माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रंगतदार सोहळ्यात उद्घाटन


मिफ्फ 2020 मध्ये डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ महितीपट निर्माते एस. कृष्णस्वामी यांना प्रदान

महितीपट आणि लघुपट निर्मात्यांनी आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून निर्मिती करावी, सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील- बाबूल सुप्रियो

16 व्या मिफ्फसाठी राष्ट्रीय स्तरावर 729 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 144 चित्रपटांच्या प्रवेशिका

Posted On: 28 JAN 2020 7:36PM by PIB Mumbai

 

मुंबई, 28 जानेवारी 2020

 

दक्षिण आशियातल्या माहितीपट,लघुपट आणि ॲनिमेशनपटांसाठीचा सर्वात जुना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोळाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - मिफ्फ 2020चे आज वरळीतल्या नेहरू सेंटर इथं रंगतदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

महितीपट आणि लघुपट निर्मिती क्षेत्रातील प्रतिष्ठेचा डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ महितीपट निर्माते आणि लेखक एस कृष्णस्वामी यांना केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांतराम देखील यावेळी उपस्थित होते.  10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. माहितीपट आणि लघुपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना , प्रत्येक मिफ्फ मध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस कृष्णस्वामी यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. माहितीपटांसाठी समर्पित अशा महोत्सवात जीवनगौरव सन्मान मिळणे अत्यंत आनंदाची भावना आहे, त्यातही व्ही शांताराम यांच्यासारख्या चित्रमहर्षीच्या नावाने मिळणारा सन्मान ही विशेष गौरवाची बाब आहे, असे ते म्हणाले. आपल्या फ्रॉम इंड्स व्हेली टू इंदिरा गांधी’ या चार तासांच्या महितीपटाची निर्मिती आणि प्रदर्शनाची रंजक कथाही त्यांनी यावेळी सांगितली. या माहितीपटात भारताच्या 5000 वर्षांच्या इतिहास आणि संस्कृतीचा वेध घेण्यात आला आहे.

यावेळी बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत आणि मिफ्फ मध्ये दरवेळी येणार्‍या चित्रपटांची संख्या आणि दर्जा वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘माहितीपट आणि लघुपटांना फीचर फिल्म्ससारखे ग्लॅमर नसले तरी कोणत्याही समजारचनेत सामाजिक-सांस्कृतिक वास्तव, प्रभावीपणे मांडणारे सशक्त माध्यम महितीपट आणि लघुपट असतात,’ असे बाबूल सुप्रियो यावेळी म्हणाले. महितीपट आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रयत्नांमागे समाजातल्या समस्या मांडून त्यावर उपाय शोधण्याची धग असते, असे सुप्रियो म्हणाले. आजच्या डिजिटल युगात तरुण मुले एक छोटा कॅमेरा घेऊनही चित्रपट तयार करू शकतात, अशा सर्व युवा प्रतिभांचे मिफ्फच्या व्यासपीठावर स्वागतच होईल, असा विश्वास सुप्रियो यांनी व्यक्त केला. चित्रपट क्षेत्र आणि या क्षेत्रातील प्रतिभावंताविषयी केंद्र सरकारच्या भावना अत्यंत स्वछ आणि पूर्वग्रहविरहित आहेत, त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या आणि येऊ इछिणार्‍या सर्वांनी केवळ आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवावा, सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. गेली अनेक वर्षे सातत्याने या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व विभागांचे अभिनंदन केले.  

