पंतप्रधान कार्यालय

आदित्य बिर्ला समूहाच्या सुवर्ण जयंती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

Posted On: 03 NOV 2019 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2019

 

कुमार मंगलम बिर्ला जी, अध्यक्ष, आदित्य बिर्ला समूह

थायलंडमधले मान्यवर,

बिर्ला परिवार आणि व्यवस्थापन सदस्य,

थायलंड आणि भारतातले उद्योग जगतातले मान्यवर,

मित्रहो,

नमस्कार,

सवादी ख्रप

सुवर्णभूमी थायलंड मध्ये आदित्य बिर्ला समूहाची सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. हा एक खास विशेष प्रसंग आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या चमुला मी शुभेच्छा देतो. थायलंडमध्ये आदित्य बिर्ला समूहाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रशंसनीय कार्याबाबत कुमार मंगलम बिर्ला यांनी जी माहिती सांगितली त्याबाबत मला आता लगेच माहिती मिळाली आहे. यामुळे थायलंड मधल्या अगणित लोकांसाठी संधी निर्माण होत आहेत.

मित्रहो,

आपण थायलंडमध्ये आहोत, ज्याच्या समवेत भारताचे दृढ सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. या देशात एका अग्रगण्य भारतीय उद्योग समूहाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. वाणिज्य आणि संस्कृती मध्ये परस्परांना जोडण्याची ताकद असते ही माझी धारणा अधिकच दृढ होत आहे. शतकांपासून साधू आणि व्यापारी दूर दूरच्या ठिकाणी भ्रमंती करत आले आहेत. संस्कृतीचे हे बंध आणि व्यापार, परस्परांमधले संबंध सदैव अधिक बळकट करणारे ठरोत अशी माझी इच्छा आहे.

मित्रहो,

भारतात होणाऱ्या काही सकारात्मक बदलांचे चित्र आपल्यासमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे. भारतात आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी, हा सर्वात योग्य काळ आहे असा मला विश्वास आहे. आजच्या भारतात काही गोष्टी वृद्धींगत होत आहेत तर काही गोष्टी कमी होत आहेत. व्यवसाय सुलभतेत भारत अग्रेसर आहे. याच प्रमाणे सुकर जीवनाच्या मार्गावरही आपण अग्रेसर आहोत.

थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे. आमच्या एकूण वन क्षेत्रातही वाढ झाली आहे. स्वामित्व हक्क आणि नाममुद्रा यांची संख्या वाढत आहे. उत्पादकता वाढत आहे. पायाभूत सुविधा वेगाने निर्माण करण्यात येत आहेत. उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच वेळी दुसरीकडे करांची संख्या घटत आहे. कर दर कमी करण्यात येत आहेत. लाल फितशाही कमी होत आहे. भ्रष्टाचार कमी होत आहे. दलाल आता इतिहास जमा झाले आहेत.

मित्रहो,

भारतात, गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक यशोगाथा पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. केवळ सरकारमुळे हे शक्य होते असे नाही. भारतात महत्वाकांक्षी अभियानाच्या रूपाने व्यापक बदल पहायला मिळत आहेत. जन भागीदारीच्या रूपाने या अभियानात ऊर्जेचा संचार झाल्यावर त्याला जन चळवळीचे स्वरूप प्राप्त होते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटायच्या त्या आता शक्य झाल्या आहेत. जीवनाच्या पायाभूत गरजा पोहोचण्याचा दर सुमारे 100 टक्के झाला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जन धन योजना. स्वच्छ भारत अभियान, हेही याचे एक उत्तम उदाहरण आहे. या अभियानाद्वारे स्वच्छता जाळे जवळ जवळ प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचले आहे.

मित्रहो,

भारतात सेवा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गळतीचा मोठा सामना करावा लागत होता. याचा सर्वात मोठा फटका गरिबांना सोसावा लागत होता. अनेक वर्षे, गरिबांवर जो पैसे खर्च केला जात होता तो वास्तवात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल. आमच्या सरकारने अशी संस्कृती समाप्त केली. थेट लाभ हस्तांतरण यामुळे हे शक्य झाले. या थेट लाभ हस्तांतरणामुळे दलाल संस्कृती आणि अक्षमता नष्ट झाली. यामध्ये अगदी किरकोळ त्रुटी म्हणजे जवळजवळ त्रुटी राहतच नाही. या थेट लाभ हस्तांतरणामुळे 20 अब्ज डॉलर्सची व्यापक बचत झाली आहे. आपण घरोघरो एलईडी बल्ब पाहिले असतील, ऊर्जा बचतीत हे अपेक्षेपेक्षा जास्त प्रभावी आहेत, हे आपणाला माहीत असेलच. मात्र याचा भारतात काय प्रभाव आहे हे आपणाला माहीत आहे का? आम्ही गेल्या काही वर्षात 360 दशलक्ष पेक्षा जास्त एलईडी बल्बचे वाटप केले आहे. आम्ही 10 दशलक्ष पथ दिव्यांचे एलईडी मध्ये रूपांतर केले. यातून आम्ही सुमारे 3.5 अब्ज डॉलर्सची बचत केली आहे. याबरोबरच कार्बन उत्सर्जनातही घट झाली आहे. बचत झालेली रक्कम म्हणजे कमावलेली रक्कम असे माझे मत आहे. या रकमेचा उपयोग आता इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेला सबल करण्यासाठी करण्यात येत आहे.

