उपराष्ट्रपती कार्यालय

पत्रकारिता देशासाठी एक पवित्र मिशन - उपराष्ट्रपती


लोकांना सक्षम बनवण्यात पत्रकारिता महत्वाची भूमिका पार पाडत आहे

बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता, निष्पक्षपातीपणा आणि अचूकता राखण्यावर भर असायला हवा

स्वातंत्र्य आणि जबाबदारी अविभाज्य मानली जाऊ शकत नाही

वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्या सुरु करणारे उद्योजक आणि राजकीय नेते स्वतःचे हित जपतात - उपराष्ट्रपती

पत्रकारांसाठी आचारसंहिता तयार करण्याचे माध्यम संस्थांना आवाहन

विकासविषयक बातम्यांना जास्तीत जास्त जागा देण्याचे माध्यमाना आवाहन

काश्मीरबाबत तथ्य जगासमोर आणण्याचे भारतीय पत्रकार समुदायाला केले आवाहन

पत्रकारितेतील सर्वोत्कृष्टतेसाठी 'राष्ट्रीय पुरस्कार 2019' च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान

प्रविष्टि तिथि: 16 NOV 2019 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 नोव्हेंबर  2019 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज माध्यमांना बातम्या रंगवून न सांगण्याची विनंती केली तसेच बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता, निष्पक्षपातीपणा आणि अचूकता राखण्याच्या गरजेवर भर दिला. वृत्तविभागाचा निष्पक्षपातीपणा आणि पावित्र्य कायम अबाधित राहायला हवे असे ते म्हणाले.

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आज नवी दिल्लीत प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की पत्रकारांनी द्वारपालांची भूमिका पार न पाडता  निष्पक्ष, वस्तुनिष्ठ, अचूक आणि संतुलित माहिती वाचक आणि दर्शकांसमोर सादर करणे हे पत्रकारितेचे मुख्य तत्व आहे.

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, खोट्या बातम्याचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर आणि समाज माध्यमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता सध्याच्या काळात हे अतिशय महत्वाचे आहे. “सनसनाटी, पक्षपाती आणि पेड न्यूज आधुनिक काळातील माध्यमांचे दु: ख बनले आहे असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत तिरकस आणि अभिप्रायपूर्ण वृत्तांकनाला अर्थपूर्ण वृत्तांकन म्हणता येणार नाही असे ते म्हणाले.

वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्याची स्थापना उद्योजक आणि राजकीय नेते स्वतःचे हित जपण्यासाठी करतात याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे पत्रकारितेचा मूळ उद्देश नाहीसा होतो असे ते म्हणाले. स्वातंत्र्य आणि जबाबदारी अविभाज्य मानली जाऊ शकत नाही असे सांगून ते म्हणाले की माध्यमांनी केवळ लोकशाहीचे रक्षण करणारा पहारेकरी म्हणून काम न करता समाजाला भेडसावणाऱ्या कुप्रथांविरोधात लढायला हवे.

गेल्या काही वर्षात माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्याचबरोबर पत्रकारितेच्या मूल्यातही बदल झाला. पूर्वी पत्रकारिता देशसेवेचे मिशन म्हणून पाहिली जात होती असे सांगून ते म्हणाले की पीसीआय सारख्या संस्थांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

माध्यमांनी पत्रकारांसाठी आचार संहिता तयार करण्याची वेळ आली आहे असे नायडू म्हणाले. लोकशाहीचे रक्षण आणि समाजाच्या कल्याणासाठी पत्रकारिता महत्वपूर्ण भूमिका पार पाडते त्यामुळे हा चौथा स्तंभ मजबूत करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

मोबाइल फोन माहितीच्या आदानप्रदानात क्रांती घडवत आहे. स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येकजण एक संभाव्य पत्रकार बनला आहे असे ते म्हणले.

विकासविषयक बातम्यांना विशेषतः कृषीसारख्या महत्वपूर्ण क्षेत्राला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी केले.

उपराष्ट्रपती म्हणाले कि केवळ कायदे बनवून अपेक्षित परिवर्तन घडवून आणता येणार नाही. भ्रष्टाचार आणि लैंगिक तसेच जातीय भेदभाव सारख्या सामाजिक कुप्रथा दूर करण्याच्या गरजेबाबत जनतेचे एकमत तयार करण्यात माध्यमांनी सकारात्मक भूमिका पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. कलम 370 ही केवळ तात्पुरती तरतूद होती जी संसदेने मोठ्या बहुमताने रद्द केली. काश्मीरबाबत तथ्य जगासमोर आणण्याचे आवाहन त्यांनी भारतीय पत्रकार समुदायाला केले

यावेळी उपराष्ट्रपतींनी विविध श्रेणीतले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

नायडू यांनी तीन पुस्तिकांचे अनावरण  केले -- 1966 पासून भारतीय प्रेस परिषदेची डिरेक्टरी, पत्रकारांसाठी आचार विषयक निकष आणि  ‘रिपोर्टिंग- इंटरप्रिटेशन- अ जर्नी’ यांचा यात समावेश आहे.

 

D.Wankhede/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1591870) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English