पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात" द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 जानेवारी 2020)

Posted On: 26 JAN 2020 6:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2020

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा!! 2020 मध्ये आज आपण पहिल्यांदाच ‘मन की बात’च्या माध्यमातून भेटत आहोत. या वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. तसं पाहिलं तर या दशकातलाही हा पहिला कार्यक्रम आहे. मित्रांनो, यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामुळे आपल्याशी ‘मन की बात’ करण्यासाठी जी नियमित वेळ असते, त्यामध्ये परिवर्तन करणं योग्य वाटलं. आणि एक वेगळी वेळ निश्चित करून आत्ता आपल्याबरोबर ‘मन की बात’ करत आहे.

मित्रांनो, दिवस बदलत राहतात, आठवडे जातात, महिनेही बदलत राहतात, वर्ष बदलतात. परंतु भारतातल्या लोकांचा उत्साह आणि ‘आपणही काही कमी नाहीत, आम्हीही काहीतरी करूनच दाखवू’ ‘कॅन डू -आम्ही करू शकतो! ही ‘कॅन डू’ची जी भावना आहे ना, तो आता दृढसंकल्प बनून सामोरी येत आहे. देश आणि समाज यांच्यासाठी काही करण्याची प्रबळ इच्छा, मनापासूनची भावना प्रत्येक दिवशी पहिल्यापेक्षा अधिकाधिक बळकट होत आहे.

मित्रांनो, ‘मन की बात’ च्या व्यासपीठावर आपण सर्वजण आज पुन्हा एकदा एकत्रित आलो आहोत. नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि देशवासियांना नवनवीन गोष्टीं साज-या करण्यासाठी, एकूण ‘भारत’साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. ‘मन की बात’ म्हणजे ‘‘शेअरींग, लर्निंग आणि ग्रोईंग टुगेदर’’ यांचं  एक खूप चांगलं आणि सहज व्यासपीठ बनलं  आहे. दर महिन्याला हजारोंच्या संख्येनं  लोक आपले विचार, मते, आपण करीत असलेले प्रयत्न, आपले अनुभव ‘शेअर’ करत असतात. त्यांच्यामधून समाजाला प्रेरणा देणा-या काही गोष्टी, लोकांनी केलेले असामान्य प्रयत्न यावर चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळते.

आता ‘‘कोणी तरी ही गोष्ट करून दाखवली आहे’’ मग आपण का बरं ती गोष्ट करू शकणार नाही? हीच गोष्ट जर संपूर्ण देशामध्ये केली तर एक मोठे परिवर्तन घडून येवू शकते का? या सकारात्मक गोष्टीचे सर्वत्र अनुकरण करणे म्हणजे समाजाची एक सहज सवय बनावी, म्हणून ती विकसित करता येईल का? हे घडून येत असलेले परिवर्तन- लोकांचा स्थायीभाव बनू शकेल का? अशाच काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत घेत, दर महिन्याला ‘मन की बात’ मध्ये काही अपिल म्हणजेच आवाहन केले जाते आणि काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प केला जातो...हे असंच छान सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनेक लहान-लहान संकल्प केले असणार. जसं की- ‘नो टू सिंगल यूज प्लास्टिक’ म्हणजेच एकदाच वापरू शकणा-या पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिक वापराला नकार देणे. ‘खादी’ आणि स्थानिक स्तरावर बनत असलेल्या वस्तूंचा वापर करणे, स्वच्छतेची गोष्ट असो, कन्यावर्गाचा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट असो, कमीत कमी रोकड वापरण्याचा आग्रह करणे- हा एक नवा पैलू असो, अशा अनेक संकल्पांचा जन्म या हलक्या-फुलक्या ‘मन की बात’ मधून झाला आहे. आणि विशेष म्हणजे या संकल्पांना दृढ करण्याचं कामही तुम्ही लोकांनीच केलं आहे.

