पंतप्रधान कार्यालय

रियाध येथे झालेल्या ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’ मधले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण

Posted On: 29 OCT 2019 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

युवर रॉयल हायनेस, एक्सलन्सीज्, महिला आणि सद्‌गृहस्थ, मित्रांनो, नमस्कार, शुभ संध्याकाळ!

या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल हिज मॅजेस्टी द किंग आणि दोन पवित्र मशिदींचे पालक-संरक्षक आणि माझे बंधू हिज रॉयल हायनेस द क्राउन प्रिन्स यांना मी धन्यवाद देवू इच्छितो. सौदी अरेबिया आणि इथं असलेल्या पवित्र मशिदी, दुनियाभरातल्या कोट्यवधी लोकांचे आस्थेचे केंद्र आहेत. ही भूमी जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही ऊर्जा-स्त्रोत आहे. आज रियाध या उर्जावान शहरामध्ये आपल्या सर्वांच्याबरोबर मलाही खूप सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे जाणवत आहे.

मित्रांनो,

फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’च्या विषयावरून स्पष्ट होते की, या फोरमचा उद्देश काही फक्त इथे अर्थतंत्राविषयीच चर्चा करण्याचा नाही तर संपूर्ण विश्वामध्ये नव्याने निर्माण होत असलेले ट्रेंडस् समजून घेणे आणि त्यातून विश्व-कल्याणाचे मार्ग शोधणे हाही उद्देश आहे. याच कारणाने हा डायनॅमिक प्लॅटफॉर्म व्यावसायिक जगताच्या वार्षिक कॅलेंडरचा महत्वपूर्ण भाग बनला आहे. केवळ तीन वर्षांच्या कमी कालावधीमध्ये या फोरमने खूप लांबचा पल्ला गाठला आहे. या यशाबद्दल माझे मित्र आणि बंधू क्राउन प्रिन्स हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्या या फोरमला दावोस ऑफ द डेझर्टअसं म्हटलं जातं. गेल्या शतकामध्ये सौदी अरेबियाच्या लोकांनी केलेले परिश्रम आणि निसर्गाचे मिळालेले वरदान यामुळे या वाळवंटातल्या रेतीमध्ये सोनं तयार झालं. मनात आलं असतं तर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाने आराम करून अगदी बसून खाल्लं असतं. परंतु तुम्ही सर्वांनी आपल्या येणा-या पिढीचा विचार केला. भविष्याची चिंता केली, संपूर्ण मानवतेचा विचार केला. हिज हायनेस क्राउन प्रिन्स यांचे यासाठी मी अभिनंदन करतो. त्यांनी या फोरमच्या केवळ नावात फ्यूचरहा शब्द घातला नाही तर परिषदेची संपूर्ण संकल्पनाच भविष्याचा वेध घेणारी निश्चित केली. भविष्य उन्मुख परिषद ठेवली. अशामध्ये त्यांचा बंधू आणि शेजारी या नात्याने या उत्साही प्रयत्नामध्ये दुनियेतल्या सर्वात वेगाने विकासमान अर्थव्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी इथं येणं महत्वाचं आणि स्वाभाविक  काम ठरतं.

मित्रांनो,

भारतीयांच्या अनेकानेक शुभेच्छा घेवून मी आज आपल्यामध्ये आलो आहे. हजारों वर्षांपासून आमचे आणि सौदी अरेबियाचे संबंध आहेत. ही मैत्री अशी आहे की, त्याला आपण सदकतुमअसे संबोधन देता. एकमेंकांविषयी आपल्याला आपलेपणा वाटतो. आपल्यातल्या ऐतिहासिक संबंध आणि संपर्कांनी आपल्यामधील रणनीतिक भागीदारीचा मजबूत पाया रोवला गेला आहे आणि आज आम्ही क्राउन प्रिन्स यांच्याबरोबर चर्चा करून स्ट्रेटजिक पार्टनरशिप कॉन्सिलची स्थापना करून आपल्यातील संबंधितांना नवीन उंची प्रदान करून दिली आहे. हिज मॅजेस्टी द किंग आणि हिज रॉयल हायनेस क्राउन प्रिन्स यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यातील संबंधांमध्ये प्रगती आणि आपलेपणा निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नांबद्दल, भारताविषयी त्यांनी जो आपलेपणा दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हमध्ये आज मला ‘व्हॉटस् नेक्स्ट फॉर ग्लोबल बिझनेस’ आणि त्यामध्ये भारतामध्ये निर्माण होत असलेल्या संधी आणि शक्यता, आमच्या अपेक्षा आणि लक्ष्य याविषयी आपले मत मांडण्याची संधी मिळाली आहे. भारताने आगामी पाच वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था दुप्पट करून 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अशावेळी तर या विषयाचं जास्तच महत्व आणि औचित्य आहे.

मित्रांनो,

आज ज्यावेळी आम्ही भारतामध्ये विकासकार्याला वेग देवू इच्छितो त्यावेळी आगामी ट्रेंडस्-प्रवाह नेमके कसे असतील, हे चांगल्या पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच , मी आज आपल्याशी वैश्विक व्यवसायाला प्रभावित करणारे पाच मोठे आणि महत्वाचे प्रवाह कोणते, कसे आहेत, याविषयी बोलू इच्छितो. पहिला ट्रेंड किंवा प्रवाह आहे- तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना- नवीन संशोधन. दुसरा प्रवाह आहे- वैश्विक वृद्धीसाठी पायाभूत सुविधांचे महत्व. तिसरा प्रवाह आहे मनुष्य बळ आणि भविष्यातल्या कामाच्या प्रकारांमध्ये होत असलेले बदल. चौथा प्रवाह आहे- पर्यावरणाविषयी  सजगता आणि दया आणि अखेरचा पाचवा प्रवाह आहे, व्यवसायभिमुख, व्यवसायाला पुरक ठरेल असे व्यवसायस्नेही प्रशासन.

