माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘फार फ्रॉम अस’च्या माध्यमातून निर्वासितांच्या समस्येचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न-दिग्दर्शक वेरेना कुरी आणि लॉरा बायरब्रॉर
‘फिलिंग्स टू टेल’ हा लोकांच्या भावनेसंबंधी चित्रपट - वेन ली
गोवा, 23 नोव्हेंबर 2019
‘फार फ्रॉम अस’ सिनेमाच्या माध्यमातून निर्वासितांच्या समस्येचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सध्या विस्थापितांचा विषय नैसर्गिक चर्चेचा विषय बनला आहे. कुठलाही देश अशा परिस्थितीतून जाऊ शकतो, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक वेरेना कुरी यांनी आज इफ्फी 2019 मध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

आम्ही हा चित्रपट जर्मनी, ब्राझील आणि अर्जेटिनामध्ये प्रदर्शित केला आहे. जर्मन लोकंही विस्थापितांच्या समस्येला सामोरे गेले आहेत त्यामुळे त्यांनाही हा चित्रपट परका वाटणार नाही, असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या चमूमध्ये पुरूष आहेत का याबाबत विचारले असता वेरेना हसून म्हणाल्या की, एका लहान मुलाबरोबर जंगलात चित्रपट बनवण्याचा हा प्रयत्न होता. चमूमध्ये सहभागी झालेले पुरुष हे आमचे उत्तम मित्र होते, ते आमच्या सैनिकांप्रमाणे होते.
आईचे कर्तव्य आणि इच्छा यामधील संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटातील पात्रं ब्राझील सीमेजवळ राहत असल्यामुळे ती जर्मन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषा बोलतात. जे आपल्याला वाटते तेच या चित्रपटातील पात्रांना वाटते, असे चित्रपटाच्या सहदिग्दर्शिका लॉरा बायरब्रॉर यांनी सांगितले.
‘फिलिंग्स टू टेल’ हा चित्रपट एका कलाकाराची कथा आहे. ज्याला वास्तव जग सोडून खेड्यात जायची इच्छा आहे. खेड्यातील काळ मागे जाणारा आहे तर वास्तव जगातला काळ पुढे जातो असे त्या म्हणाल्या. या चित्रपटाच्या निर्मितीचा अनुभव सांगताना वेन ली म्हणाल्या की, मला अनेक मित्रांनी प्रेम कथा लिहायला सांगितले पण मला माझ्या या स्वत:च्या भावना कथेत मांडायच्या होत्या. आपणा सर्वांना वास्तव जगातून बाहेर पडावे असे वाटत असते. तुम्हाला नाट्यपूर्ण कथा लिहायची गरज नसते. लोकं आणि त्यांच्या भावनांची साधी आणि सोपी कथा मी लिहिली आहे, असे त्यांनी सांगितले. चीनमध्ये चित्रपटासाठी अर्थ पुरवठा मिळवणे कठीण असते. सरतेशेवटी माझ्या कुटुंबांनी माझ्यावर विश्वास ठेवून हा चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक मदत केली, असेही त्या म्हणाल्या.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(Release ID: 1593269)
अभ्यागत कक्ष : 102