अलिकडेच मला एक खूप छान, ममतामयी पत्र मिळालंय. बिहारचे श्रीमान शैलेश यांनी ते लिहिलं आहे. वास्तविक शैलेशजी सध्या बिहारमध्ये वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी सांगितलंय की, ते दिल्लीमध्ये राहून एका एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थेचे काम करत आहेत. श्रीमान शैलेश जी यांनी लिहिलंय - ‘‘मोदीजी, तुम्ही प्रत्येक ‘मन की बात’ मध्ये काही ना काही आवाहन करीत असता. त्यापैकी अनेक आवाहनांचे मी मनापासून पालन केलं आहे. या थंडीच्या दिवसांत मी लोकांकडे जावून कपडे जमा केले आणि ते सर्व ज्यांना या कपड्यांची आवश्यकता आहे, अशा लोकांना वाटले. ‘मन की बात’ मध्ये ऐकून मी अनेक गोष्टी करायला प्रारंभ केला आहे. परंतु, हळूहळू काही गोष्टी मी विसरून जायला लागलो आणि काही गोष्टी तर आपोआपच सुटून गेल्या. मात्र या नवीन वर्षात मी ‘मन की बात’ या विषयी एक ‘चार्टर’च बनवला आहे. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांची एक सूचीच तयार केली आहे. लोक नव्या वर्षात ज्याप्रमाणे ‘न्यू इयर रिझोल्यूशन’- नवीन वर्षाचा संकल्प बनवतात, तसंच या नव्या वर्षातला माझा हा ‘सोशल रिझोल्यूशन’ - ‘सामाजिक संकल्प’ आहे. या सगळ्या खूप लहान-लहान गोष्टी आहेत, मात्र या संकल्पांमुळेच खूप मोठे परिवर्तन घडून येवू शकतं , असं मला मनापासून वाटतं. पत्रासोबत मी पाठवलेल्या ‘चार्टर’वर आपण स्वाक्षरी करून मला परत पाठवू शकणार?’’ शैलेश जी- तुमचं खूप-खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छाही! नवीन वर्षात केलेल्या सामाजिक संकल्पासाठी ‘मन की बात चार्टर’ ही अतिशय उत्तम नवकल्पना आहे. त्यासाठी माझ्यातर्फे मनापासून सदिच्छा लिहून हे चार्टर मी आपल्याला जरूर परत पाठवतो. मित्रांनो, हे ‘मन की बात चार्टर’ ज्यावेळी मी वाचत होतो, त्यावेळी खरोखरीच खूप आश्चर्य वाटलं. कितीतरी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. कितीतरी हॅशटॅग आहेत. आणि आपण सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही केले आहेत. कधी आपण ‘संदेश- टू सोल्जर्स’असं आवाहन केलं होतं. आणि आपल्या जवानांबरोबर भावानात्मक रूपानं दृढ नातं तयार करण्याचं अभियान चालवलं होतं. ‘खादी फॉर नेशन- खादी फॉर फॅशन’ मोहीम सुरू केली होती. यानंतर खादीच्या विक्रीने नवीन विक्रम प्रस्थापित केला. ‘स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचा मंत्र आपण सर्वांनी स्वीकारला. तसंच ‘आपण फिट तर भारत फिट’ असं आवाहन करून फिटनेसविषयी जागरूकता वाढवली. ‘माय क्लिन इंडिया’ तसंच ‘स्टॅच्यू क्लिनिंग’ यामधून सर्व पुतळे-प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी जनतेची चळवळ सुरू केली. हॅश-टॅग नो टू ड्रग्स, हॅश-टॅग भारत की लक्ष्मी, हॅश-टॅग सेल्फफॉरसोसायटी, हॅश-टॅग सुरक्षा बंधन, हॅश-टॅग डिजिटल इकॉनॉमी, हॅश-टॅश रोड सेफ्टी.... ओ हो हो हो!! अगणित आहेत....!!