मित्रहो,

आजच्या भारतात, कठोर मेहनत घेणाऱ्या करदात्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते. करविषयक क्षेत्रात आम्ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वाधिक जन अनुकूल कर व्यवस्था असलेल्या देशामध्ये भारताची गणना केली जाते याचा मला आनंद आहे. या आघाडीवर अधिक उत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या पाच वर्षात आम्ही मध्यम वर्गावरचे कराचे बरेच ओझे कमी केले आहे. व्यक्तिगत उपस्थिती वाचून कर आकलनाची आम्ही आता सुरवात करत आहोत. ज्यामुळे मनमानी अथवा त्रास देण्याची शक्यताच राहणार नाही. भारतात कॉर्पोरेट कर दर कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आपण नक्कीच ऐकले असेल. वस्तू आणि सेवा करामुळे, भारतात आर्थिक एकीकरणाचे स्वप्न साकार झाले आहे. वस्तू आणि सेवा कर अधिक जन अनुकूल करण्याच्या दिशेने आम्ही काम करू इच्छितो. या बाबींमुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत आता जगातल्या सर्वात आकर्षक अर्थव्यवस्थापैकी एक अर्थव्यवस्था झाली आहे.

मित्रहो,

भारतात गेल्या पाच वर्षात 286 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक गेल्या 20 वर्षात भारतात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या निम्मी आहे. त्यातील 90 टक्के स्वतः मंजुरी मार्फत आली आहे. यापैकी 40 टक्के गुंतवणूक नव निर्मिती साठी आहे. यावरूनच लक्षात येते की गुंतवणूकदार भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने गुंतवणूक करत आहेत. अनेक क्षेत्रातल्या क्रमवारीतला भारताचे मानांकन पाहता भारताचा विकास पथ लक्षात येतो. थेट परकीय गुंतवणूकीसाठीच्या सर्वोच्च 10 स्थानात भारताची गणना होते. गेल्या पाच वर्षात भारताने जागतिक नाविन्यता निर्देशांकात 24 स्थानांची झेप घेतली आहे.

यापैकी दोन निर्देशांकाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. भारताने गेल्या पाच वर्षात जागतिक बँकेच्या व्यापार सुलभता निर्देशांकात 79 अंकांची झेप घेतली आहे. या निर्देशांकात भारत 2014 या वर्षी 142 व्या स्थानावर होता, आता 2019 या वर्षात त्यात प्रगती करून भारत आता 63 व्या स्थानावर पोहोचला आहे. हे मोठे यश आहे. सुधारणांच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 10 देशात भारताने सलग तिसऱ्या वर्षी स्थान मिळवले आहे. भारत एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे. भारतात केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारे आहेत. या संदर्भातले दिशात्मक बदल, सुधारणांसाठीची आमची कटीबद्धता दर्शवतात. भारतात व्यापारासाठीची परिस्थिती अधिक उत्तम करण्यासाठी सरकार आणि जनता एकजुटीने काम करत आहेत.

मित्रहो,

याच प्रमाणे, जागतिक आर्थिक फोरमच्या पर्यटन प्रतिस्पर्धी क्षमता निर्देशांकातही भारताच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. भारत या निर्देशांकात 2013 मध्ये 65 व्या क्रमांकावर होता, तर या वर्षी 2019 मध्ये झेप घेत 34 व्या स्थानावर पोहोचला आहे. ही एक सर्वात मोठी झेप आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत 50 टक्के वृद्धी झाली आहे. आपण सर्व हे जाणताच की कोणताही पर्यटक अशा कोणत्याही ठिकाणी पर्यटनासाठी जाणार नाही जिथे त्याला आराम, सुरक्षा आणि सोयी- सुविधा उपलब्ध नसतील. आपल्या इथे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत तर त्याचा हा अर्थ आहे की यासंदर्भात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा चांगला परिणाम दिसत आहे. भारतात उत्तम रस्ते, उत्तम हवाई कनेक्टिव्हिटी, उत्तम स्वच्छता आणि चांगली कायदा सुव्यवस्था आहे त्यामुळे संपूर्ण जगभरातले लोक इथे पर्यटनासाठी येत आहेत हे सत्य आहे.

