राष्ट्रपती कार्यालय

71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्राला संदेश

Posted On: 25 JAN 2020 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2020

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

  1. 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातल्या आणि परदेशातल्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
  2. सात दशकांपूर्वी, 26 जानेवारीला आपलं संविधान लागू  झालं.  या आधीही या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. ‘पूर्ण स्वराज’  हा संकल्प घेतल्यापासून 1930 ते 1947 पर्यंत आपले देशवासीय, दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस ‘पूर्ण स्वराज दिन‘ म्हणून साजरा करत होते. म्हणूनच 1950 मधे, 26 जानेवारी  याच ऐतिहासिक दिनी, संविधानातल्या आदर्शांप्रती दृढता व्यक्त करत, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपण आपला प्रवास सुरु केला. तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 
  3. कायदे मंडळ, प्रशासन आणि न्याय व्यवस्था ही आधुनिक राष्ट्राच्या शासन व्यवस्थेची  तीन महत्वाची अंग आहेत. या तिन्ही यंत्रणा स्वायत्त असूनही परस्परांशी जोडलेल्या आणि परस्परपूरकही आहेत. मात्र, राष्ट्राची उभारणी होते ती लोकांमुळेच. आम्हा भारतीयांच्याच हाती प्रजासत्ताकाचं सूत्र असतं. आपलं सामुहिक भविष्य घडवण्याची खरी शक्ती भारताच्या लोकांमध्येच सामावलेली आहे.
  4. आपल्या संविधानानं, एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार प्रदान केले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव या आपल्या लोकशाहीच्या महत्वाच्या तत्वांशी सदैव बांधील राहण्याची जबाबदारीही आपल्यावर सोपवली आहे. राष्ट्राचा अखंड विकास आणि बंधुभाव राखण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जीवन मुल्ये आपण अंगिकारली तर या संविधानिक मूल्यांचं आचरण आपल्यासाठी अधिकाधिक सुलभ होत  राहील. या आचरणातूनच महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी करु.

प्रिय नागरिकहो,

  1. सरकारनं, लोक कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. नागरिकांनी स्वेच्छेनं, या उपक्रमांना, लोकप्रिय जन चळवळीचं स्वरूप दिलं, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.  स्वच्छ भारत अभियानानं,  लोक सहभागामुळे, अत्यल्प काळात, उल्लेखनीय यश प्राप्त केलं. लोकसहभागाची हीच भावना अन्य क्षेत्रामध्ये होत असलेल्या उपक्रमांमध्येही दिसून येते. मग स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठीच्या अनुदानाचा त्याग करायचा असो किंवा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं असो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं यश, अभिमानास्पद आहे. या योजनेचं लक्ष्य साध्य झालं आहे. 8 कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.  यामुळे गरजूंना स्वच्छ इंधनाची सुविधा मिळत आहे. ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर  घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य योजने’  मुळे, लोकांचं जीवन उजळलं आहे. ‘प्रधान मंत्री किसान  सन्मान निधी’ च्या माध्यमातून, 14 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंब, किमान 6 हजार वार्षिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी पात्र ठरली आहेत. यामुळे आपल्या अन्नदाता शेतकऱ्याला  सन्मानाचं जीवन जगण्यासाठी  मदत होत आहे.

वाढत्या पाणी प्रश्नाचा  प्रभावी सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच जलजीवन मिशनही लोकप्रिय जन चळवळ ठरेल असा मला विश्वास आहे.

  1. सरकारच्या  प्रत्येक धोरणामागे   गरजवंतांच्या कल्याणाबरोबरच ‘आपलं राष्ट्र सर्वप्रथम‘ ही भावनाही असते. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं ‘एक देश, एक कर, एक बाजारपेठ’ या संकल्पनेला साकार रूप मिळालं आहे. याच बरोबर  ‘ई-नाम’ योजने द्वाराही ‘एक राष्ट्रासाठी एक बाजारपेठ’ निर्माण करण्याची प्रक्रिया मजबूत केली जात आहे, यामुळे शेतकऱ्यांचाही लाभ होणार आहे. देशाच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे, मग जम्मू- काश्मीर आणि लडाख असो, ईशान्येकडची राज्ये असोत किंवा हिंदी महासागरातली आपली बेटं असोत. 
  2. देशाच्या विकासासाठी, भक्कम अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. म्हणूनच अंतर्गत सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी सरकारनं अनेक ठोस पावलं उचलली आहेत.
  3. आरोग्य आणि शिक्षण सुविधा सहज प्राप्त होणं हा  सुशासनाचा पाया मानला जातो. गेल्या सात दशकात, आपण या क्षेत्रात बरीच मोठी मजल मारली आहे. सरकारनं आपल्या महत्वाकांक्षी उपक्रमांद्वारा, आरोग्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यासारख्या योजनातून गरिबांच्या  कल्याणाप्रती  सरकारची संवेदनशीलता प्रतीत होत आहे आणि त्यांच्यापर्यंत निश्चितच मदत पोहोचत आहे. आयुष्मान भारत योजना जगातली सर्वात मोठी जन आरोग्य योजना ठरली आहे. हे आपण जाणतोच. सामान्य जनतेसाठी, आरोग्य सेवांची उपलब्धता आणि गुणवत्ता या दोन्हींमध्ये सुधारणा झाली आहे. जन औषधी योजनेद्वारा, परवडणाऱ्या दरात, दर्जेदार जेनरिक औषधं उपलब्ध होत असल्यानं सामान्य जनतेचा, उपचारांवरचा खर्च कमी झाला आहे.