शैलेश जी, तुमच्या या मन की बात चार्टरला पाहून मला जाणवलं की, ही सूची तर खरोखरीच खूप मोठी आहे. चला तर मग, हा प्रवास असाच सुरू ठेवूया! यावेळच्या ‘मन की बात चार्टर’मध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही एखाद्या नवीन  गोष्टीची जोड द्या. हॅश-टॅग वापरून सर्वांच्या सहकार्याने आणि अभिमानाने आपलं योगदान सर्वांबरोबर जरूर ‘शेअर’ करा. आपल्या मित्रांना, कुटुंबातल्या सर्व सदस्यांना यासाठी प्रेरित करा. ज्यावेळी प्रत्येक भारतवासी एक पाऊल पुढे टाकतो, त्यावेळी आपला देश 130 कोटी पावलं पुढे जात असतो. म्हणूनच चरैवेति-चरैवेति-चरैवेति अर्थातच चालत रहा- चालत रहा- चालत रहा... हा मंत्र स्वीकारून आपले प्रयत्न अखंड सुरू ठेवले पाहिजेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण आत्ताच ‘मन की बात चार्टर’ याविषयी चर्चा केली. स्वच्छतेनंतर जनसहभागीतेची भावना, ‘पार्टिसिपेटिव्ह स्पिरीट’ आज आणखी एका क्षेत्राविषयी वेगाने वाढतेय, हे इथं नमूद करावंसं वाटतंय. हे क्षेत्र आहे- जल संरक्षण ! जल संरक्षणासाठी अनेक व्यापक आणि नवनवीन संकल्पना देशभरातल्या  प्रत्येक कानाकोप-यात राबवल्या जात आहेत. गेल्या मौसमी पावसाला ज्यावेळी प्रारंभ झाला, त्यावेळी जल संरक्षणाच्या मोहिमेलाही प्रारंभ झाला, हे सांगताना मला खूप आनंद होतोय. जन भागीदारीमुळे हे  ‘जल शक्ती अभियान’ अतिशय यशस्वी होण्याच्या दिशेने पुढं  जात आहे. देशात मोठ्या संख्येने तलावांची तसंच  जलसाठ्यांची निर्मिती झाली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अभियानामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी आपआपल्या परीने योगदान दिलं. आता, राजस्थानातल्या झालोर जिल्ह्यातलं काम पहा. इथल्या दोन ऐतिहासिक बावडी म्हणजे विहिरी या कचरा, घाण यांचं साम्राज्य बनल्या होत्या. भद्रायू आणि थानवाला पंचायतीमध्ये शेकडो लोकांनी ‘जलशक्ती अभियाना’अंतर्गत या विहिरी पुनर्जीवित करण्याचा संकल्प केला. एकदा लोकांनी ठरवलं की, मग काय पाहिजे? पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व लोकांनी मिळून या बावडींमध्ये जमा असलेले  घाण पाणी, कचरा, असं सगळं काही स्वच्छ केलं. या अभियानासाठी कोणी श्रमदान केलं तर कोणी धनदान केलं. आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणजे या दोन्ही बावडी आज तिथल्या जीवनरेखा बनल्या आहेत. थोडीफार अशीच गोष्ट उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथली आहे. इथं 43 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेला सराही तलाव जणू अखेरच्या घटका मोजत होता. परंतु ग्रामीण भागातल्या जनतेनं आपल्या संकल्पशक्तीने या तलावामध्ये नवीन प्राण आणले. इतक्या मोठ्या अभियानाच्‍या आड इथल्या जनतेनं कोणालाही येवू दिलं नाही की,  हे काम थांबवलं नाही. एकापाठोपाठ एक अनेक गावांना आपल्याशी जोडून घेतलं. गावकरी मंडळींनी सराही तलावाच्या सर्व बाजूने एक मीटर उंचीची तटभिंतच बांधून काढली. आता तलाव पाण्यानं भरगच्च भरला आहे. आजू-बाजूला स्वच्छ छान परिसर निर्माण झाला आहे... पक्ष्यांच्या कलरवानं इथला आसमंत भरून गेला आहे. 

