उपराष्ट्रपती कार्यालय
भारताला पाकिस्तानसह सर्व शेजारी राष्ट्रांशी शांतीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत: उपराष्ट्रपती
Posted On:
23 DEC 2019 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2019
भारताला पाकिस्तानसह आपल्या सर्वच शेजारी देशांशी शांतीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत, असे मत उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. जम्मू-कश्मीरवरुन दिल्ली आणि आग्रा इथे शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या विद्यार्थींनीनी आज उपराष्ट्रपती निवासात नायडू यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या या सहलीचे त्यांनी कौतुक केले.
उपराष्ट्रपतींनी कश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले. कश्मीरच्या लोकांमध्ये उपजत गोडवा आणि मैत्रीभावना आहे. तसेच या राज्यात अध्यात्माची मोठी परंपरा उत्तम खाद्य पदार्थ आणि विविधतेने नटलेली संस्कृती आहे, असे नायडू म्हणाले.
देश समजून घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांनी देशभर प्रवास करायला हवा आणि भारताला जोडणारा सांस्कृतिक आणि भावनिक एकतेचा बंध समजून घ्यायला हवा, असे उपराष्ट्रपती म्हणाले. आज देशासमोर असलेली आव्हाने देखिल मुलांना या प्रवासातून समजतील आणि अशी आव्हाने किंवा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा ते प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सीमापार दहशतवाद आणि घुसखोरीमुळे कश्मीरच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे, असे सांगत कश्मीरच्या विकासासाठी कलम 370 हटवणे ही काळाची गरज होती, असे नायडू म्हणाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रु असून, त्याच्यामुळे प्रगतीच्या मार्गावर सतत अडथळे येत असतात, असे नायडू म्हणाले.
भारत सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत असतांना निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा पुरेपुर लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
देशात जात, वर्ग आणि लिंग भेदावरुन होणारा भेदभाव तसेच अत्याचाराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशात सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी अविरत प्रयत्न करावे लागतील, असेही नायडू यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1597248)
Visitor Counter : 96