पंतप्रधान कार्यालय

ब्रिक्स देशांच्या जलमंत्र्यांची भारतात पहिली मिटींग बोलवण्याचा पंतप्रधानांचा प्रस्ताव


अभिनवता आपल्या विकासाचा आभार बनला आहे-पंतप्रधान

11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

Posted On: 14 NOV 2019 9:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमध्ये 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला आज संबोधित केले.  अन्य ब्रिक्स देशांच्या प्रमुखांनीही पूर्ण सत्राला संबोधित केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना ‘अभिनव भविष्यासाठी आर्थिक विकास’ ही अतिशय समर्पक असून अभिनवता आपल्या विकासाचा आधार बनला आहे. ब्रिक्स अंतर्गत, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी सहकार्य मजबूत करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

आता आपल्याला ब्रिक्सची दिशा ठरवायची असून पुढल्या दहा वर्षात परस्पर सहकार्य अधिक प्रभावी असायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. अनेक क्षेत्रांमध्ये सफलता मिळूनही काही क्षेत्रांमध्ये प्रयत्न वाढवण्यासाठी पुरेसा वाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ब्रिक्स देशांतर्गत व्यापार जागतिक व्यापाराच्या केवळ 15 टक्के असून ब्रिक्स देशांची एकत्रित लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 40 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारतात अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या ‘स्वीट इंडिया’ चळवळीचा उल्लेख करत ते म्हणाले की, तंदुरुस्ती आणि आरोग्य क्षेत्रात ब्रिक्स देशांमध्ये संपर्क आणि अदान-प्रदान वाढायला हवे. शहरी भागात शाश्वत जल व्यवस्थापन आणि स्वच्छता ही महत्वाची आव्हानं आहेत. ब्रिक्स जलमंत्र्यांची पहिली बैठक भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

दहशतवादविरोधात ब्रिक्स धोरणांवर आधारीत पहिले सत्र आयोजित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या पाच कृती गटांचे प्रयत्न आणि कार्य दहशतवाद आणि अन्य संघटीत गुन्ह्यांविरोधात ब्रिक्स सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

व्हिसा, सामाजिक सुरक्षा करार आणि पात्रता संबंधी परस्पर मान्यतेच्या माध्यमातून पाच देशांच्या जनतेला प्रवास आणि कामासाठी आपण अधिक पूरक वातावरण देऊ, असे त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1591747) Visitor Counter : 100


Read this release in: English