उत्तराखंडमधल्या अलमोडा -हलव्दानी महामार्गाला लागून असलेल्या सुनियाकोट गावामध्येही जन भागीदारीतून असेच एक उदाहरण सामोरं आलं आहे. पाणी टंचाईच्या संकटाशी सामना करताना आपणच गावापर्यंत पाणी आणण्याचा निर्धार गावकरी मंडळींनी केला. एकदा ठरवलं की काय होणार नाही? लोकांनी मिळून निधी जमा केला. योजना तयार केली. सर्वांनी श्रमदान केलं आणि जवळपास एक किलोमीटर अंतरावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली. पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलं आणि पहाता पहाता दोन दशकापासून असलेली पाण्याची समस्या कायमची संपुष्टात आली. याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये बोअरवेललाच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चं साधन बनवण्याची नवीन संकल्पना अतिशय उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येतंय. देशभरामध्ये जल संरक्षणाविषयी केलेल्या प्रयोगांच्या अगणित कहाण्या सांगण्यासारख्या आहेत. यामुळे नव भारताच्या संकल्पाला बळकटी मिळत आहे. आज आपल्या जलशक्ती चँपियन्सच्या कथा ऐकण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जल-संचय आणि जल संरक्षण याविषयी आपण जर काही प्रयोग केले असतील, किंवा आपल्या आजूबाजूला असे काही प्रयोग होत असतील, तर त्यांची माहिती, छायाचित्र किंवा व्हिडिओ ‘‘हॅश-टॅग जलशक्तीफॉरइंडिया’’ यावर जरूर शेअर करावी, असं मी आपल्याला  आवाहन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि विशेष करून माझ्या युवा मित्रांनो, आज ‘मन की बात’च्या माध्यमातून मी आसामच्या सरकारचे आणि आसामच्या लोकांचे ‘खेलो इंडिया’चे यजमानपद शानदारपणे भूषवल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, दि. 22 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये तिस-या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या जवळपास सहा हजार क्रीडापटूंनी भाग घेतला होता. खेळांच्या या महोत्सवामध्ये जुने 80 विक्रम मोडले. आणि विशेष म्हणजे यामध्ये 56 विक्रम मोडण्याचे काम तर आमच्या कन्यांनी केलं. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही सिद्धी, ही कमाल आमच्या मुलींनी करून दाखवली आहे. या क्रीडा स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूचे  आणि विजेत्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. त्याच जोडीला ‘खेलो इंडिया’च्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे, प्रशिक्षकांचे आणि तांत्रिक अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त करतो. दरवर्षी ‘खेलो इंडिया’ या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या क्रीडापटूंची संख्या सातत्याने वाढते आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप सुखद गोष्ट आहे. यामुळे शालेय वयातच मुलांचा कल आता खेळ प्रकारांमध्ये किती वाढतोय, हे दिसून येत आहे. 2018मध्ये ज्यावेळी ‘खेलो इंडिया’ क्रीडास्पर्धा प्रारंभ झाल्या, त्यावर्षी साडे तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. परंतु अवघ्या तीन वर्षांमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंची संख्या सहा हजारांपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे. इतकंच नाही तर, केवळ तीन वर्षांमध्ये ‘खेलो इंडिया गेम्स’च्या माध्यमातून बत्तीसशे प्रतिभाशाली मुले समोर आली आहेत. यामध्ये अनेक मुले गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली आहेत. ‘खेलो इंडिया गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या मुलांचे आणि त्यांच्या माता-पित्यांचे धैर्य आणि दृढ संकल्प यांच्या कथाही अशाच ऐकण्यासारख्या आहेत. त्या प्रत्येक हिंदुस्तानीला प्रेरक ठरतील. आता गुवाहाटीच्या पूर्णिमा मंडल हिची कहाणी घ्या- ती स्वतः गुवाहाटी नगरपालिकेमध्ये एक सफाई कर्मचारी आहे. परंतु त्यांची कन्या मालविकाने फुटबॉलमध्ये आपलं कौशल्य दाखवलं तर त्यांचा मुलगा सुजीत यानं खो-खो खेळात तर दुसरा मुलगा प्रदीप यानं हॉकीमध्ये आसामचं प्रतिनिधित्व केलं.

अशाच प्रकारची कथा तामिळनाडूच्या योगानंथनची आहे. योगानंथन स्वतः तामिळनाडूमध्ये विड्या वळण्याचे काम करतात. परंतु त्यांची कन्या पूर्णाश्री हिनं वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून सर्वांची मनं जिंकली.

ज्यावेळी मी डेव्हिड बेकहॅमचं नाव घेतो, त्यावेळी तुम्ही सगळे लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलर असं नक्कीच म्हणणार. परंतु आता आपल्याकडेही एक डेव्हिड बेकहॅम आहे आणि त्यानं गुवाहाटीच्या युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. तेही सायकलिंग स्पर्धेमध्ये 200 मीटरच्या  स्प्रिंट इव्हेंटमध्ये! काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळी अंदमान-निकोबारला गेलो होतो, तिथं कार-निकोबार या व्दीपावर डेव्हिड वास्तव्य करतो. तो लहान असतानाच त्याच्या डोक्यावरच मातापित्यांचं छत्र हरपलं. त्याचे काका त्याला फुटबॉलर बनवू इच्छित होते, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव प्रसिद्ध फुटबॉलरवरून डेव्हिड ठेवलं.  परंतु या डेव्हिडचं मन तर सायकलिंगमध्ये रमलं. ‘खेलो इंडिया’ या योजनेमध्ये त्याची निवडही झाली. आणि आज पहा, सायकलिंगमध्ये डेव्हिडनं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

भिवानीचा प्रशांतसिंह कन्हैया याने पोल व्हॉल्ट या इव्हेंटमध्ये स्वतःचा विक्रम मोडतानाच, नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 19 वर्षाचा प्रशांत एका शेतकरी कुटुंबातून आला आहे. प्रशांत पोल व्हॉल्टचा सराव मातीमध्ये करत होता, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. त्याच्याविषयी ही माहिती  मिळाल्यानंतर क्रीडा विभागाने त्याच्या प्रशिक्षकाला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये क्रीडा अकादमी चालवण्यासाठी मदत केली आणि आज प्रशांत तिथंच प्रशिक्षण घेतोय.