प्रिय नागरिकहो,

  1. प्राचीन काळात, नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांच्या उभारणीतच, सर्वोत्तम शिक्षण संस्थेचा पाया घातला गेला. भारतात, शक्ती, प्रसिद्धी आणि श्रीमंतीपेक्षा ज्ञान हे नेहमीच मौल्यवान मानलं जातं. भारतीय परंपरेत, शिक्षण संस्थांना, विद्येचं मंदिर मानलं जातं. वसाहतवाद्यांच्या दीर्घ राजवटीमुळे राहीलेलं मागासलेपण दूर करण्यासाठी, शिक्षण हेच सबलीकरणाचं प्रभावी माध्यम ठरलं आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच आपल्या आधुनिक शिक्षण व्यवस्थांचा विकास  सुरु झाला, तेव्हा मर्यादित संसाधनं असूनही शिक्षण क्षेत्रातली आपली कामगिरी उल्लेखनीय आहे. कोणतेही मूल अथवा युवक शिक्षणापासून वंचित राहू नये हाच आमचा कसोशीचा  प्रयत्न आहे. त्याच बरोबर, आपल्या शिक्षण व्यवस्थेत सातत्यानं सुधारणा करत आपली शिक्षण व्यवस्था जागतिक तोडीची करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहायला हवेत.
  2. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मिशन गगनयान मधे इस्रो प्रगती करत आहे, या वर्षात, भारतीय मानव अंतराळ यान कार्यक्रम अधिक वेगानं पुढे जाण्याची, सर्व देशवासीय मोठ्या उत्सुकतेनं प्रतिक्षा करत आहेत.
  3. यावर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतानं अनेक क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी बजावण्याची परंपरा कायम राखली आहे. आपले खेळाडू आणि अॅथलिट्स यांनी गेल्या काही वर्षात, अधिकाधिक क्रीडा प्रकारात, देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक 2020 मधे, भारतीय पथकांच्या पाठीशी  कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा राहणार आहेत.
  4. प्रवासी भारतीयांनी देशाचा गौरव नेहमीच वाढवला आहे. परदेशस्थ भारतीयांनी तिथली भूमी समृध्द करण्याबरोबरच, जागतिक समुदायासमोर भारताची प्रतिमा उंचावली आहे असं माझ्या परदेश दौऱ्यात मी अनुभवलं आहे. यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे.

प्रिय नागरिकहो,

  1. देशाची सशस्त्र दलं, अर्धसैनिक दलं आणि अंतर्गत सुरक्षा दलांची मी मुक्त कंठानं प्रशंसा करत आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी त्यांचं बलिदान म्हणजे, अद्वितीय शौर्य आणि शिस्तबद्धतेची अजोड गाथाच आहे. आपले शेतकरी, डॉक्टर आणि परिचारिका, विद्या आणि संस्कार देणारे शिक्षक, वैज्ञानिक आणि अभियंते, सळसळत्या  उत्साहाचे  कर्तृत्ववान युवक, आपल्या मेहनतीनं कारखाने चालवणारा श्रमजीवी वर्ग, औद्योगिक विकासात योगदान देणारे उद्योजक, आपली संस्कृती आणि कला समृध्द करणारे कलाकार, भारताच्या सेवा क्षेत्राला जगभरात सन्मानाचं स्थान देणारे व्यावसायिक, इतर अनेक क्षेत्रात  आपलं योगदान देणारे सर्व देशवासीय आणि विशेषकरून अडथळे असूनही यशाचे नवे मापदंड स्थापन करणाऱ्या आमच्या झुंजार कन्या, हे  सर्व आपल्या देशाचा गौरव आहेत.
  2. विविध क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या काही व्यक्तींना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला या महिन्याच्या सुरुवातीला मिळाली. साधेपणानं आणि निष्ठेनं, शांतपणे कार्य करत यांनी विज्ञान आणि नवनिर्मिती,  शेती आणि वनीकरण, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, प्राचीन कलांचं पुनरुज्जीवन, दिव्यांग व्यक्ती, महिला आणि बालकांचं  सशक्तीकरण, गरजूंना मोफत भोजन अशा विविध क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. उदाहरणादाखल, जम्मू- काश्मीर मधे आरिफा जान यांनी नमदा  हस्तकलेचं, पुनरुज्जीवन करण्यासाठी, तेलंगणामधे रत्नावली कोटपल्ली यांनी थेलेसिमियाग्रस्त लोकांच्या उपचारासाठी, केरळ मधे देवकी अम्मा  यांनी  वैयक्तिक प्रयत्नातून वनसंपदेचा विकास  करून, मणिपूर मधे, जामखोजांग मिसाओ यांनी सामुहिक विकासासाठी काम करून, पश्चिम बंगाल मधे बाबर अली यांनी दुर्बल वर्गातल्या मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात प्रशंसनीय योगदान देऊन लोकांच्या जीवनात नवी आशा पल्लवित केली. असे असंख्य लोक आहेत, मी फक्त मोजक्याच नावांचा उल्लेख केला. सामान्य व्यक्तीही,  असामान्य योगदान देऊन समाजात मोठं परिवर्तन घडवू शकतात हे या लोकांनी सिध्द केले आहे. अशा अनेक स्वयंसेवी संस्थाही आहेत, ज्या राष्ट्र निर्मिती अभियानात आपलं योगदान देत सरकारला  सहयोग करत आहेत.

