माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार डॉ एस कृष्णस्वामी यांना प्रदान

Posted On: 28 JAN 2020 7:46PM by PIB Mumbai

 

मुंबई, 28 जानेवारी 2020

 

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात प्रतिष्ठेचा डॉ व्ही शांताराम पुरस्कार, ज्येष्ठ माहितीपट निर्माते डॉ एस कृष्णस्वामी यांना, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट आणि लघुपट निर्मिती क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना मिफ्फ मध्ये व्ही शांताराम पुरस्काराने गौरवण्यात येते.

81 वर्षीय डॉ एस कृष्णस्वामी भारतातील ज्येष्ठ आणि प्रतिभावंत माहितीपट निर्माते आणि लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत 200 पेक्षा जास्त माहितीपट आणि लघुपट बनवले असून एक डझनपेक्षा जास्त मालिकांची देखील निर्मिती केली आहे. कृष्णस्वामी यांच्या माहितीपटांचे विषय विस्तृत असून त्यात उद्योगजगत, कृषी, मतदार जागृती, विविध बहुआयामी मान्यवरांच्या जीवनकार्यावरील चरित्रपट,असे अनेक विषय आहेत. भारतीय इतिहास, कला आणि संस्कृती यावर त्यांनी तयार केलेला चार तासांचा माहितीपट , फ्रॉम इंडस व्हॅली टु इंदिरा गांधी" जागतिक पातळीवर देखील खूप गाजला. 'इंडियन इंप्रिंट्स' नावाची त्यांची दूरदर्शनवरची मालिकाही खूप लोकप्रिय झाली होती .प्राचीन भारतीय संस्कृतीचा एकूणच दक्षिण पूर्व आशियावर असलेला प्रभाव विशद करणारी त्यांची ही मालिका 2009 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. 

 

भारतीय चित्रपटांवर डॉ कृष्णस्वामी यांनी 1963 साली एरीक बर्नोव्ह यांच्यासोबत "इंडियन फिल्म" हे पुस्तकही लिहिलं.अलीकडेच त्यांनी लिहिलेले पुस्तक, "अँन अनलाईकली केमेस्ट्री : ऑटोबायोग्राफी ऑफ अ कपल", वाचकांसमोर आधुनिक भारताचं चित्र उभे करते. 

डॉ. कृष्णस्वामी यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. यात पद्मश्री, युएस आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि व्हिडीओ महोत्सव, लॉस अँजेलिस चा जीवनगौरव पुरस्कार अशा प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. 

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1600873) Visitor Counter : 147


Read this release in: English