मुंबईची करीना शांक्ता हिची कहाणीही वेगळीच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही, हा तिचा स्वभाव प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. करीनाने स्विमिंगमध्ये 100 मीटर ब्रेस्ट-स्ट्रोक स्पर्धेत भाग घेतला. 17 वर्षाच्या आतल्या गटामध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकून नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या करीनाला एका अतिशय अवघड प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिच्या गुडघ्याला जखम झाल्यामुळं तिला स्विमिंगचं प्रशिक्षण अर्ध्‍यावरच सोडावं लागलं होतं. परंतु करीना आणि तिच्या आईनं या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं आणि आज त्याचे सुपरिणाम आपल्या सर्वांसमोर आहेत. या सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. ज्या पालकांनी गरीबी म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीमधला आणि भविष्यामधला अडथळा आहे, असं कधीच मानलं नाही. अशा सर्व खेळाडूंच्या पालकांनाही देशवासियांच्यावतीने  नमन करतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपला नेमका कल कशाकडे आहे, हे समजतं , आपल्यातलं  क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते त्याचबरोबर इतर दुस-या राज्यांच्या संस्कृतीची ओळखही होते, हे आपल्याला माहिती आहेच. म्हणूनच आम्ही ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या धर्तीवरच  दरवर्षी ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, पुढच्या महिन्यात दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ओडिशातल्या कटक आणि भुवनेश्वर इथं पहिल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन केलं जात आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त क्रीडापटूंनी पात्रता फेरी पूर्ण केली आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, परीक्षेचा हंगाम आता जवळ आला आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी आता आपआपल्या परीक्षेच्या तयारीला अंतिम रूप देण्यात नक्कीच गर्क असतील. देशातल्या कोट्यवधी विद्यार्थी मित्रांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’या कार्यक्रमाचा अनुभव घेतल्यानंतर मी आता मोठ्या विश्वासानं सांगतो की, या देशातल्या युवावर्गामध्ये आत्मविश्वास अगदी पूर्णपणे भरला आहे. आणि हे युवक प्रत्येक आव्हान पेलण्यास समर्थ आहेत.

