आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

ऑनलाइन औषध विक्री

Posted On: 13 DEC 2019 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2019

 

देशातील औषधांची विक्री ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट, 1940 आणि नियम 1945’च्या तरतुदींनुसार केली जाते. राज्य परवानाधारक प्राधिकरणा (एसएलए) द्वारे परवाना व तपासणी यंत्रणेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाते. कायदा आणि नियम तरतुदींच्या उल्लंघनाविरूद्ध कठोर व थेट कारवाई करण्यासाठी ‘एसएलए’ला कायदेशीररित्या अधिकार देण्यात आले आहेत.

असे लक्षात आले आहे की, ऑनलाइन औषधांच्या विक्रीविरूद्ध काही भागधारकांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. ऑनलाईन औषधांच्या विक्रीचे सर्वसमावेशक नियमन करण्यासाठी शासनाने दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी जी.एस.आर. 817 (ई)च्या आराखड्यानुसार मसुदा नियम प्रसिद्ध केला आहे व ई-फार्मसीद्वारे औषधांच्या विक्री नियमन आणि वितरणासंदर्भातील तरतुदींचा समावेश करण्यासाठी ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स नियम 1945मध्ये दुरुस्तीसाठी जनता/भागधारकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.

मसुद्याच्या नियमांमध्ये ई-फार्मसीची नोंदणी, ई-फार्मसीची नियमित तपासणी, ई-फार्मसीद्वारे औषधांची वितरण किंवा विक्री करण्याची प्रक्रिया, ई-फार्मसीद्वारे औषधांची जाहिरात करण्यास मनाई, तक्रार निवारण यंत्रणा, ई-फार्मसीचे निरीक्षण इत्यादी तरतुदी केलेल्या आहेत.

राज्यमंत्री (आरोग्य व कुटुंब कल्याण) अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

M.Chopade/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1596399) Visitor Counter : 102
Read this release in: English