पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन
Posted On:
29 NOV 2019 11:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2019
माननीय राष्ट्रपती गोताबय राजपक्षे
श्रीलंका आणि भारताचे वरिष्ठ अधिकारी
मित्रांनो,
आयुबोवन!
वणक्कम!
नमस्कार!
राष्ट्रपती गोताबय राजपक्षे आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. निवडणुकीत निर्णायक यश संपादन केल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे हार्दिक अभिनंदन करतो. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पडल्याबद्दल मी श्रीलंकेच्या जनतेचे अभिनंदन करतो. श्रीलंकेच्या लोकशाहीचे सामर्थ्य आणि प्रगल्भता ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. राष्ट्रपती राजपक्ष यांनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली आणि पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच भारतात स्वागत करण्याची आम्हाला संधी दिली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारत आणि श्रीलंकेमधील सामर्थ्यशील आणि चैतन्यदायी मैत्रीपूर्ण वातावरणाचे हे प्रतिक आहे. उभय देशासाठी हे संबंध किती महत्वपूर्ण आहेत हे ह्याचे देखील प्रतिक आहे. दोन्ही देशांची प्रगती आणि आमच्या संपूर्ण सामायिक क्षेत्रात शांतता, भरभराट, सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती राजपक्ष यांच्यासोबत काम करण्यासाठी तत्पर आहोत.
माननीय महोदय,
तुम्हाला मिळालेला जनादेश हा संघटीत, मजबूत आणि समृद्ध श्रीलंकेसाठी, श्रीलंकेच्या लोकांच्या आकांक्षा व्यक्त करतो. यासाठी भारताच्या जनतेच्या शुभेच्छा आणि सहकार्य सदैव श्रीलंके सोबत आहे. एक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध श्रीलंका हा केवळ भारताच्या हिताचाच नाहीतर संपूर्ण हिंद महासागर क्षेत्राच्या हिताचा आहे.
मित्रांनो,
भारत हा श्रीलंकेच्या सर्वात नजीकचा सागरी मित्र आणि विश्वासू मित्र आहे. आपले ऐतिहासिक, भाषिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध हे दोन्ही देशांच्या घनिष्ट संबंधांचा मजबूत पाया आहे.
माझ्या सरकारचे “शेजारी प्रथम” धोरण आणि “सागर” प्रणाली मुळे आम्ही श्रीलंके सोबतच्या संबंधांना प्राधान्य देतो. उभय देशांची सुरक्षा आणि विकास हा अविभाज्य आहे. आणि म्हणूनच स्वाभाविकपणे आपण एकमेकांची सुरक्षा आणि संवेदन क्षमतांबद्दल जागरूक असले पाहिजे.
राष्ट्रपती आणि माझ्या मध्ये आज परस्पर हिताची आंतरराष्ट्रीय प्रकरणे आणि द्विपक्षीय संबंधांवर उत्तम आणि फलदायी चर्चा झाली. उभय देशांमधील बहुआयामी भागीदारी आणि सहकार्य एकत्रितपणे अधिक बळकट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. भारत श्रीलंकेच्या विकास भागीदारीसाठी वचनबद्ध असल्याबद्दल मी राष्ट्रपतींना विश्वास दिला आहे. आणि नेहमीप्रमाणे हे सहकार्य श्रीलंकेतील लोकांच्या प्राधान्यारूप असेल. 400 मिलियन डॉलरच्या नवीन कर्जामुळे श्रीलंकेतील पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना मिळेल. या नवीन कर्जामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि या दोन्ही देशांमधील परस्पर फायद्याच्या प्रकल्प सहकार्यासही वेग येईल याची मला खात्री आहे. आम्हाला आनंद आहे की भारतीय गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व प्रांतांमध्ये अंतर्गत विस्थापितांसाठी 46,000 घरे बांधली आहेत. अप-कंट्री प्रांतात भारतीय वंशाच्या तामिळ लोकांसाठी 14,000 घरे बांधण्यात चांगली प्रगती आहे. श्रीलंकेतील सौर प्रकल्पांसाठी याआधी मंजूर झालेल्या १०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज वापरण्यासाठी आमच्यामध्ये सहमती झाली आहे याचा मला आनंद आहे. भारतातर्फे श्रीलंकेत संचालित शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या अनुदानाच्या आधारे सुरु असलेले २० सामुदायिक विकास प्रकल्प आणि इतर लोककेंद्रित प्रकल्पांवर माझ्यात आणि राष्ट्रपतींमध्ये चांगली चर्चा झाली.
मित्रांनो,
भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांना नेहमीच विरोध केला आहे तसेच सीमावर्ती दहशतवादासह इतर प्रकारच्या दहशतवादाविरूद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कारवाईची अपेक्षा केली होती. यावर्षी इस्टरला श्रीलंकेतील दहशतवाद्यांनी मानवजातीच्या विविधतेवर आणि सहजीवनाच्या बहुमोल परंपरेवर पाशवी हल्ले केले. दहशतवाद आणि जहालमतवादी शक्तींविरुद्ध श्रीलंकेच्या लढाईत भारताचा अतूट पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मी भारतातल्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच श्रीलंकेत गेलो होतो. परस्पर सुरक्षा आणि दहशतवादाविरूद्ध परस्पर सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी मी राष्ट्रपती राजपक्षे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. भारतातील प्रमुख संस्थांमध्ये श्रीलंकेचे पोलिस अधिकारी आधीपासूनच दहशतवादविरोधी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेला 50 मिलियन डॉलर्सचे विशेष कर्ज जाहीर करताना मला आनंद होते आहे.
मित्रांनो,
मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकरणात विधायक आणि मानवी दृष्टिकोनातून पुढे जाण्याबाबत आम्ही सहमती दर्शवली आहे.
मित्रांनो,
श्रीलंकेमध्ये सलोखा स्थापन करण्याबाबत आम्ही खुलेपणाने विचारांची देवाणघेवाणही केली. राष्ट्रपती राजपक्षे यांनी मला जातीय सलोख्याबद्दलच्या त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल सांगितले. श्रीलंका सरकार तामिळांची समानता, समेट, न्याय, शांतता आणि सन्मानाची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सलोखा प्रक्रिया पुढे सुरु ठेवेल. त्यामध्ये 13 व्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. उत्तर आणि पूर्वेसह संपूर्ण श्रीलंकेच्या विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार बनेल.
मित्रांनो,
मी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजपक्षे यांचे भारतात स्वागत करतो. त्यांच्या या भेटीमुळे आमचे परस्पर संबंध दृढ होतील. आणि आमचे सहकार्य दोन्ही देशांच्या विकासास आणि या क्षेत्रातील समृद्धी, शांतता आणि स्थिरतेस प्रोत्साहित करेल.
बोहोमा-स्थुती
नंद्री
धन्यवाद
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1594899)
अभ्यागत कक्ष : 146