मुंबईत आयोजित होणारा हा महोत्सव, माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांना आणि या क्षेत्रातील नवोदित कलाकारांना एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ देणारा आहे, असे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. गेली अनेक वर्षे  सातत्याने हा महोत्सव मुंबईत आयोजित होत असून आता हा महोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग झाला आहे, असे अमित देशमुख यावेळी म्हणाले. महितीपट आणि लघुपट क्षेत्रातल्या कलावतांच्या समस्या सोडवण्यासाठी  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा असं आवाहन करत, महाराष्ट्र सरकार देखील त्यांना  सर्वतोपरी मदत करेल, असे अमित देशमुख म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुलकुमार तिवारी यावेळी म्हणाले की मिफ्फमुळे 1990 पासून माहितीपट आणि लघुपटांच्या चळवळीला बळकटी मिळाली आहे, माहितीपट आणि लघुपटांच्या क्षेत्रातील मिफ्फ हा आज जगातील सर्वोत्तम महोत्सव आहे, असे अतुलकुमार तिवारी यावेळी म्हणाले. 

विद्यार्थ्यांना या महोत्सवाकडे आकर्षित करण्यासाठी आयडीपीएने यावर्षी तीन महाविद्यालयांमध्ये चित्रपट प्रक्षेपण आयोजित केले आहे,अशी माहिती, भारतीय माहितीपट  निर्माते संघटना-आयडीपीए च्या अध्यक्षा उषा देशपांडे यांनी यावेळी दिली. माहितीपट निर्मितीला सरकार, माध्यमे आणि प्रेक्षकांनीही पाठबळ द्यायला हवे अशी विनंती यावेळी उषा देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांना केली.

कार्यक्रमाची सुरुवात, दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर, केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रिओ, राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव अतुलकुमार तिवारी, आयडीपीए च्या अध्यक्षा उषा देशपांडे आणि फिल्म्स डीव्हीजनच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर मिफ्फची संकल्पना आणि आजवरचा प्रवास सांगणारी ध्वनिचित्रफीत दाखवली गेली.

या महोत्सवासाठी भारतीय चित्रपट स्पर्धा गटासाठी ज्यूरी म्हणून काम करणारे कॅनडाचे थॉमस  व्हॉ, बल्गेरियाचे पेंचो कूंचेव्ह. भारताचे ए के बीर, किरीट खुराना आणि उत्पल बोरपूजारी या सर्व मान्यवरांचा सत्कार, संस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटासाठी ज्यूरी म्हणून काम करणारे चित्रपट क्षेत्रातील दिग्गज, यात सिंगापूरच्या रेहिना परेरा, जपानच्या हरूका हम्मा, फ्रांसचे रॉबर्ट काहेन, भारताचे करून, भारताचेच अमित गंगर या सर्व मान्यवरांचा सन्मान केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या हस्ते करण्यात आला.

16व्या मिफ्फमध्ये चित्रपट रसिकांचे स्वागत, नृत्यांगना हर्षदा जांभेकर आणि चमूने सादर केलेल्या लावणीने करण्यात आले. त्यानंतर भारतातल्या विविध शास्त्रीय नृत्य कलांचा संगम असलेला ‘नृत्यरंग’ हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’  ही भावना व्यक्त करणारा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. सुप्रसिद्ध ओदिशी नृत्यांगना शुभदा वराडकर यांनी या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन केले होते.

फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालिका आणि या महोत्सवाच्या संचालिका स्मिता वत्स-शर्मा यांनी मान्यवरांचे आभार मानत या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर, रशियन ॲनिमेशन चित्रपट ‘वुई कान्ट लिव विदाऊट कॉसमॉस’ या कोस्टटॅटींन ब्रॉझिट यांचा ॲनिमेशनपट, ऑस्करसाठी नामांकन मिळालेला लघुपट ‘फॉव्ह’ आणि गौतम बोरा यांच्या ‘ऱ्हाईम ॲण्ड ऱ्हाईम ऑफ लूम’ हा माहितीपट दाखवण्यात येत आहे. सहा दिवस चालणार्‍या या महोत्सवात, चित्रपटांचे शो आणि महोत्सवातील इतर कार्यक्रम फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होतील. तीन फेब्रुवारीला वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहात ह्या महोत्सवाची सांगता होईल.

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1600871)
Read this release in: English