अंतराळ विभाग

भारताचा दळणवळण उपग्रह जीसॅट-30 चे यशस्वी प्रक्षेपण

Posted On: 17 JAN 2020 3:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2020

 

भारताच्या जीसॅट-30 या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयाना इथून आज यशस्वी प्रक्षेपण झाले. एरियन 5 व्हीए251 प्रक्षेपण यानातून जीसॅट-30 बरोबरच युटेलसॅट कनेक्ट या उपग्रहाचेही प्रक्षेपण करण्यात आले.

प्रक्षेपणानंतर 38 मिनिटे आणि 25 सेकंदानी जीसॅट-30 हा उपग्रह, उपग्रह यानापासून अलग झाला. त्यानंतर लगेचच इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कर्नाटकमधल्या हसन इथल्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने त्याचे नियंत्रण घेतले. 3357 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कक्षेतल्या काही उपग्रहांच्या कार्यात्मक सेवांना अखंडता पुरवणार आहे. इनसॅट-4A ची जागा जीसॅट-30 घेणार आहे. हा उपग्रह भारताला दळणवळण सेवा पुरवणार असून आखाती देशांसह मोठ्या प्रमाणात आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाही या उपग्रहाच्या कक्षेत येत असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली. हा उपग्रह डीटीएच टेलीव्हिजन सेवा, एटीएम, स्टॉक एक्स्चेंज, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलीपोर्ट सेवा आणि डीएसएनजी, ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन यासाठी व्हीसॅट कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे. टेलीकम्युनिकेशन ॲप्लिकेशनसाठी मोठ्या प्रमाणातल्या डाटा ट्रान्स्फरसाठीही हा उपग्रह मोलाचा ठरणार आहे.

सर्व इन ऑर्बिट चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर हा उपग्रह कार्यान्वित होणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1599667) Visitor Counter : 576


Read this release in: English