माहिती आणि प्रसारण मंत्रालय
निर्भया जिवंत राहावी ही अतिव इच्छाच या कथेची प्रेरणा-दिग्दर्शक दयाळ पद्मनाभन
कॅमेऱ्यामागे काम करून जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कथा मांडल्या पाहिजेत-दिग्दर्शिका लक्ष्मी रामकृष्णन
गोवा, 25 नोव्हेंबर 2019
निर्भया प्रकरणानंतर तपास यंत्रणा वापर करत असलेल्या मेडिको लिगल प्रक्रियेत मोठे बदल घडून आले. या चित्रपटात मी काल्पनिक प्रसंगातून जर आज निर्भया हयात असती तर तिचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तीच या चित्रपटामागील प्रेरणा आहे असे ‘रंगनायकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दयाळ पद्मनाभन यांनी सांगितले. एका प्रकारे 1981 मध्ये आलेल्या आणि माझ्यावर मोठा प्रभाव असलेल्या ‘रंगनायकी’ या चित्रपटाला मी वाहिलेली आदरांजली आहे असेही ते म्हणाले.

या प्रकरणाच्या सामाजिक बाजूंवर या चित्रपटाचा प्रकाशझोत असून सहसा चित्रपटात शारीरिक अत्याचार पीडित घेत असलेल्या बदल्याच्या कथेपेक्षा हा चित्रपट वेगळा आहे. या चित्रपटात तीन प्राचीन शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी विशेषत्वाने दाखविण्यात आली आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर शारीरिक अत्याचार झालेल्या एका मुलीने धाडस दाखवून तक्रार नोंदवली आणि हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे, असे दयाळ पद्मनाभन यांनी स्पष्ट केले.
‘होम ओनर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका लक्ष्मी रामकृष्णन याही यावेळी उपस्थित होत्या. रामकृष्णन यांच्या चित्रपटाची प्रथमच इफ्फीमध्ये निवड करण्यात आली. चेन्नई पुरादरम्यान घरातच अडकलेल्या एका वृद्ध जोडप्याची कथा या चित्रपटात आहे. जास्तीत जास्त महिलांनी कॅमेऱ्याचे काम करणे गरजेचे आहे, असे रामकृष्णन म्हणाल्या. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांपासून मला प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
‘माया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास चंद्र हे देखिल पत्रकार परिषदेत उपस्थित होते. वैयक्तिक हानीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची गरज ही या चित्रपटाची संकल्पना असल्याचे ते म्हणाले. छायाचित्रण दिग्दर्शिका प्रियांका सिंगही यावेळी उपस्थित होत्या.
‘फोटो प्रेम’ या चित्रपटाची दिग्दर्शकद्वयी आदित्य राठी आणि गायत्री पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होती. प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांवरून चित्रपट निर्मितीची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांनी विषद केले.
G.Chippalkatti/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1593488)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English