पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर


छोटी शहरे नवीन भारताचा पाया आहे- पंतप्रधान

2024 पर्यंत आणखी 100 विमानतळ विकसित केली जाणार

Posted On: 06 FEB 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत उत्तर दिले. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट महत्वाकांक्षी आहे, मात्र आपल्याला भव्य विचार करायला हवा आणि पुढे जायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाचा भारत पूर्ण गतीने आणि पूर्ण क्षमतेने पाठपुरावा करत आहे, असे ते म्हणाले.

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा, एमएसएमई, वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि पर्यटनावर भर देत आहे. या क्षेत्रांना पुढे नेण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मेक इन इंडियाला गती देण्यासाठी कर रचनेसह सर्व प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे देशात निर्मितीबाबत अधिक उत्साह निर्माण होईल. बँकिंग क्षेत्रातील विलिनीकरण धोरणाचे अर्थपूर्ण निकाल मिळायला सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

छोटी शहरे नवीन भारताचा पाया

देशातील सर्वाधिक महत्वाकांक्षी तरुण छोट्या शहरात राहतात आणि ही छोटी शहरे नवीन भारताचा पाया असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आज देशातील डिजिटल व्यवहारांपैकी अर्ध्याहून अधिक व्यवहार छोट्या शहरांमध्ये होतात. देशात नोंदणी झालेल्या स्टार्ट अपपैकी निम्मे स्टार्ट अप द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आहेत म्हणूनच आम्ही द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा जलदगतीने निर्माण करण्यावर भर देत आहोत. महामार्ग आणि रेल्वे संपर्कातही वेगाने सुधारणा केली जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

2024 पर्यंत आणखी 100 विमानतळांचा विकास

उडान योजने अंतर्गत अलिकडेच 250व्या मार्गाचा प्रारंभ करण्यात आला, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे हवाई प्रवास किफायतशीर झाला असून, देशातील 250 छोट्या शहरांमध्ये तो सुगम्य झाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014 पर्यंत देशात केवळ 65 कार्यरत विमानतळ होते. गेल्या 5 वर्षात ही संख्या वाढून 100च्या वर गेली आहे. 2024 पर्यंत बहुतांश द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आणखी 100 विमानतळ विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1602320) Visitor Counter : 303


Read this release in: English