मित्रांनो, एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे कडक थंडीचा काळ, अशा वातावरणामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की, तुम्ही स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडाफार व्यायाम जरूर करावा, थोडावेळ खेळावं. कोणताही खेळ खेळणं म्हणजे फिट राहण्याचा मूलमंत्र आहे. तसं पाहिलं तर अलिकडच्या काळामध्ये ‘फिट इंडिया’ अभियानामध्ये अनेक कार्यक्रम होत असलेले दिसून येतात. 18 जानेवारी रोजी देशभरातल्या युवकांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये लाखो देशवासियांनी फिटनेसचा संदेश दिला. आपला नव भारत संपूर्णपणे फिट असावा, यासाठी प्रत्येक पातळीवर जे प्रयत्न केले जात आहेत, ते पाहून उत्साह निर्माण होतो. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली ‘फिट इंडिया स्कूल’ या मोहिमेला आता चांगलंच यश मिळत आहे. आत्तापर्यंत 65हजारांपेक्षा जास्त शाळांनी या मोहिमेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ‘फिट इंडिया स्कूल’चे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. देशातल्या उर्वरित सर्व शाळांनाही माझा आग्रह आहे की, त्यांनी फिजिकल ॲक्टिव्हीटी म्हणजे शारीरिक कसरती-कवायती आणि क्रीडा यांची सांगड शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर घालावी आणि आपली शाळा ‘फिट स्कूल’ बनवावी. याचबरोबर सर्व देशवासियांना माझं आवाहन आहे की, आपल्या दिनचर्येमध्ये शारीरिक व्यायामाचा अधिकाधिक समावेश करावा, कसरती करण्याला प्राधान्य द्यावं. आपण सर्वांनी रोज स्वतःला एकदा स्मरण द्यावं की, ‘आपण फिट असू तर इंडिया फिट’ असणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन आठवड्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सण साजरे करण्याचा धडाका सुरू होता. ज्यावेळी पंजाबात लोहडीचा जोश आणि उत्साह होता, त्याचवेळी तामिळनाडूतल्या आपल्या बंधू-भगिनी पोंगलचा सण साजरा करत होते. कुठं तिरूवल्लुवर जयंतीनिमित्त कार्यक्रम होत होता. आसाममध्ये बिहूची मनोहारी छटा पहायला मिळत होती. गुजरातमध्ये चैाहीकडे उत्तरायणची धूम सुरू होती आणि संपूर्ण आकाश पतंगांनी भरून गेलं होतं. याच काळात राजधानी दिल्ली एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली! दिल्लीमध्ये एका अतिशय महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी  केल्या. या करारामुळे जवळपास 25 वर्षे जुनी ब्रू-रियांग रेफ्यूजी क्रायसेस संपुष्टात आले. एका वेदनादायी प्रकरणाचा  अंत झाला. हे क्लेशकारक प्रकरण कायमचे समाप्त झाले. आपण सर्वजण खूप बिझी असता तसंच सण समारंभाचा काळ असल्यामुळे कदाचित तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक कराराविषयी विस्तारपूर्वक माहिती मिळू शकली नसेल. म्हणून आपण याविषयी ‘मन की बात’मध्ये अवश्य चर्चा करावी, असा मी विचार केला. ही समस्या 90 च्या दशकातली आहे. 1997मध्ये जातीय तणावाच्या कारणामुळे ब्रू-रियांग जनजातीच्या लोकांना मिझोराममधून बाहेर पडून त्रिपुरामध्ये शरणार्थी बनावं लागलं. या शरणार्थींना उत्तर त्रिपुरातल्या कंचनपूरस्थित हंगामी शिबिरांमध्ये ठेवलं होतं. ब्रू रियांग समुदायाने आपल्या आयुष्यातला खूप मोठा कालखंड या तात्पुरत्या शिबिरामध्ये घालवून शरणार्थी म्हणून राहताना त्यांचा आयुष्याचा महत्वपूर्ण काळ जणू हरवलाच होता. त्यांच्यासाठी अशा शिबिरामध्ये जीवन कंठणं म्हणजे प्रत्येक पायाभूत सुविधेपासून वंचित राहणं होतं. 23 वर्षे आपलं घर नाही की, आपल्या कुटुंबासाठी जमीन नाही, आजारी पडलो तर औषधोपचाराची काहीही तजवीज नाही. मुलांच्या शिक्षणाची, भविष्याची चिंता तर होतीच. जरा विचार करा, 23 वर्षे अशा निर्वासितांच्या शिबिरामध्ये अतिशय कठिण परिस्थितीमध्ये जीवन जगणे त्यांच्यासाठी दुष्कर झालं असेल. जीवनाच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवसाला अनिश्चित भविष्य बरोबर घेवून जगणं किती कष्टप्रद असणार. अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु या लोकांची पीडा काही कमी झाली नाही. त्यांच्या समस्या काही सुटल्या नाहीत. इतक्या प्रकारचे कष्ट सोसत असतानाही भारतीय घटना आणि संस्कृती यांच्यावर त्यांचा असलेला विश्वास ठाम होता. आणि याच विश्वासाचा चांगला परिणाम म्हणजे आज त्यांच्या जीवनामध्ये एक नवी पहाट उगवली. सामंजस्य करारामुळे आता त्यांना मानानं जीवन जगण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. अखेर 2020चे नवीन दशक, ब्रू- रियांग समुदायाच्या जीवनामध्ये आकांक्षापूर्तीचे, नवीन आशेचे किरण घेवून आले आहे. जवळपास 34 हजार ब्रू- रियांग शरणर्थीयांना त्रिपुरामध्ये वसवण्यात येणार आहे. इतकंच नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने जवळपास 600 कोटी रूपयांची मदतही जाहीर केली आहे. प्रत्येक विस्थापित कुटुंबाला भूखंड देण्यात येणार आहे. घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना लागणा-या अन्नधान्य पूर्ततेची हमी सरकारनं घेतली आहे. या समाजातल्या लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्यास जन -कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा सामंजस्य करार अनेक गोष्टींचा विचार करता खूप विशेष आहे. यामधून ‘को-ऑपरेटिव्ह फेडरॅलिझम’ म्हणजेच सहकारी संघराज्यीय भावनेचे दर्शन होते. या सामंजस्य कराराच्यावेळी मिझोराम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. हा सामंजस्य करार दोन्ही राज्यातल्या जनतेच्या सहमतीमुळे आणि शुभेच्छांमुळेच होवू शकला. या कराराबद्दल मी दोन्ही राज्यांची जनता, तिथले मुख्यमंत्री यांचे विशेष आभार व्यक्त करतो. हा सहकार्य करार भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव असलेल्या करूणाभाव आणि सुहृदयता प्रकट करतो. सर्वांना आपलं मानून पुढे जाणे आणि एकजूट बनून राहणे, हे आपल्या या पवित्र भूमीतल्या संस्कारांमध्येच अंतर्भूत आहे. पुन्हा एकदा मी या राज्यातल्या जनतेचे आणि ब्रू- रियांग समुदायाच्या लोकांचे विशेष अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘खेलो इंडिया गेम्स’चं यशस्वी आयोजन करणा-या आसाममध्ये आणखी एक मोठं काम झालं आहे. तुम्ही सर्वांनी याविषयी आलेली बातमी पाहिली असेलही. काही दिवसांपूर्वी आसाममध्ये वेगवेगळ्या आठ दहशतवादी गटातल्या 644 लोकांनी आपल्याकडच्या हत्यारांसहित आत्म-समर्पण केलं. हे सर्व लोक आधी हिंसेच्या मार्गावरून जात होते. त्यांनीच आता शांतीमार्गावर आपला विश्वास आहे आणि देशाच्या विकासकार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व लोक समाजाच्या मुख्य धारेमध्ये परत आले आहेत.  गेल्या वर्षी, त्रिपुरामध्येही 80 पेक्षा जास्त लोक हिंसेचा मार्ग सोडून मुख्यधारेत परतले होते. कोणत्याही समस्येवर हिंसा करूनच उत्तर मिळते, असा विचार करून ज्यांनी हत्यार उचलले होते, त्यांनाही आता हिंसक कृत्यांमागच्या फोलपणाची जाणीव झाली आहे. शांती आणि एकजूटता दाखवली तर कोणत्याही समस्येवर चर्चेने तोडगा निघू शकतो, हे सर्वांना जाणवले आहे. ईशान्य भागातली बंडखोरी आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, हे जाणून देशवासियांना नक्कीच खूप आनंद होईल. हिंसक कारवाया, बंडखोरी कमी होण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्राविषयी असलेला प्रत्येक मुद्दा तसंच प्रश्न शांतीने आणि प्रामाणिकपणाने चर्चा करून सोडवला जात आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोप-यात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचे उत्तर शोधणा-या लोकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र काळात आवाहन करतो की, तुम्ही मागे फिरा, परत या!! कोणत्याही मुद्यांवर शांतीपूर्ण पद्धतीने चर्चा करून प्रश्नाचा गुंता सोडवण्याच्या आपल्या आणि या देशाच्या क्षमतेवर भरवसा ठेवा. आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो आहोत. सध्याचे युग हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे युग आहे. हिंसा घडवून आणून तिथल्या लोकांचे जीवन चांगले झाले, अशी एखादी जागा या जगाच्या पाठीवर आहे, असं तुम्ही कधी तरी ऐकलं आहे का? ज्या ठिकाणी शांती आणि सद्भाव जीवन जगण्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत, अशी कुठंतरी जागा आहे का? हिंसा कोणत्याही समस्येवर तोडगा असूच शकत नाही. दुनियेतल्या कोणत्याही एका प्रश्नाची उकल करताना, आणखी एक नवा प्रश्न निर्माण करणे म्हणजे मूळ समस्येवर तोडगा काढल्यासारखे अजिबात नसते. उलट आहे त्या समस्येवर उत्तर शोधणे, हाच पर्याय असू शकतो. चला तर मग, या!! आपण सर्वजण मिळून एका नव भारताच्या निर्माणाच्या कामाला लागू या. इथं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा आधार शांती असेल, असा नवीन भारत आपण सर्वजण मिळून घडवू या! एकजूट होवून प्रत्येक समस्येला तोंड देताना समाधान मिळवण्याचा प्रयत्नही करूया. आणि आपल्यातला बंधुभावच प्रत्येक विभाजनाचा प्रयत्न हाणून पाडू शकणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्रजासत्ताक दिवसाच्या पवित्र काळामध्ये मला ‘गगनयान’विषयी बोलताना अपार आनंद होत आहे. देशाने, या क्षेत्रात नवीन दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. 2022 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि त्यावेळी आपण ‘गगनयान मिशन’बरोबर एक भारतवासी अंतराळामध्ये घेवून जाण्याचा संकल्प सिद्ध करायचा आहे. ‘गगनयान मिशन’, म्हणजे 21व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेला ऐतिहासिक पराक्रम असेल. नवीन भारतासाठी हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल.

