पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी श्री सिद्धगंगा मठाला दिली भेट, श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांच्या स्मृति प्रित्यर्थ संग्रहालयाची केली पायाभरणी

Posted On: 02 JAN 2020 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील तुमकुरू येथील श्री सिद्धगंगा मठाला भेट दिली आणि श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांच्या स्मृति प्रित्यर्थ संग्रहालयाची पायाभरणी केली.

तुमकुरु येथे श्री सिद्धगंगा मठात उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले कि, 2020 या नवीन वर्षाची सुरुवात ते या पवित्र भूमीतून करत आहेत. श्री सिद्धगंगा मठाची पवित्र ऊर्जा देशातील लोकांचे जीवन समृद्ध करेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘ आपल्याला पूज्य स्वामी श्री श्री शिवकुमार जी यांची अनुपस्थिती जाणवत आहे. त्यांचे नुसता दृष्टीक्षेप देखील समृद्ध आणि प्रेरणादायी असल्याचा अनुभव मी व्यक्तीश: घेतला आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाने हे पवित्र स्थान समाजाला गेली अनेक दशकं दिशा दाखवत आहे.’

ते म्हणाले, ‘श्री श्री शिवकुमार जी यांच्या स्मृति प्रित्यर्थ बांधण्यात येत असलेल्या या संग्रहालयाची पायाभरणी करण्याची संधी मला मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. हे संग्रहालय लोकांना केवळ प्रेरणा देणार नाही, तर समाजाला आणि देशाला योग्य दिशाही दाखवेल.’

नवी ऊर्जा आणि नव्या जोमाने भारताने 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश केल्याचे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या दशकाची सुरुवात कशी झाली याचे स्मरण करण्याचे आवाहन त्यांनी देशाला केले. त्याउलट 21व्या शतकाचे तिसरे दशक अपेक्षा आणि आकांक्षांच्या मजबूत आधारावर सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.

‘ही आकांक्षा नव्या भारतासाठी आहे. ही आकांक्षा युवा स्वप्नांची आहे. ही आकांक्षा देशातील भगिनी आणि मुलींची आहे. ही आकांक्षा देशातल्या गरीब, वंचित, मागास, आदिवासी, शोषितांसाठी आहे’, असे ते म्हणाले.

‘भारताला समृद्ध, सक्षम आणि व्यापक जागतिक महाशक्ती बनलेले पाहण्याची ही आकांक्षा आहे. आता प्रत्येक भारतीयाची अशी मनोवृत्ती बनली आहे की, ज्या समस्या आपल्याला वारशाने मिळाल्या आहेत, त्यांचे निराकरण व्हायला हवे. समाजाकडून आलेला हा संदेश आमच्या सरकारला प्रेरणा अणि प्रोत्साहन देतो.’

पाकिस्तानातून अनेक जण आपले प्राण वाचवण्यासाठी, आपल्या मुलींचे प्राण वाचवण्यासाठी भारतात पळून आले, असे पंतप्रधान म्हणाले.

लोक पाकिस्तानविरोधात का बोलत नाहीत, तसेच या लोकांच्या विरोधात निदर्शने का केली जात आहेत, असा प्रश्न प्रत्येक देशवासियाला पडला आहे, असे ते म्हणाले.

जे भारतीय संसदेच्या विरोधात आंदोलने करत आहेत, त्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले, ‘जर तुम्हाला आंदोलनच करायचे असेल, तर गेली 70 वर्षे पाकिस्तानकडून होत असलेल्या शोषणाविरोधात तुमचा आवाज उठवा. पाकिस्तानाची ही कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड करण्याची आता गरज आहे. जर तुम्हाला घोषणा द्यायच्या असतील, तर पाकिस्तानात अल्पसंख्यकावर होत असलेल्या अन्यायासंबंधी घोषणा द्या. जर तुम्हाला मोर्चे काढायचे असतील, तर पाकिस्तानकडून शोषित हिंदू-दलितांच्या समर्थनासाठी मोर्चे काढा.’

पंतप्रधानांनी संत समाजाकडून तीन संकल्पांसाठी सक्रीय समर्थन मागितले.

पहिला संकल्प, प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांना महत्व देण्याची भारताची प्राचीन संस्कृती पुनर्स्थापित करणे.

दुसरा, निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण.

आणि तिसरा, जलसंवर्धन, जलसंचय यासाठी जनजागृती करण्यात सहकार्य करणे.

भारताने संत, साधू, गुरु यांच्याकडे नेहमीच योग्य मार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणून पाहिले आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

M.Chopade/S.Kane/D.Rane



(Release ID: 1598311) Visitor Counter : 124


Read this release in: English