगकाँग आणि चीनबरोबर सिंगापूर आणि थायलंडमधून येणाऱ्या सर्व विमानांसाठीही युनिवर्सल थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले आहे.
आतापर्यंत 1,818 विमानांमधल्या 1,97,192 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व विमानतळांवर तज्ञ डॉक्टरांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
12 प्रमुख बंदरं आणि छोट्या बंदरांवरही प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे.
नेपाळमध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व एकात्मिक तपास चौक्यांवर उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सहकार्याने चाचणी सुरु करण्यात आली आहे.
चीनमधल्या वुहान आणि हुबेई प्रांतातील लगतच्या शहरांमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला एअर इंडियाने दोन विशेष विमाने रवाना केली. त्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी एअर इंडिया, डॉक्टर आणि निमवैद्यकीय पथकाचे आभार मानले. या व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून सुटका केलेल्या सर्वांची दररोज चाचणी करण्यात येत आहे. या व्यक्तींची प्रकृती सर्वसामान्य आहे.
चीनमधल्या इतर प्रांतातील भारतीयांच्या संपर्कात भारतीय दुतावास असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत असून अहोरात्र नियंत्रण कक्ष (011-23978046) स्थापन करण्यात आला आहे.
भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या संपर्कात असून परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1602671)
Visitor Counter : 138