मित्रांनो, या मिशनमध्ये अॅस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीरासाठी चार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, हे आपल्याला ठावूक असेलच. हे चारही युवा भारतीय वायूसेनेचे वैमानिक आहेत. हे बुद्धिमान युवक, भारतातल्या कुशल, प्रतिभावान, साहसी, धाडसी युवकांचे जणू प्रतीक आहेत. आमचे चारही मित्र आगामी काही दिवसातच विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला रवाना होत आहेत. मला विश्वास आहे की, भारत आणि रशिया यांच्या दरम्यान असलेल्या मैत्री आणि सहकार्याचा एक नवा सोनेरी अध्याय या मिशनमुळे सुरू होईल. या चारही मित्रांना तिथं एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर देशाची आशा आणि आकांक्षा यांना घेवून अंतराळामध्ये भरारी मारण्याची जबाबदारी या चारपैकी कोणा एकावर सोपवण्यात येईल. आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभसमयी  या चारही युवकांना आणि या मोहिमेशी जोडले गेलेले भारत आणि रशियाच्या सर्व वैज्ञानिक तसेच अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो. सर्वांचे अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या मार्चमध्ये एक व्हिडिओ, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनला होता. चर्चेचा विषय असा होता की, एकशे सात वय वर्षे असलेल्या एका वृद्ध आजीबाईंनी राष्ट्रपती भवनातल्या समारंभामध्ये सर्व सुरक्षा नियम, प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपतीजींना आशीर्वाद दिले होते. ही महिला होती सालूमरदा थिमक्का. या आजीबाईंना कर्नाटकमध्ये ‘वृक्ष माता’ या नावानं ओळखलं जातं. राष्ट्रपती भवनात त्यावेळी पद्म पुरस्कार वितरण समारंभ सुरू होता. अतिशय सामान्य पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या थिमक्कांचं काम मात्र असामान्य आहे. त्यांनी वृक्षसंगोपनामध्ये केलेल्या कामाचं योगदान संपूर्ण देशानं जाणलं. त्यावेळीच त्यांना पद्मश्री सन्मान बहाल करण्यात येत होता.

