उपराष्ट्रपती कार्यालय

सरकार आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकींवर केल्या जाणाऱ्या अफाट खर्चांविरोधात प्रभावी कायदे करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 09 JAN 2020 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2020

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी निवडणुकांवरील वाढत्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली असून याला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर संसदेने प्रभावी कायदा करावा तसेच लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जाव्यात अशी सूचना केली आहे. ते आज हैदराबाद येथे हैदराबाद विद्यापीठ, फाउंडेशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस्‌ आणि भारत इन्स्टीट्युट ऑफ पब्लिक पॉलिसी यांनी आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलत होते.

प्रामाणिक आणि लायक अल्प उत्पन्न भारतीयांऐवजी कोट्याधीशांना खासदार किंवा आमदार बनण्याच्या जास्त संधी आहेत आणि हे वास्तव आहे असे नायडू यांनी नमूद केले. सध्याच्या लोकसभेत 533 सदस्यांपैकी 475 सदस्यांची घोषित मालमत्ता अनेक कोटींमधे आहे असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी राजकारणात आणि निवडणुकांमधे बेहिशेबी खर्च आणि मतदारांना भुलवण्यासाठीचे प्रयत्न यावर त्वरित नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली. निवडणुकांवरील अनियंत्रित खर्चामुळे भ्रष्टाचार बोकाळतो आणि प्रशासनाचा दर्जा खालावतो. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

त्यांनी राजकीय पक्षांना पारदर्शकतेसाठी आर्थिकदृष्ट्या उत्तरदायी राहण्याचे आवाहन केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एकत्रित निवडणुकांमुळे निवडणुकांवरील खर्चात बचत होईल तसेच राजकीय पक्षांकडून केला जाणारा खर्च कमी होईल असे ते म्हणाले.

2022 मधे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी यासंबंधी प्रभावी उपाययोजना आखल्या जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसेच नागरिकांनी चारित्र्य, आचरण आणि क्षमतेच्या आधारे लोकप्रतिनिधींची निवड करावी असे आवाहन त्यांनी केले.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 


(Release ID: 1598916) Visitor Counter : 185
Read this release in: English