माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोवा, 28 नोव्हेंबर 2019
गोव्यातील मांडवी नदीमध्ये आज एकीकडे सूर्य मावळत होता तेव्हाच दुसरीकडे शामाप्रसाद मुखर्जी क्रीडांगणात 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता समारंभ संपन्न झाला. या नऊ दिवसांच्या चित्रपट महोत्सवात जवळपास 200हून अधिक विविध धर्तीचे चित्रपट दाखवण्यात आले. तर मास्टर क्लासेस, चर्चासत्रे आणि विविध कलाकार आणि दिग्दर्शकांच्या पत्रकार परिषदांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले.
समारोप समारंभाला संबोधित करताना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रियो म्हणाले की, मूल्यांकनाच्या प्रवासात शिक्षण आणि विकासासाठी इफ्फी हा मंच महत्वाचा असून आम्ही या प्लॅटफार्मला कलाकारांचे शिक्षण आणि विकासासाठी उपलब्ध करू. मंत्री पुढे म्हणाले की, कला क्षेत्रात शिक्षणाला कधीही अंत नसतो. जितके तुम्ही ज्ञान प्राप्त कराल तितके तुम्हाला कळेल की, आपण किती आत्मसात केले. या भावनेने गोवा आणि भारतीय भूमीवर इफ्फी हा कायमस्वरुपी मंच राहील. हा असा एक मंच आहे की जिथे सर्व चित्रपट निर्माते एकत्रित येऊन संकल्पनांची देवघेव करतात आणि इतरांच्या भावना समजून घेतात. इफ्फीमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही विविध सोयींमध्ये वाढ करू, हे लक्षात ठेवून आम्ही 50 महिला चित्रपट दिग्दर्शकांना यंदा हा मंच उपलब्ध करून दिल्याने आज त्यांना जागतिक पातळीवर त्यांच्या कामगिरीचे प्रदर्शन करता येत आहे. जास्तीत जास्त महिला कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना त्यांची बुद्धीमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. भारत हा त्यासाठी उत्कृष्ट देश आहे, असे सुप्रियो यांनी सांगितले.
इफ्फीचे प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, सिनेमा हे अत्यंत प्रभावी संदेशवहन माध्यम आहे. ज्याचा परिणाम प्रत्यक्षपणे समाजातील गैर बाबी आणि प्रथा सुधारण्यासाठी होतो.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, इफ्फी 2019 ने आम्हाला केवळ करमणुकीखातर नाही तर परिवर्तनात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याची संधी दिली. यजमानपद भूषवताना गोवा प्रत्येकवर्षी नवीन कल्पना आणि नव निर्मितीचे प्रयोग घेऊन येत असतो. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे गोव्यामध्ये चित्रपटसृष्टीला स्वर्ग बनवण्याचे स्वप्न होते. मी आशा करतो की त्यांचे हे स्वप्न आम्ही पूर्ण करू. पायाभूत सेवा आणि नवीन तंत्रज्ञानयुक्त सोयी आम्ही गोव्यामध्ये चित्रपट निर्मितीसाठी प्रदान करू.
या कार्यक्रमात भारतीय चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कलावंत इलीयाराजा, प्रेम चोपडा, मंजू बोरा, अरविंद स्वामी आणि हनुबम पबनकुमार गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, चंद्रकांत कवळेकर, खासदार रुपा गांगुली, रवि किशन, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, इंटरटेंनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, इफ्फी सुकाणू समितीचे सदस्य शाजी एन. रामसे, रमेश सिप्पी आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यावेळी बोलतांना म्हणाले की, इफ्फी 2020 आणि 2021 ही दोन वर्ष सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सत्यजित रे यांना समर्पित असतील. पुढच्या वर्षीपासून सत्यजित रे यांचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त 51व्या इफ्फी समारोहात सत्यजित रे यांच्या चित्रपटांना प्रमुखस्थान दिले जाईल, असे खरे यांनी सांगितले. इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि समीक्षक यांची मांदियाळी इथे गेले 8 दिवस जमली होती. सुमारे 76 देशांमधले 190 पेक्षा अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले गेले. त्यात 24 ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा समावेश होता ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. या महोत्सवात 12 हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते हा एक विक्रमच म्हणावा लागेल, असे ते म्हणाले.
आजच्या समारोपाच्या समारंभात आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळाचे सभासद आणि इफ्फीला तंत्रज्ञान सेवा पुरवणारे भागीदार यांचाही सत्कार करण्यात आला.
यंदाच्या महोत्सवातील दर्शक-प्रतिनिधी संख्येच्या तपशीलाबाबत बोलताना गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये ब्रिटन, अमेरिका, श्रीलंका, युनायटेड अरब एमिरात यांचा मुख्य सहभाग होता. देशातील गोवा, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचे दर्शक-प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात भारतीय चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कलावंत इलीयाराजा, प्रेम चोपडा, मंजू बोरा, अरविंद स्वामी आणि हनुबम पबनकुमार यांचा सत्कार करण्यात आला.
नऊ दिवसांचा हा चित्रपट सोहळा आज इटालियन चित्रपट ‘मार्गे ॲण्ड हर मदर’ च्या प्रदर्शनाने संपन्न झाला.
ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित ‘पार्टीकल्स’ या चित्रपटाने 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. 40 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचा या पुरस्कारात समान वाटा आहे. पौंगाडावस्थेतील मुलांचा प्रवास आणि त्यायोगे भौतिकशास्त्राच्या मदतीने पलिकडच्या जगाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रवास याचे चित्रण या चित्रपटात आहे. संयत चित्रांकनासाठी या चित्रपटाचे परीक्षक मंडळाने कौतुक केले.
‘जल्लिकट्टू’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेल्लिसेरी यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे स्वरुप रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे आहे. हा मल्याळम चित्रपट आहे. दुर्गम गावातील एक बैल गावातून पळून जातो आणि त्यातून हिंसा उद्भवते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटातील ‘कोरिओग्राफीचे’ परीक्षक मंडळाने कौतुक केले.
ब्राझीलचा चित्रपट ‘मारीघेला’ या चित्रपटातील कार्लोस मारीघेलाच्या भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हुकूमशाहीच्या काळातील एक शक्तीशाली आणि प्रभावी व्यक्तीरेखा जॉर्ज यांनी साकारली आहे.
‘माई घाट: क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये प्रत्येकी असे सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
इफ्फी महोत्सवात यंदा विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ या चिनी चित्रपटाने पटकावला. या तिबेटी चित्रपटातील चित्रीकरणाचे सौंदर्याचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
‘अबू लैला’ आणि ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विभागून देण्यात आला. एका दहशतवाद्याच्या शोधात वाळवंट ओलांडणाऱ्या दोघा बालमित्रांची गोष्ट ‘अबू लैला’ चित्रपटात आहे. तर 24 तासात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमधील एका जोडप्याच्या नात्यामधले नाट्य ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
अभिषेक शहा दिग्दर्शित ‘हेल्लारो’ या चित्रपटाला परिक्षकांकडून विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपटातील संगीत आणि कोरिओग्राफीचे कौतुक परीक्षकांनी केले. चित्रपटात मांडण्यात आलेला महिला सबलीकरणाचा विषय आजच्या काळाशीही सुसंगत असल्याचे परीक्षकांनी सांगितले.
यावेळी आयसीएफटी-युनेस्को फेलिनी पदक, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासासाठी प्रदान करण्यात आले. इफ्फीतर्फे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाचे महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
रिकार्डो सालवेट्टी दिग्दर्शित ‘रवांडा’ या चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पटकावले आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल काऊंसिल फॉर फिल्म टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विशेष पुरस्कार संजय पी सिंग चौहान दिग्दर्शित ‘बहत्तर हूरे’ या चित्रपटाला देण्यात आला.
इफ्फी 2019 च्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता कुणाल कपूर यांनी केले. कोलोनिअल कझिन्सचे लेस्ली लुईस आणि हरिहरन यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळून ठेवले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित तनुश्री शंकर दिग्दर्शित अत्यंत सुंदर नृत्य सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
एशियन प्रीमिअर अंतर्गत इटलीच्या ‘डेस्पाईट दी फॉग’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात झाली. इंडियन पॅनोरमाअंतर्गत 15 नॉन फिचर फिल्म्स आणि 26 चित्रपट दाखवण्यात आले. यंदाच्या महोत्सवात रशिया फोकस कंट्री होता. सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या उद्घाटन समारंभात इसाबेल ॲन मॅडेलाईन हुपर्ट यांना जीवनगौवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटातील अमूल्य योगदानासाठी अभिनेते रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ॲवार्डने सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण 15 चित्रपट होते त्यापैकी दोन भारतीय होते. कॅलिडोस्कोप या विभागात निवडक असे 20 जागतिक चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले. यंदाच्या महोत्सवात भाग घेणाऱ्या चित्रपटांपैकी 24 चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत उतरलेले आहेत. आय-सी-एफ-टी-युनेस्को गांधी पदकासाठी स्पर्धेत चित्रपटांची निवड झाली होती त्यात एक भारतीय चित्रपट होता. ऑस्कर सिंहावलोकनाच्या विभागात ख्यातनाम ऑस्कर विजेते चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळाली.
चित्रपट निर्मिती क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यासाठी या महोत्सवात जागतिक चित्रपटातील 50 स्त्री-निर्मित ख्यातनाम चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. महोत्सवातील एक विभाग भारतीय न्यू वेव्ह चळवळींच्या चित्रपटांचा होता. यामध्ये 1950 ते 1970 च्या दशकांमधील वेगळ्या धर्तीचे 12 ख्यातनाम चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
या महोत्सवात ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांचे सहा चित्रपटही दादासाहेब फाळके पारितोषिक सिंहावलोकन विभागात दाखवण्यात आले. जुन्या पुनरूज्जीवित सिनेमांच्या विभागात उदय शंकर आणि ऋत्वीज घटक यांचे दोन चित्रपट दाखवण्यात आले. आशियातील चित्रपटांच्या विभागात यंदा जपानी निर्माते तकाशी मिके यांचे चित्रपट दाखवण्यात आले. यंदा 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले 1969 मधील चित्रपट दाखवण्याचा एक स्वतंत्र विभाग होता. दि गोवन स्टोरी या विभागात गोव्यातील सहा चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय यंदा प्रथमच दृष्टीहिनांसाठी समावेशकता वाढवावी म्हणून चित्रपट दृश्यांचे ऑडिओ कथन जोडण्याचा प्रयोग तीन चित्रपट दाखवण्याचा केला गेला होता.
B.Gokhale/G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor