पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2019 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019
पंतप्रधांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी आज पंजाब, हरियाणा आणि दिल्ली राज्यांनी दिल्ली प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा पुन्हा आढावा घेतला. मागील 24 तासात शेतातील खुंट जाळणे तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी हाती घेतलेल्या अतिरिक्त उपाययोजनांबाबतही माहिती घेतली.
परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून असल्याचे पंजाबच्या मुख्य सचिवांनी सांगितले तसेच 1981 च्या प्रदूषणाला आळा आणि ताबा मिळवण्याच्या कायद्याअंतर्गत कारवाई केल्याचीही माहिती दिली.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात शेतातले खुंट जाळण्याच्या घटना लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली.
पाणी शिंपडण्याचे प्रमाण वाढवण्यात आल्याची माहिती दिल्लीच्या मुख्य सचिवांनी दिली. परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी शहरात उघड्यावर कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली असून या बंदीचा भंग करणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड आकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात हवामान अनुकूल राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गरज पडेल त्या प्रमाणे प्राथमिक कृती करण्यावर पंतप्रधानांनी भर दिल्याचे प्रधान सचिवांनी सांगितले. या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व संबंधितांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रणाली स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1590429)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English