संरक्षण मंत्रालय

दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे अधिक सक्षम करावेत- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची एससीओकडे मागणी


शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य राष्ट्रांना भारतात गुंतवणूक करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन

Posted On: 02 NOV 2019 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्‍हेंबर 2019

  

दहशतवादाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे अधिक कठोर आणि सक्षम करण्याची गरज आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. ते आज उजबेकिस्तानच्या ताश्कंद येथे शांघाय सहकार्य परिषदेच्या 18 व्या परिषदेत बोलत होते. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची पूर्ण क्षमतेने कोणताही दुटप्पीपणा न ठेवता अंमलबजावणी केली जावी, असेही ते म्हणाले.

“दहशतवाद आपल्या समाजाला विस्कळीत करून आपल्या विकासाला खीळ घालत असतो. त्यामुळे एससीओ देशांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे” असे राजनाथ सिंह म्हणाले.एसीओ संयुक्त लष्करी अभ्यास “सेंटर 2019” ची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी रशियाचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला विविध देशांच्या लष्करी पथकांनी या संयुक्त सरावात भाग घेतला होता.

जागतिकीकरणामुळे एससीओ देशांसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, मात्र त्यासोबतच अनेक बहुस्तरीय, गुंतागुंतीचे धोकेही निर्माण झाले आहेत, ज्यांचा फटका विकसनशील देशांना अधिक बसतो आहे. दहशतवाद, हवामान बदल, संसर्गजन्य आजार, गरिबी, असमानता अशा संकटांचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. शांघाय सहकार्य परिषदेतील सदस्य राष्ट्रांनी भारतात गुंतवणूक करावी, त्यांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार सिंह यांनी केला. थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.

भारताच्या “मेक इन इंडीया” कार्यक्रमाअंतर्गत भारतीय कंपन्यांसोबत संयुक्तपणे उद्योग व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन त्यांनी केले. आर्थिक सहकार्य हा लोकांचे भविष्य घडवणारा पाया असून जनतेच्या कल्याणासाठी अर्थव्यवस्थेचा विकास अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

एससीओच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची पुढची बैठक 2020 साली भारतात होणे हा भारताचा सन्मान असेल, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1590116) Visitor Counter : 94


Read this release in: English