उपराष्ट्रपती कार्यालय
महिलांना 33 टक्के आरक्षण दिल्याबद्दल उपराष्ट्र्पतींकडून गुजरात पोलिसांची प्रशंसा, इतर राज्यांनी देखील अवलंब करावा
महिला आणि बालकांविरोधातील गुन्हयांप्रती पोलिसांनी अधिक संवेदनशील असावे- उपराष्ट्रपती
Posted On:
15 DEC 2019 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2019
महिला आणि बालकांविरोधातील गुन्हयांप्रती पोलिस दलांनी अधिक संवेदनशील असावे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये विलंब न करता एफआयआर नोंदवून घेतला जावा आणि प्रत्येक प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
ते आज गुजरातमध्ये 'प्रेसिडेंट्स कलर्स’ प्रदान केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. महिलांना 33टक्के आरक्षण दिल्याबद्दल उपराष्ट्र्पतींनी गुजरात पोलिसांची प्रशंसा केली आणि अन्य राज्यांनीही त्यांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. यामुळे लिंग संवेदनशील दल निर्माण करण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले कि, अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना व्हायला हवी आणि पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथके तपासासाठी स्थापन करणे गरजेचे आहे.
तुमची कारवाई अशी असायला हवी कि, कुठल्याही पीडित महिलेला पोलिसांची मदत मागताना भीती अथवा संकोच वाटू नये असे ते म्हणाले.
आपल्या पोलीस विभागाची तपस आणि गुप्तहेर यंत्रणांकडून माहिती मिळवण्याची क्षमता वाढवण्याची तात्काळ गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
न्यायदानातील विलंब कमी करण्यासाठी न्यायालयीन सुधारणा हाती घेणे महत्वाचे असल्याचे नायडू म्हणाले. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी न्यायालयीन पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कायद्याचे पालन करणाऱ्या समाजाची निर्मिती करण्यात नागरिकांसह पोलिसांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कायद्याचा आदर करणे ही संस्कृती आणि जीवनशैली बनायला हवी असे ते म्हणाले.
‘प्रेसिडेंट्स कलर्स’ हे गुजरात पोलिसांच्या अथक, दीर्घकालीन आणि गुणवंत सेवा, शौर्य आणि समर्पणाची ओळख असल्याचे नायडू म्हणाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि प्रशिक्षण घेऊन स्वत:ला सुसज्ज ठेवल्याबद्दल त्यांनी गुजरात पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.
तत्पूर्वी नायडू यांनी गुजरातच्या शहीद पोलिसांना अभिवादन केले. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात गुजरात पोलिसांचे योगदान महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरात पोलिसांच्या नव्या लोगोचे अनावरण केले.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जाडेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
S. Pophale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1596541)
Visitor Counter : 160