प्रिय नागरिकहो,

  1. आपण आता एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश केला आहे. हे दशक, नव भारत निर्मिती आणि भारतीयांच्या नव्या पिढीच्या उदयाचं राहील. या शतकात जन्मलेले युवक राष्ट्रीय विचार प्रवाहात हिरीरीने आपली जबाबदारी निभावत सहभागी होत आहेत. आपल्या महान स्वातंत्र्य लढ्यातले साक्षीदार, काळाच्या ओघात, हळूहळू आपल्याला सोडून जात आहेत. मात्र स्वातंत्र्य लढ्याप्रती आपली आस्था सदैव कायम राहील. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे, आजच्या युवकाला व्यापक माहिती आहे आणि त्यांच्यात मोठा आत्मविश्वासही आहे. आपल्या पुढच्या   पिढीचा देशाच्या मुल्यांवर अढळ विश्वास आहे. ‘राष्ट्र सर्वात आधी’ हीच आपल्या युवकांची भावना आहे. या युवकांमध्ये, मला, नव भारताची झलक पाहायला मिळतं आहे.
  2. राष्ट्र निर्मितीत, महात्मा गांधीजींचे विचार आजही संयुक्तिक आहेत. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशावर चिंतन आणि मनन करणं हा आपल्या दिनचर्येचा  एक भाग राहायला हवा. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश, आजच्या काळात अधिकच आवश्यक झाला आहे.

कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी, विशेषकरून युवकांनी, गांधीजींचा अहिंसेचा मंत्र सदैव स्मरणात ठेवला पाहिजे, कारण हा मंत्र म्हणजे मानवतेला दिलेली अमुल्य देणगी आहे. कोणतंही कार्य योग्य आहे की अयोग्य हे निश्चित करण्यासाठी, गांधीजींची, मानव कल्याणाची कसोटी, आपल्या लोकशाहीलाही लागू आहे. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचीही भूमिका महत्वाची असते. राजकीय विचारांच्या अभिव्यक्ती बरोबरच, देशाचा सर्वंकष विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी दोघांनीही  मिळून वाटचाल करायला हवी.

प्रिय नागरिकहो,

  1. प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचा उत्सव आहे. आजच्या दिवशी, संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्यापुढे मांडू इच्छितो, त्यांनी म्हटलं होतं –

‘आपल्याला केवळ वरवर नव्हे तर वास्तवातही लोकशाही कायम राखायची असेल तर आपल्याला काय करायला हवं ? माझ्या मतानुसार, आपलं पहिलं काम म्हणजे, हे सुनिश्चित करणं आहे की, आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी संविधानातल्या तरतुदींचा अत्यंत निष्ठापूर्वक आधार घेतला पाहिजे'.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शब्दांनी, आपला मार्ग सदैव प्रकाशमान केला आहे. त्यांचे हे शब्द, आपल्या राष्ट्राला, गौरवाच्या शिखरावर नेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत राहतील असा मला विश्वास आहे.

प्रिय नागरिकहो,

  1. संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब आहे, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा आपला विचार, इतर राष्ट्रांबरोबरचं आपले संबंध दृढ करतो. आपण आपली लोकशाही मुल्यं आणि विकासाची फलश्रुती अवघ्या जगापर्यंत पोहोचवत आहोत.

​​​​​​​प्रजासत्ताक दिनी परदेशी राष्ट्र प्रमुखांना आमंत्रित करण्याची आपली परंपरा राहिली आहे. मला आनंद आहे, की, यावर्षी, आपल्या उद्याच्या प्रजासत्ताक दिन उत्सवात आपले मित्र, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो, आपले सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

विकासाच्या मार्गावरून पुढे वाटचाल करताना, आपल्या आणि संपूर्ण मानवतेच्या सुरक्षित आणि समृध्द भविष्याकरिता, जागतिक समुदायाशी सहकार्य करण्यासाठी, आपला देश आणि आपण सर्व देशवासीय, वचनबद्ध आहोत.

  1. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठीही शुभेच्छा.

 

जय हिंद !

 

 

Doordarshan/R.Tidke/S.Tupe/D.Rane



(Release ID: 1600547) Visitor Counter : 214


Read this release in: English