मित्रांनो, आज भारत आपल्या या महान विभूतींचे कार्य पाहून अभिमानाची भावना अनुभवत आहे. या मातीशी घट्ट जोडले गेलेल्या लोकांचा गौरव करताना देशही गौरवान्वित होत असल्याची भावना निर्माण होत असते. प्रत्येक वर्षाप्रमाणे काल सायंकाळी  पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी या पुरस्कारप्राप्त लोकांविषयी माहिती जरूर जाणून घ्यावी. त्यांनी दिलेल्या योगदानाची, त्यांच्या कार्याची आपल्या परिवारामध्ये चर्चा करावी. 2020च्या पद्म पुरस्कारांसाठी यावर्षी 46 हजारांपेक्षा जास्त नामांकने प्राप्त झाली. ही संख्या 2014च्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. हे आकडे जनांचा विश्वास दर्शवणारी आहे. आता पद्म पुरस्कार हा ‘जन-पुरस्कार’ बनला आहे. आज पद्म पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जाते.  यापूर्वी काही वर्षे आधी निर्णय सीमित लोकांकडून घेतले जात होते. आज मात्र सर्व प्रक्रिया लोकांमार्फतच केली जाते. त्यामुळेच पद्म पुरस्कारांविषयी आता देशामध्ये एक नवीन विश्वास आणि सन्मान निर्माण झाला आहे. आता सन्मान मिळवणा-यांपैकी अनेक लोक परिश्रमाची पराकाष्ठा करीत या जमिनीतून वर आलेले असतात. मर्यादित साधन सामुग्रीचा अडथळा आणि आपल्या आजूबाजूला असलेले घनघोर निराशेचे वातावरण, यांच्यातून मार्ग काढत हे लोक पुढं आलेले असतात. वास्तविक त्यांची दृढ इच्छाशक्ती, सेवेची भावना आणि निस्वार्थ भाव आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे असते. सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी या पद्म पुरस्कार विजेत्यांची माहिती जरूर घ्यावी, त्यांच्या कार्याविषयी वाचावं, असा विशेष आग्रह करतो. त्यांच्या जीवनाची असामान्य कहाण्या समाजाला ख-या अर्थाने प्रेरणा देत राहणार आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा! हे संपूर्ण दशक आपल्या जीवनामध्ये, भारताच्या जीवनामध्ये नवीन संकल्पाचे बनावे, नवीन सिद्धी मिळणारे बनावे. आणि संपूर्ण विश्वाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्‍य  भारताला प्राप्त व्हावे. याच एका विश्वासाने आपण सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने नवीन दशकाचा प्रारंभ करू या! नवीन संकल्पांबरोबरच माँ भारतीसाठी आपण कार्यरत राहू या! खूप-खूप धन्यवाद ! नमस्कार !!

 

B.Gokhale/AIR/P.Kor



(Release ID: 1600610) Visitor Counter : 184


Read this release in: English