पंतप्रधान कार्यालय

जलशक्ती अभियानाला मिळणाऱ्या जनप्रतिसादामुळे अभियानाची जलदगतीने यशस्वीतेकडे वाटचाल-पंतप्रधान


‘मन की बात’मधून सांगितल्या जल संवर्धन यशस्वीतेच्या गाथा

Posted On: 26 JAN 2020 11:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2020

 

जल शक्ती अभियान,

आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांगितले की, जलशक्ती अभियानाला मिळत असलेल्या जन प्रतिसादामुळे हे अभियान जलदगतीने यशस्वी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या अभियानाअंतर्गत जलसंवंर्धनासाठी होत असलेले प्रयत्नही त्यांनी सांगितले.

राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्याविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘तिथल्या दोन ऐतिहासिक विहिरी कचरा आणि अस्वच्छ पाण्याने भरून गेल्या होत्या. मात्र, एकदिवस, भद्रायू आणि ठाणावाला पंचायतच्या लोकांनी या विहिरींची स्वच्छता आणि पुनर्भरण करण्याचा निश्चय केला. जलशक्ती अभियानाअंतर्गत त्यांनी हे काम सुरू केले. पावसाळ्यापूर्वी सर्व लोकांनी एकत्र येत अस्वच्छ कचरा, पाणी आणि शेवाळ्याने भरलेली विहीर स्वच्छ करायला घेतली. काहींनी त्यासाठी पैशांची मदत केली, तर काही लोकांनी श्रमदान केले. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच या पायऱ्यांच्या विहिरी आता अनेकांसाठी ‘जीवनवाहिनी’ झाल्या आहेत.’

त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथल्या सराही तलाव देखील गावकऱ्यांच्या श्रमदानातून पुनरुज्जीवित करण्यात आला. उत्तराखंडच्या अल्मोरा-हल्दवानी महामार्गावर असलेल्या सुनियाकोट गावातही लोकांनी एकत्रित श्रमशक्तीतून जलसंवर्धनाचे काम केले. पाणी आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी पैसा उभा केला, श्रमदान केले, यातून जलवाहिनी आणि पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. दशकांपासूनचा पाण्याचा प्रश्न जनसहभागातून सोडवला गेला.

जलसंवर्धनाच्या अशाच यशस्वीतेच्या गाथा सर्वांनी #jalshakti4india यावर पाठवाव्यात, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

केंद्र सरकारने जुलै 2019 पासून जलसंवर्धन आणि जलसुरक्षेसाठी ‘जल शक्ती अभियान’ हाती घेतले आहे. जलटंचाई आणि दुष्काळग्रस्त भागात हे अभियान राबवले जात आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1600667) Visitor Counter : 167
Read this release in: English