माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘उमा-लाईट ऑफ हिमालया’ म्हणजे नयनरम्य यात्रा-आनंद ज्योथी
माझ्या संगीतावर गंगा नदीचा विस्मयजनक प्रभाव : जाओ पावलो मेंडोंनका
लोक भारतात आनंद शोधण्यासाठी येतात-इसबेला पिताकी
गोवा, 25 नोव्हेंबर 2019
ब्राझील म्हणजे फुटबॉल आणि सांबा नृत्य असे समीकरण आपल्या देशात आहे. मात्र इफ्फीमध्ये सोमवारी या देशाचे समीकरण अध्यात्म आणि संस्कृतीशी जोडले गेले. ‘उमा-लाईट ऑफ हिमालया’ या भारत-ब्राझिलियन सहनिर्मितीवर सफल चर्चा झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद ज्योथी, संगीतकार जाओ पावलो मेंडोंनका आणि अभिनेत्री इसबेला पिताकी या चर्चेत सहभागी झाले.

माझ्या चित्रपटाला सुरूवात, मध्य किंवा अंत अशी बांधीव संरचना नसून ही एक नयनरम्य यात्रा आहे, असे आनंद ज्योथी यांनी सांगितले. गंगा नदी ही या चित्रपटाची नायिका असून मी गंगा नदीकडे सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जगात श्रद्धास्थान असणारी गंगा ही एकमेव नदी आहे, असेही ते म्हणाले.
ब्राझीलमधले लोकं भारतीय संस्कृतीचे स्वागत करतात तसेच तिथल्या चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचेही स्वागत होते, असेही ते म्हणाले. भारतात ब्राझिलियन चित्रपट महोत्सव सुरू करण्याला आपला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. आनंद ज्योथी 2012 पासून ब्राझीलमध्ये भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत आले आहेत.
संगीत दिग्दर्शक जाओ यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, मी पहिल्यांदाच भारतात आलो असून येथे भेटलेले लोकं प्रेमळ आहेत आणि त्यामुळे माझ्या संगीत निर्मितीत नक्कीच मोठा बदल घडणार आहे. भारत हा अध्यात्मिक देश असून अध्यात्मामुळेच येथील लोकं बांधले गेले आहेत, असेही ते म्हणाले.
या चित्रपटातील अभिनेत्री इसाबेला पिताकी यांनी आपले भारताविषयीचे प्रेम अधोरेखित केले. माझ्यासाठी हा वैयक्तिक अध्यात्मिक अनुभव असल्याचे त्या म्हणाल्या. लोकं भारतात आनंद शोधायला येतात. मला केरळबरोबरच गोव्याविषयीही विशेष प्रेम वाटते, असे सांगून त्या म्हणाल्या की योगा आणि अध्यात्मामुळे ब्राझीलमध्ये भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होतो.
G.Chippalkatti/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1593474)
Visitor Counter : 159