पंतप्रधान कार्यालय

तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला पंतप्रधानांनी व्हिडीओ  कॉन्फरन्सिंग द्वारे  केलेले संबोधन

Posted On: 28 JAN 2020 8:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2020

 

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री विजय रूपाणी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी, नरेंद्र सिंह तोमर, पुरुषोत्तम रुपाला, गुजरातचे कृषी मंत्री आरसी  फाल्दु, मंचावर विराजमान मान्यवर, देश आणि विदेशातून आलेले  संशोधक आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू- भगिनीनो, 

 महात्म्यांच्या भूमीवर, महात्मा मंदिरात आपणा सर्वांचे स्वागत आहे.

जागतिक बटाटा परिषदेत, जगातल्या अनेक देशातले संशोधक आज या परिषदेला इथे उपस्थित आहेत, हजारो शेतकरी मित्र आणि संबंधीतही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. येत्या तीन दिवसात आपण  जगभरातल्या अन्न आणि पोषण  मागणीबाबत महत्वाच्या पैलूंविषयी चर्चा करणार आहोत, काही तोडगा काढणार आहोत. 

बटाटा परिषद, कृषी प्रदर्शन आणि  बटाटा फिल्ड डे या तिन्ही बाबी एकाच वेळी होत आहेत हे या परिषदेचे  वैशिष्ट्य आहे. सुमारे सहा हजार शेतकरी  फिल्ड डे वेळी गुजरातच्या शेतांवर जाणार आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. हा प्रशंसनीय प्रयत्न आहे असे मला वाटते.

मित्रहो, या वेळी बटाटा परिषद दिल्लीच्या बाहेर होत आहे, हजारो  बटाटा उत्पादक शेतकऱ्यांत होत आहे, ही चांगली बाब आहे. गुजरात मधे ही परिषद  होणे ही आणखी  महत्वाची बाब  आहे कारण बटाटा उत्पादकतेच्या दृष्टीने या राज्याचा देशात पहिला क्रमांक आहे.

 

मित्रहो,

गेल्या दोन दशकात, गुजरात, बटाटा उत्पादन आणि बटाटा निर्यात हब म्हणून  नावारूपाला आले आहे.  गेल्या 10-11 वर्षात, भारतात एकूण बटाटा उत्पादनात 20% वाढ झाली आहे तर गुजरातमध्ये ही वाढ  170 टक्के आहे.

गेल्या दोन दशकात घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि सिंचनाच्या आधुनिक आणि पुरेशा सुविधा यामुळे, बटाट्याचे प्रमाण आणि दर्जा यात वृद्धी झाली आहे. उत्तम धोरणात्मक निर्णयामुळे देशातले मोठे बटाटा प्रक्रिया कारखाने आज गुजरात मधे आहेत आणि बटाटा निर्यातदारही गुजरात स्थित आहेत. गुजरातमध्ये   शीत गोदामांचे मोठे आणि आधुनिक जाळे आहे. त्यातली अनेक गोदामे जागतिक दर्जाच्या सुविधांनी युक्त आहेत.

याशिवाय, सुजलाम-सुफलाम आणि सौनी योजनेच्या माध्यमातून गुजरातच्या अशा भागातही सिंचनाच्या सुविधा पोहोचल्या आहेत, ज्या भागांना आधी दुष्काळ झेलावा लागत असे.

 सरदार सरोवर धरणामुळे, गुजरातचा एक मोठा भाग सिंचनाखाली आला. कालव्यांचे इतके व्यापक जाळे, इतक्या कमी वेळात तयार करणे हे मोठे यश आहे.

सिंचनातही वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक दृष्टिकोनात सातत्याने सुधारणा होत आहे, हा दृष्टीकोन आपलासा केला जात आहे. पर ड्रॉप, मोअर क्रॉप या मूलमंत्राची जपणूक केली जात आहे. सूक्ष्म सिंचनावर लक्ष केंद्रित करण्यात आले, ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचनाला प्रोत्साहन देण्यात आले.

 

मित्रहो,

गुजरातचा हा प्रयोग गेल्या 5 वर्षात संपूर्ण देशात करण्यात आला आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट घेऊन आपण वाटचाल करत आहोत. यासाठी महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे प्रयत्न 

यामुळे अनेक धान्य आणि इतर खाद्य सामान उत्पादनात भारत  सर्वोच्च 3 देशांपैकी एक आहे. एके  काळी, आपल्यासमोर डाळीचे संकट आले होते मात्र या संकटावर देशाच्या  शेतकऱ्यांच्या निश्चयामुळे  मात करता आली.

शेती लाभदायी ठरावी यासाठी शेतापासून ते अन्न प्रक्रिया आणि वितरण केंद्रापर्यंत आधुनिक आणि व्यापक जाळे निर्माण करण्याला सरकारचे  प्राधान्य आहे. येत्या पाच वर्षात केवळ सिंचन आणि शेतीशी संबंधित पायाभूत संरचनेवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार  आहेत.

इतकेच नव्हे अन्न प्रक्रियेशी संबंधित क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत.  हे क्षेत्र 100 % थेट परकीय गुंतवणूकीसाठी खुले करण्याचा निर्णय असो किंवा पीएम किसान संपदा योजनेच्या माध्यमातून मूल्य वर्धन आणि मूल्य शृंखला विकासासाठी मदत असो,   प्रत्येक स्तरावर  प्रयत्न सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशात, अतिशय कमी काळात शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

 

मित्रहो,

शेतीसाठी खर्च कमी राहावा,  शेतीवर शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा  यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान  सन्मान निधी मुळे, शेतकऱ्याला  अनेक छोटे खर्च भागवण्यासाठी मदत होत आहे. आतापर्यंत 8 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या महिन्याच्या सुरवातीला एकाच वेळी 6 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, 12 हजार कोटी रुपये हस्तांतरित करून नवा विक्रम झाला आहे.

 

मित्रहो,

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातले मध्यस्थ कमी राहावेत  तसेच पिकाची नासाडी कमी राहावी याला आमचे  प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना कर्ज, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सहज शक्य राहावे यासाठी शेतकरी उत्पादक संघटनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. येत्या 5 वर्षात अशा 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना निर्माण व्हाव्यात यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. ई- नाम च्या रूपाने राष्ट्रीय कृषी बाजार, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

 

मित्रहो,

कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप सुरु करण्यावरही सरकारचा प्रयत्न आहे. ज्यामुळे, स्मार्ट कृषी क्षेत्रासाठी  शेतकऱ्यांना  डाटाबेसचा वापर करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना पाणी, खत आणि कीटक नाशके यांच्या योग्य उपयोगासाठी मदत  होईल. खर्च कमी होईल आणि जागतिक  बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांची भागीदारी सुनिश्चित होईल.

 

मित्रहो,

आपल्यासारखे वैज्ञानिक, संशोधक,नाशिवंत  भाज्या, अधिक काळ टिकाव्यात यासाठी,माफक दरातला उपाय शोधतील तेव्हाच सरकारचे प्रयत्न अधिक सफल ठरतील. येणाऱ्या दशकातली आव्हाने पाहता, उत्पादकता, परवडणारे दर आणि शेतकऱ्याला कृषी मालाला उचित भाव मिळावा असे उपाय करावे लागतील.

याकरिता, आपल्याला असे बियाणे तयार करावे लागेल, जे पाण्याचा कमी वापर करेल, अधिक पोषक असेल आणि त्याची उत्पादकताही जास्त असेल.  बियाण्यांची किमत कमी आणि त्याच्याशी संबंधित उत्पादन  किंमतही जास्त नसावी यासाठी आपले प्रयत्न हवेत.

याचबरोबर, कृषी क्षेत्रात, आधुनिक जैवतंत्रज्ञान, कृत्रिम  बुद्धीमत्ता, ब्लॉक चेन, ड्रोन तंत्रज्ञान अशा नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर होऊ शकतो यासाठी आपल्या सूचना महत्वाच्या राहतील.

मित्रहो,

बटाट्याची उपयुक्तता पाहता, बटाटा  उप  क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी  नवे धोरण आणि संशोधन कार्यक्रम तयार  करण्याची वेळ आली आहे. भूक आणि दारिद्र्य यांच्याशी लढा आणि जागतिक अन्न सुरक्षा हे  या धोरणाचे आणि कार्यक्रमाचे मूळ असले पाहिजे.

आपण सर्वजण हे करण्यासाठी सक्षम आहात. आपल्या प्रयत्नामुळेच हे साध्य झाले आहे, 19 व्या शतकात, बटाट्यावरच्या रोगामुळे युरोप आणि अमेरिकेत जी स्थिती निर्माण झाली  त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली नाही.

21 व्या शतकात कोणीही उपाशी राहू नये, कुपोषित राहू नये यासाठीची जबाबदारी आपणावर आहे. शेतकरी असो, व्यापारी असो, वैज्ञानिक असो, प्रगतीशील व्यापारी असो, अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करत असो, आपणा   सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. येत्या तीन दिवसात आपण या दिशेने गंभीर विचार मंथन कराल असा मला विश्वास आहे.

भारतात, गुजरातमध्ये आल्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. दिल्लीबाहेर हा कार्यक्रम आयोजित करणे इतकेच नव्हे तर देश आणि जगातल्या लोकांना आपण शेतात घेऊन  जाणार आहात,   शेतकऱ्याबरोबर त्यांचा संवाद घडवून आणणार आहात, यासाठी मी कृषी विभागाचे अभिनंदन करतो.  धरतीशी जोडलेला  हा कार्यक्रम येत्या काही दिवसात किती  यशस्वी ठरेल याचा  अंदाज मी करू शकतो. गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत, आपला प्रवास सुखकर  राहू दे. गुजरातच्या  आतिथ्यशीलतेचा आनंद आपण घ्यावा, गांधीजींशी संबंधित स्थानांना भेट द्यावी,  स्टच्यू ऑफ युनिटीच्या आठवणी बरोबर घेऊन जाव्या, या अपेक्षेसह आपले खूप-खूप आभार व्यक्त करतो. जय जवान जय किसान !

धन्यवाद!

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1601097) अभ्यागत कक्ष : 160
Read this releasein: English