माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सात दिवस चाललेल्या 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंगतदार कार्यक्रमाने सांगता


ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या “बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय” या माहितीपटाने पटकाला 16 व्या 'मिफ्फ' च्या सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध ” लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार

समाजात बदल घडवून आणण्यासाठी माहितीपट प्रभावी माध्यम असल्याचे सांगत मिफ्फ सारख्या महोत्सवातून माहितीपटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Posted On: 03 FEB 2020 7:32PM by PIB Mumbai

मुंबई, 3 फेब्रुवारी 2020

 

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट यांच्यासाठी समर्पित 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज रंगतदार कार्यक्रमाने सांगता झाली. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय माहितीपट स्पर्धा गटात ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा  पाझ यांच्या बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार पटकाला असून 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बार्बरा पाझ यांच्या वतीने ब्राझीलच्या वाणिज्य दूतांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्कुष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध – ॲन एसे ऑफ रेन  या मराठी लघुपटाला मिळाला. 5 लाख रुपये, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटाचा पुरस्कार यंदा विभागून देण्यात आला आहे.  जर्मनीच्या दिग्दर्शिका इजाबेला प्लुसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन या ॲनिमेशनपटाला आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के  यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या ॲनिमेशनपटाला हा पुरस्कार देण्यात आला.  पाच  लाख रुपये, रौप्य शंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी, आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठीच्या ज्युरी समितीचे अध्यक्ष शाजी करुन, राष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठीच्या ज्युरी समितीचे अध्यक्ष थॉमस व्हॉ यांच्या हस्ते आणि पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांच्या उपस्थितीत समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यपालांनी या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि फिल्म्स डिव्हिजनचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा महोत्सव गेले अनेक वर्ष सातत्याने हा महोत्सव यशस्वीपणे राबवून फिल्म्स डिव्हिजनने माहितीपटाच्या जगात जागतिक पातळीवर महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांना मोठे व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव आहे. विविध समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक संरचना आणि त्यात होणारे बदल यावर माहितीपटाच्या माध्यमातून प्रभावी भाष्य करता येते असे राज्यपाल म्हणाले. या महोत्सवात पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. मात्र पुरस्कारापेक्षाही समाजात बदल घडवून आणण्यासाठी माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटातून दिला जाणारा संदेश अधिक महत्वाचा आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले. माहितीपट निर्मात्यांनी सामाजिक आणि मानवतावादी प्रश्नांविषयी अधिक संवेदनशील व्हावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेले अनेक वर्ष सातत्याने यशस्वीपणे राबवला जात असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. हा महोत्सव आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचला असून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रेमींना एकत्र आणणारे महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे असे अमित देशमुख म्हणाले. महाराष्ट्र सरकार माहितीपट क्षेत्राला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले. चित्रपट ही केवळ कला नसून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणारा उद्योगही आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधा आणि इतर व्यवस्था उपलब्ध करुन द्यायला हव्यात असे ते म्हणाले. या महोत्सवात दिल्या जाणाऱ्या रोख पुरस्कारांमुळे तरुणांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्पर्धा गटासाठीच्या ज्युरी समितीचे अध्यक्ष थॉमस व्हॉ यांनी सांगितले की, ज्युरी म्हणून काम करणे एकाच वेळी आव्हानात्मक आणि आवडणारेही काम होते. चित्रपटांच्या विषयांमध्ये वैविध्य होत असे सांगत येत्या काळात चित्रपटाच्या लांबीच्या माहितीपटांची निर्मिती होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे ते म्हणाले. या महोत्सवात महिला दिग्दर्शकांची संख्या लक्षणीय असल्याचा गौरव वाटतो असे ते म्हणाले.

गेले सात दिवस सुरु असलेल्या मिफ्फ 2020 ला चित्रपट समीक्षक आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमागे भारतात माहितीपट निर्मितीची संस्कृती अधिकाअधिक विकसित व्हावी हाच हेतू आहे असे ते म्हणाले. या व्यासपीठामुळे तसेच पुरस्कारांमुळे आपल्याला अनेक अर्थपूर्ण आणि उत्तम माहितीपट बघायला मिळतात असे त्यांनी सांगितले. आलेल्या प्रवेशिकांमधून चित्रपटांची निवड करण्याचे काम निवड समितीने उत्तमरित्या पूर्ण केले तसेच ज्युरी सदस्यांनीही पुरस्कारांसाठी चित्रपट निवडण्याचे आव्हान यशस्वीपणे पार पाडले याबद्दल त्यांनी दोन्ही समितींच्या सदस्यांचे आभार मानले. माहितीपटांचा झेंडा भारतात उंचावून फडकवत ठेवण्यात फिल्म्स डिव्हिजनचे मोठे योगदान आहे असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. या महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारनेही मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक आणि या महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी 16 व्या मिफ्फची वैशिष्ट्ये यावेळी सांगितली. या महोत्सवासाठी देश-विदेशातून 3200 प्रतिनिधी आले होते. हा महोत्सव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. परदेशी ॲनिमेटर्स सोबतच रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात भारतातील दिग्गज ॲनिमेटर राम मोहन, भीमसेन खुराना आणि व्ही.जी.सामंत यांच्या ॲनिमेशनपटांना केवळ तरुणांचाच नाही तर त्यांच्या समकालीनांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला असे स्मिता शर्मा यांनी सांगितले.

महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष चित्रपट आणि मूर्ती निर्मितीच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली श्रद्धांजली, जगद्‌विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यावरचा विशेष विभाग, ईशान्य भारतातील चित्रपटांचे प्रदर्शन या सगळ्यालाच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे त्यांनी सांगितले.

या वर्षी आयर्लंडची कन्ट्री फोकस विभागात निवड करण्यात आली होती. या विभागात सात माहितीपट दाखवण्यात आले. थॉमस व्हॉ, मायकल डुडोक डी व्हिट, पेन्चो कुंचेव्ह, मजहर कामरान, बी लेनिन यांचे मास्टर क्लासेस आणि कार्यशाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एलिफन्ट्‌स डू रिमेंबर या माहितीपटाच्या प्रमुख नायिका आणि आझाद हिंद फौजेतल्या सेनानी रमा खांडवाला यांची उपस्थिती तसेच बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांनी निर्माण केलेल्या चित्रपटांसाठीचा वेगळा विभाग हे देखील या महोत्सवाचे आकर्षण ठरले असे स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले.

पंडित सुनील कांत गुप्ता यांच्या चमूने यावेळी सांगितिक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर मिफ्फ 2020 मध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटांच्या शो ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या महोत्सवात एकूण 302 माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट दाखवण्यात आले. त्यापैकी 47 राष्ट्रीय स्पर्धा गटात, 28 आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात दाखवण्यात आले. महोत्सवात एकूण 6 मास्टर क्लासेस आणि 2 कार्यशाळा झाल्या. 

 

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1601805) Visitor Counter : 200


Read this release in: English