माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वैयक्तिक अनुभवातून सामाजिक विषयांचा वेध घेण्याचा ‘सिंधुस्थान’ माहितीपटाच्या दिग्दर्शिका सपना भवनानी आणि 'विग' या लघुपटाचे दिग्दर्शक अतानु मुखर्जीं यांचा प्रयत्न


16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

Posted On: 30 JAN 2020 7:06PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2020

 

सपना भवनानी  स्वतः सिंधी आहेत आणि अनेक वर्षे त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. मोठ्या झाल्यावर 'आपण मूळचे कुठले? आपली पाळेमुळे कुठे आहेत? असे प्रश्न त्यांना सतावू लागले. या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांनी सिंध प्रांतात जाण्याचा निर्णय घेतला , मात्र त्यांना व्हिसा नाकारला गेला त्यामुळे त्या आपल्या मूळ गावी जाऊ शकल्या नाहीत. पण जिद्द न सोडता त्यांनी एका सहकाऱ्याकडून त्या सगळ्या भागांचे चित्रीकरण मागवले. त्या आधारावर आणि त्यांनी केलेल्या अध्ययनाच्या बळावर त्यांनी सिंधुस्थान हा माहितीपट तयार केला. ‘माझी, आणि एकूणच सिंधी समाजाची मुळे शोधण्याची आस, या माहितीपटासाठी प्रेरणा ठरली’ असे सपना भवनानी यांनी सांगितले. हा माहितीपट बनवण्यासाठी त्यांना आठ वर्षे लागली. या दोन्ही दिग्दर्शकांनी आज मिफ्फ दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

61 मिनिटांच्या या बहुभाषिक माहितीपटात, त्यांनी समाजाची संस्कृती आणि परंपरांचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे, या समुदायाशी निगडित कथा त्यांनी त्यांच्या अंगावर गोंदवून घेतल्या आहेत. विस्थापित झालेल्या सिंधी लोकांना आपल्या आयुष्यात पुन्हा स्थिरावण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, त्याचेही वर्णन या माहितीपटात आले आहे.

अतानु मुखर्जीं यांच्या ‘विग’ या हिंदी लघुपटाची नायिका, भारतातल्या  छोट्या गावातून मुंबईत करियर करण्यासाठी आली आहे. मुंबईत नोकरी करून आपल्या पायावर उभे राहण्याच्या तिच्या प्रयत्नात, तिला बराच संघर्ष करावा लागतो .मात्र तिच्या घरासमोर राहत असलेल्या एका तृतीयपंथी व्यक्तीशी भेट झाल्यावर तिचे साचेबद्ध विचार बदलतात. आपण अनेकदा जन्मभर वेगवेगळे पूर्वग्रह मनात ठेवून जगत असतो,त्या चष्म्यातूनच जगाकडे बघतो, असे पूर्वग्रह बाजूला ठेवून स्वच्छ मनाने समाजाकडे बघण्याची दृष्टी हा लघुपट देतो, असे अतानु यांनी सांगितले. या लघुपटात तृतीयपंथी व्यक्तीची प्रमुख भूमिका असल्याने, ही भूमिका वास्तवदर्शी होण्यासाठी तृतीयपंथी व्यक्तीचीच या भूमिकेसाठी निवड केली असेही त्यांनी सांगितले. मुंबईतल्या खऱ्या आयुष्यात पाहिलेल्या घटनांतूनच या लघुपटाची कथा सुचली, असेही त्यांनी सांगितले.

 सिंधुस्थान, मिफ्फ च्या राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात समाविष्ट करण्यात आला आहे, तर अतानु मुखर्जीं यांचा ‘विग’ हा हिंदी लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात दाखवला गेला.

 

R.Tidake/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 



(Release ID: 1601182) Visitor Counter : 192


Read this release in: English