माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या “बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय” या माहितीपटाने पटकाला 16 व्या 'मिफ्फ' च्या सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार
Posted On:
03 FEB 2020 6:46PM by PIB Mumbai
मुंबई, 3 फेब्रुवारी 2020
माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांसाठीच्या आशियातल्या सर्वात जुना आणि सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'मिफ्फ 2020' ची आज रंगतदार कार्यक्रमात सांगता झाली. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय माहितीपट स्पर्धा गटात ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या “बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय” या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार पटकावला असून 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या ओळी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, या चित्रपटात अमेरिकन दिग्दर्शक हेक्टर बाबेन्को यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणांना चित्रबद्ध करण्याचे आणि त्यावर सिनेमा बनवण्याचे आव्हान आपल्या सहकारी पाझ यांना दिले. पाझ यांनी हे आव्हान स्वीकारले. कर्करोगग्रस्त बाबेन्को यांनीच या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. अखेरच्या दिवसांमधल्या सर्व भावना आणि संवेदनांचे परिणामकारक चित्र साकारणारा हा चित्रपट आहे. बार्बरा पाझ यांचा हा पहिलाच तर बाबेन्को यांचा अखेरचा चित्रपट आहे.
बार्बरा पाझ यांच्या वतीने ब्राझीलच्या वाणिज्य दूतांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी बार्बरा यांचा संदेश वाचून दाखवला. "भारताविषयी मला अत्यंत आत्मियता असून या देशाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. भारताकडून हा पुरस्कार मिळाल्याचा मला विशेष आनंद आहे. मात्र आज दुर्देवाने मी हा पुरस्कार स्वीकारायला येऊ शकले नाही. माझा माहितीपट सिनेमाविषयीचे प्रेम व्यक्त करणारा आहे. जे काम तुम्हाला आवडत असते. ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच काम करत तुम्ही आयुष्याचा निरोप घ्यायला हवा हे सांगणारा हा चित्रपट आहे. ब्राझीलतर्फे तुम्हा सर्वांचे आभार!"
सर्वोत्कुष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध - ॲन एसे ऑफ रेन” या मराठी लघुपटाला मिळाला. 5 लाख रुपये, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पावसाचे वेगळे चित्र, मुसळधार कोसळून होत्याचे नव्हतं करणारा पाऊस नागराज मंजुळे यांनी या लघुपटातून परिणामकारकरित्या दाखवला आहे. या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटाचा पुरस्कार यंदा विभागून देण्यात आला आहे. जर्मनीच्या दिग्दर्शिका इजाबेला प्लुसिन्स्का यांच्या “पोर्टेट ऑफ सूझन” या ॲनिमेशनपटाला आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या “ द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह” या ॲनिमेशनपटाला हा पुरस्कार देण्यात आला. पाच लाख रुपये, रौप्य शंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रीय स्पर्धा गटात 60 मिनिटांपर्यंतच्या अवधीचा सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार पुतुल मेहमूद आणि रत्नबोली राय यांच्या “अतासी” माहितीपटाला मिळाला. पाच लाख रुपये, रौप्य शंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मानसिकदृष्ट्या गतीमंद मुलीची स्वप्न आणि भावविश्व दाखवणारा हा माहितीपट आहे. याच विभागात विभा बक्षी यांच्या “सन राईज” या माहितीपटाला विशेष उल्लेखनीय माहितीपट म्हणून निवडण्यात आले आहे. हरियाणातील पार्श्वभूमीवर स्त्री च्या हक्कासाठी लढा देणाऱ्या पुरुषाची कथा सांगणाऱ्या माहितीपटातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला आहे. पाच लाख रुपये, रौप्य शंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच गटात 60 मिनीटांपेक्षा अधिक अवधीच्या सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार दिग्दर्शिका सपना भवनानी यांच्या “सिंधुस्थान” या माहितीपटाला मिळाला. पाच लाख रुपये, रौप्य शंख आणि प्रमाण पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
45 मिनीटांपेक्षा कमी अवधीच्या राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात दिग्दर्शिका शाजिया इकबाल आणि निर्माते अनुराग कश्यप, अजय राय यांच्या “बेबाक-डाईंग विंड एन हर हेअर” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला. 3 लाख रुपये, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. धर्माच्या जुनाट चालीरिती आणि बंधने झुगारुन आपल्या शिक्षण आणि करियरला प्राधान्य देणाऱ्या युवतीची कथा या चित्रपटात सांगितली आहे.
सर्वोत्कृष्ट लघुपटाचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार दिग्दर्शक जय शन्कर यांच्या “लच्छावा” या लघुपटाला मिळाला आहे. 3 लाख रुपये, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शहरी ग्रामीण भागातली दरी आणि आई आणि मुलातील नातं सांगणारा हा लघुपट आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पटाचा पुरस्कार ज्योत्स्ना पुथरन यांच्या “चक्की (मिक्सी)” या ॲनिमेशनपटाला देण्यात आला. तीन लाख रुपये, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विशेष म्हणजे हा ॲनिमेशनपट वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे वापरुन तयार केला आहे. केवळ बियाणांच्या मदतीने चित्र तयार करुन त्यातून ॲनिमेशन साकारले आहे. हे एखाद्या देशाच्या विकास आणि भविष्याचे चित्र मांडण्यासाठी वापरलेले रुपक आहे.
या महोत्सवात तांत्रिक विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनचा पुरस्कार अमेरिकन दिग्दर्शक जेस्सी अल्क यांच्या “पेरहा डॉग” माहितीपटाला देण्यात आला. तीन लाख रुपये, चषक, आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. अनिरुद्ध चक्रवर्ती यांच्या “द सेल्सवूमन” या लघुपटाला आणि ज्युलिया बॅन्टर यांच्या “फियान्से” लघुपटासाठी संकलक मरियम राचमुथ यांना हा पुरस्कार देण्यात आला. 3 लाख रुपये, चषक, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार “बेबाक” या शाजिया इक्बाल यांच्या लघुपटासाठी छायाचित्रकार सचिन गडंकुश यांना देण्यात आला. 3 लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आयडीपीए पुरस्कार अनंत दास साहनी यांच्या “नेकेड वॉल” या लघुपटाला देण्यात आला. एक लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार उमाशंकर नायर, गाइती सिद्दीकी यांच्या “ग्रॅन्डफादर” या नेपाळी लघुपटाला देण्यात आला आहे. एक लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आजोबा आणि नात यांच्यातल्या हळूवार नात्याचे चित्रण या लघुपटात आहे.
यावर्षीपासून या महोत्सवात ‘जल संवर्धन आणि हवामानबदल’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी एक नवा पुरस्कार घोषित करण्यात आला. भारतीय दिग्दर्शक अरविंद एम यांच्या “ द वेटलँडस् वेईल” या लघुपटाला हा पुरस्कार मिळाला असून , एक लाख रुपये रोख, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
खास उल्लेखनीय प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पती विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शिका पायल कपाडिया यांच्या “ॲण्ड व्हॉट इज द समर सेइंग?” या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे तर याच विभागातला विशेष ज्युरी लक्षणीय चित्रपट म्हणून जोसी जोसेफ यांच्या “एको फ्रॉम द पुकपै स्काईज्” या माहितीपटाला प्रदान करण्यात आला.
R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1601797)
Visitor Counter : 242