मित्रहो,

परिवर्तनाच्या परिणामानंतरच असे मानांकन शक्य होऊ शकते. हे मानांकन म्हणजे पूर्व अनुमान नव्हे तर प्रत्यक्ष जे काम झाले आहे त्याची अभिव्यक्ती आहे.

मित्रहो,

भारत आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे आणखी एक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. 2014 मध्ये माझे सरकार सत्तेवर आले तेव्हा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन साधारणतः 2 ट्रिलियन डॉलर होते. म्हणजे 65 वर्षात 2 ट्रिलियन डॉलर. मात्र गेल्या पाच वर्षात आम्ही यात वाढ करून ते सुमारे 3 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेले आहे. यावरून 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याचे आपले स्वप्न लवकरच साकार होईल असा विश्वास मला वाटतो.

पायाभूत सुविधांमध्ये आम्ही 1.5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत.

मित्रहो,

मला एका गोष्टीचा अभिमान आहे ती म्हणजे बहराचे प्रतिभाशाली आणि कुशल मनुष्य बळ. डिजिटल ग्राहकांची सर्वात मोठी आणि वेगाने विकसित पावणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत एक बाजारपेठ आहे.भारतात एक अब्ज स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत आणि अर्धा अब्ज पेक्षा जास्त इंटरनेट वापर कर्ते आहेत. फोर जी सह आपल्या उद्योगाचा वेग आम्ही राखला असून विकास आणि प्रशासनाशी संबंधित आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आपलेसे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या आघाडीच्या पार्श्वभूमीवर जागतिक निर्मिती केंद्र म्हणून पुढे येण्याची आमची आकांक्षा आहे.

मित्रहो,

‘थायलंड 4.0’ अंतर्गत थायलंडला एका मूल्याधारीत अर्थव्यवस्थेत रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, जे विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यता आणि रचनात्मकतेवर आधारित आहे. भारताच्या प्राधान्याना अनुसरून आणि त्याला पूरक असे त्याचे स्वरूप आहे. भारताच्या डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, गंगा संरक्षण योजना, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी आणि जल जीवन अभियानात भागीदारीसाठी व्यापक संधी आहेत.

मित्रहो,

जेव्हा भारत समृद्ध होतो तेव्हा संपूर्ण जग समृद्ध राहते. भारतात विकासासाठी आमचा दृष्टिकोन असा आहे की ज्यामुळे पृथ्वी उत्तम राहण्याचा मार्ग सुकर होतो. आयुष्यमान भारताच्या माध्यमातून 500 दशलक्ष भारतीयांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा विचार आम्ही करतो तेव्हा हे स्वाभाविकच आहे, की यातून उत्तम वसुंधरेचा मार्गही शोधला जातो. 2030 च्या जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधीच, क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यामुळे क्षयरोगाच्या विरोधातल्या जागतिक लढ्याला नक्कीच बळकटी मिळणार आहे. याबरोबरच आम्ही आमच्या यशोगाथा आणि सर्वोत्तम प्रथा, जगाला देऊ इच्छितो. आमचा दक्षिण आशिया उपग्रह या क्षेत्रातल्या अगणित लोकांना, विशेषतः विद्यार्थी आणि मच्छीमारांच्या उपयोगी पडत आहे.

मित्रहो,

आमच्या 'पूर्वेकडे पहा' या धोरणाला अनुसरून या क्षेत्रात कनेक्टिव्हिटी वाढवण्यावरही आम्ही विशेष लक्ष देत आहोत. थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरची बंदरे आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरची चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता यांच्यात थेट संपर्कामुळे आपली आर्थिक भागीदारीही वाढेल. अशा सर्व अनुकूल घटकांचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे. आपल्या भौगोलिक सानिध्याचाही आपण लाभ घ्यायला हवा.

मित्रहो,

आपल्या अर्थव्‍यवस्था सक्षम आहेत त्याचबरोबर परस्परांना पुरकही आहेत, आपल्या संस्कृतीत समानता आहे आणि आपण एकमेकांप्रती सद्‌भावही बाळगतो, या सर्व बाबी लक्षात घेता, आपली भागीदारी सर्वाना लाभदायक ठरेल अशा पद्धतीने आपण वृद्धिंगत करू शकतो याचा मला विश्वास आहे. आपल्याला हे सांगून माझे संबोधन मी समाप्त करू इच्छितो की, गुंतवणूक आणि सुलभ व्यापार यासाठी भारतात या, नाविन्यता आणि शानदार आरंभासाठी भारतात या, सर्वोत्तम पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी भारतात या, लोकांच्या स्नेहपूर्ण आतिथ्यशीलतेचा अनुभव घेण्यासाठी भारतात या, भारत मनापासून आपली प्रतीक्षा करत आहे.

धन्यवाद

खोब खुन ख्रप

आपल्याला अनेक - अनेक धन्यवाद..!

 

 

G.Chippalktti/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1591936) Visitor Counter : 83


Read this release in: English