माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी@50 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून संवादात्मक डिजिटल मल्टी मिडिया प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 23 NOV 2019 8:59PM by PIB Mumbai

गोवा, 23 नोव्हेंबर 2019

 

इफ्फीच्या अनुभवाला नवी जोड देण्यासाठी यावर्षी हायटेक डिजिटल, संवादात्मक मल्टीमिडिया प्रदर्शनाचे गोव्यात कला अकादमीजवळ दर्या संगम इथे आयोजन करण्यात आले आहे. ब्युरो ऑफ आउटरिच अँड कम्युनिकेशन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेल्या इफ्फी@50 या प्रदर्शनात इफ्फीच्या गेल्या 50 वर्षातल्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे. भारतीय चित्रपटांचा इतिहास जगापुढे आणण्यासाठी त्याचबरोबर जगभरातील चित्रपटसृष्टीचे भारतात दर्शन घडवण्याची संधी हा मंच उपलब्ध करुन देतो.

360 बुलेट शॉट, आग्युमेंटेड रिॲलिटी एक्सपिरियन्स, व्हर्टीकल डिजिटल डिस्पेल पॅनेल, व्हर्च्युअल रिॲलिटी ट्रल्स, होलोग्राम तंत्रज्ञान यासारख्या उच्च तंत्रज्ञानातून प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना स्वशिक्षणाचा ऐतिहासिक अनुभव हे प्रदर्शन देत असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. चित्रपट क्षेत्रात युवा पिढीसाठी अनेक संधी उपलब्ध असून, या प्रदर्शनातून त्यांना याविषयी मौल्यवान माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले. प्रश्नमंजूषेत सहभागी होण्याची संधी, एआर तंत्रज्ञानाचा वापर करुन महात्मा गांधी यांच्या आभासी प्रतिमेसमवेत फोटो काढण्याची संधी, इफ्फीच्या याआधीच्या वर्षातल्या दुर्मिळ क्लिप्स पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळणार आहे. संवादात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही या प्रदर्शनात उपलब्ध आहे. कोकणी चित्रपटासाठी एक विभाग असून, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यासाठीही एक विभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिशय मौल्यवान संधी आपल्या दारी आली आहे. या संधीचा फायदा आपण घ्यायला हवा. गोव्यातल्या आणि आजुबाजुच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे गोव्यातल्या एंटरटेनमेंट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी सांगितले.

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, रिजनल आऊटरिच ब्युरो पुणेचे संचालक संतोष अजमेरा या पत्रकार परिषदेत सहभागी झाले. इफ्फीचा सुरुवातीपासूनचा प्रवास दर्शवणारे लार्जस्केल प्रोजेक्शन मॅपिंग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, जेम्स बॉन्ड या चित्रपटांचे सेटस्‌ प्रोजेक्शन मॅपिंग तंत्राद्वारे निर्माण करण्यात आले आहेत.

याशिवाय चित्रपट प्रश्नमंजूषा, स्वच्छ भारत, एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा उपयोग टाळणे, एक भारत-श्रेष्ठ भारत यासारख्या, उपक्रमावर लघुपट निर्मिती यासंदर्भात मुलांसाठी दररोज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 50 विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात येत आहेत. 28 नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.

 

 

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1593304) Visitor Counter : 113


Read this release in: English