संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन सोहळा 2020

Posted On: 25 JAN 2020 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2020

 

उद्या नवी दिल्लीतील राजपथावर 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेले मिशन शक्ति - उपग्रह विरोधी शस्त्र, लष्कराचा भीष्म रणगाडा, पायदळाची लढाऊ वाहने, हवाई दलाची नव्याने सामील झालेली चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तसेच आकाश आणि अस्त्र क्षेपणास्त्र दाखवणारा चित्ररथ आणि नौदलाचे सामर्थ्य 90 मिनिटांच्या संचलन सोहळ्यात पाहायला मिळेल. वीस चित्ररथ - राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 16 आणि देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणारे विविध मंत्रालये / विभागांचे सहा चित्ररथ राजपथावर पाहायला मिळतील. शालेय मुले नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून योग आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देतील तर नौदलाची विमाने हवाई शक्तीचे दर्शन घडवतील.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे यावर्षीचे प्रमुख पाहुणे ब्राझीलचे अध्यक्ष जैर मेसिआस बोल्सनारो यांचे स्वागत करतील. ब्राझीलचे 38वे अध्यक्ष बोलसोनारो यांनी 01 जानेवारी 2019. रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या संघटनेचे प्रभारी अध्यक्षपद यशस्वीरित्या भूषवले.
भारत आणि ब्राझीलमधील संबंध समान जागतिक दृष्टीकोन, सामायिक लोकशाही मूल्ये आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेवर आधारित आहेत. 1948 मध्ये भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे ब्राझील हे पहिले लॅटिन अमेरिकन राष्ट्र होते. या संबंधांचे  2006 मध्ये धोरणात्मक भागीदारीत रूपांतर झाले आणि द्विपक्षीय संबंधामध्ये एक नवीन टप्पा सुरू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटजवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्याला प्रारंभ होईल. ते देशाच्या वतीने शहीदांना पुष्पचक्र अर्पण करतील. अमर जवान ज्योती ऐवजी यंदा प्रथमच राष्ट्रीय युद्ध स्मारकात पंतप्रधान शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान आणि अन्य मान्यवर राजपथ येथे संचलन सोहळ्यासाठी रवाना होतील. 

परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकावला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मानवंदना स्वीकारल्यांनंतर संचलनाला प्रारंभ होईल.
त्यानंतर सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते येतील. यामध्ये परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांचा समावेश आहे. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन  बाना सिंग (निवृत्त), सुभेदार योगेंद्र सिंह यादव, 18 ग्रेनेडीयर्स आणि सुभेदार संजय कुमार, 13 जेएके रायफल्स आणि अशोक चक्र विजेते मेजर जनरल सायरस Aपिठावला (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल जस राम सिंह (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल डी श्रीराम कुमार आणि नायब सुभेदार (मानद) चेरींगमुटप (निवृत्त) जीपवरील उप परेड कमांडरचे नेतृत्व  करतील. 
कॅप्टन दीपांशु शियोरन यांच्या नेतृत्वात 61 घोडदळीची पहिली तुकडी पूर्वीच्या ग्वाल्हेर लान्सर्सच्या गणवेशातील असेल. 61 घोडदळ हे जगातील एकमेव सक्रिय घोडदळ रेजिमेंट आहे.
त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल संचलनात आपले सामर्थ्य सादर करतील. 
प्रथमच, सीआरपीएफच्या महिला दुचाकीस्वार धाडसी कवायती सादर करणार आहेत. या पथकाचे नेतृत्व निरीक्षक इंस्पेक्टर सीमा नाग करणार आहेत. चालत्या मोटारसायक वर उभे राहून त्या अभिवादन करताना दिसतील. 
राष्ट्रगीताने या संचलन सोहळ्याची सांगता होईल.

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1600550) Visitor Counter : 206


Read this release in: English