पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी आणि मालदीवच्या राष्ट्रपतींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मालदीवमध्ये विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे केले उद्‌घाटन

Posted On: 04 DEC 2019 7:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मालदीवमधल्या अनेक प्रमुख विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्‌घाटन केले.

मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली कामियाब ही तटरक्षक नौका मालदीवला भेट देणे, रूपे कार्डचा शुभारंभ, मालेला एलईडी दिव्यांनी उजळून टाकणे, उच्च प्रभाव असलेले समुदाय विकास प्रकल्प, मत्स्य प्रक्रिया प्रकल्पांचा यात समावेश होता.

मालदीवचे राष्ट्रपती म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपती सोलिह यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत-मालदीव संबंधांसाठी हे महत्वाचे वर्ष होते. भारताच्या शेजारी प्रथम धोरणामुळे तसेच मालदीवच्या भारत प्रथम धोरणामुळे सर्वच क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत झाले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

कामियाब या जलद तटरक्षक नौकेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की यामुळे मालदीवची सागरी सुरक्षा वाढवण्यात तसेच नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात मदत होईल.

द्वीपसमूहांवर राहणाऱ्यांच्या उपजीविकेला मदत करण्यासाठी उच्च प्रभाव असलेल्या समुदाय विकास प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भागीदारीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

जनतेमधील संबंध हे उभय देशांदरम्यानच्या दृढ संबंधांच्या प्रमुख बाबींपैकी एक बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यासंदर्भात ते म्हणाले की मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. या आठवड्यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू इथून 3 थेट विमानसेवा सुरू करण्यात आल्या. रुपे कार्ड सेवा सुरू झाल्यामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असे पंतप्रधान म्हणाले.

हुलहुलमाले येथे कर्करोग रुग्णालय आणि क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत सरकार काम करत असून 34 बेटांवर पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे पंतप्रधान म्हणाले.

लोकशाही आणि विकास मजबूत करण्यासाठी मालदीवबरोबर भागीदारी सुरू ठेवण्याप्रती वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधानांनी केला. हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा स्थापित करण्यासाठी उभय देश सहकार्य वृद्धींगत करतील असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1595012) Visitor Counter : 94


Read this release in: English