मित्रांनो!

तंत्रज्ञान आणि संशोधन यांच्या वाढत्या प्रभावाचे तर आपण सर्वजण साक्षीदार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, जनुकशास्त्र यासारख्या परिवर्तनशील तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान, संशोधन यापुढेही जावून रोजच्या जीवनाचा तंत्रज्ञान एक महत्वाचा भाग बनत आहे. तंत्रज्ञानातल्या या बदलाचा ज्यांनी तंत्रज्ञान त्वरेने स्वीकारले आहे, त्या समाजाला चांगला आणि सर्वात जास्त लाभ झाला आहे तसेच होतही आहे. या समाजामध्येच आता भविष्यात आणखी किती उपयुक्त तंत्रज्ञानाचे आपण संशोधन करायचे, या प्रकारची संस्कृती विकसित  होत आहे. भारतामध्ये आम्ही अशी संस्कृती मजबूत करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत. मग त्यासाठी युवा वर्गापुढे आम्ही स्टार्टअपचे आव्हान ठेवले. तसेच हॅकेथॉनची संकल्पना प्रत्यक्षात आणली. तसेच शालेय पातळीवर अटल टिंकरिंग लॅब्स सुरू केल्या. या ठिकाणी शाळकरी मुलं नवीन संशोधनाचा स्वतः अनुभव घेतात. आज भारतामध्ये संशोधन आणि विकास याविषयावर टेक-एंटरप्रेनरशिपची एक व्यापक इको-सिस्टिम तयार होत आहे. आमच्या या प्रयत्नांचे परिणाम आता दिसून येवू लागले आहेत. आज भारत जगातला तिसरा सर्वात मोठा स्टार्ट अप इको-सिस्टिम बनला आहे. भारतातल्या दुस-या आणि तिस-या स्तरावरच्या शहरांमध्येही स्टार्ट-अप्स सुरू झाले आहेत. भारतामध्ये एक बिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त व्हॅल्यूएशनवाल्या युनिकॉर्नची संख्या वाढत चालली आहे. आमच्या अनेक स्टार्ट अप्समध्ये वैश्विक स्तरावरचे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला लागले आहेत. भारतीय स्टार्ट अप्समध्ये अगदी सर्व काही व्यवसाय केले जात आहेत. यामध्ये अन्नपदार्थ पोहोचवण्यापासून ते वाहतुकीपर्यंत आणि विविध सेवां देण्यापासून ते वैद्यकीय उपचारापर्यंत आणि पर्यटनापर्यंत सर्व व्यवसाय आहेत. आणि म्हणूनच जगातले सर्व गुंतवणुकदार, विशेषकरून व्हेंचर फंडस्‌ना माझे आवाहन आहे की, आपण सर्वांनी आमच्या स्टार्ट-अप इकोसिस्टिमचा लाभ घ्यावा. भारतामध्ये नवसंशोधनामध्ये केलेली गुंतवणूक सर्वात जास्त परतावा देणारी ठरेल, असा माझा विश्वास आहे. आणि हा परतावा केवळ भौतिक नसेल, तर युवावर्गाला शक्तिशाली बनवणारा ठरेल. 

मित्रांनो!

वैश्विक वृद्धी आणि व्यावसायिक विकास यांच्यासाठी पायाभूत सुविधांचे महत्व सातत्याने वाढत जात आहे. मला असं वाटतं की, पायाभूत सुविधांमध्ये संधींची वाढ दुपटी-तिपटीनं होत जातेय. पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत व्यापक संधी असतात. तर दुसऱ्या बाजुला व्यवसायाच्या वाढीसाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता असते.

मित्रांनो,

आज दुनियेमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची सर्वात जास्त संधी विकसनशील देशांमध्ये आहे. अशियामध्ये पाहिलं तर पायाभूत सुविधांमध्ये दरवर्षी 700 बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. भारतामध्ये आगामी काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये 1.5 ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. आजच्या काळात आम्ही केवळ पायाभूत सुविधा या एकाच क्षेत्राचा विचार करीत नाही, तर आम्ही समग्र, एकत्रित सर्वांगीण प्रगतीचा विचार करतो. यामध्ये वन नेशन, वन पॉवर ग्रिड, वन नेशन- वन गॅस ग्रिड, आणि वन वॉटर ग्रिड, वन नेशन वन मोबिलिटी कार्ड, वन नेशन वन ऑप्टिकल फायबर नेटवर्कअसे आमचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतामध्ये पायाभूत सुविधांचे एकीकरण होत आहे. आम्ही प्रत्येक भारतीयाला घरकूल देण्याचे आणि प्रत्येक घरापर्यंत वीज आणि नळाव्दारे पेयजल पुरवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. पायाभूत सुविधांची निर्मितीचा वेग आणि परिमाण यांच्यामध्ये भारताने अभूतपूर्व वृद्धी केली आहे. म्हणूनच भारतामध्ये पायाभूत सुविधांची दोन अंकी वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये कपॅसिटी सॅच्युरेशनची कोणतीही शक्यता नाही. यामुळे गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळण्याची सुनिश्चितता आहे.

मित्रांनो,

तिसरा प्रवाह आहे तो मनुष्य बळ आणि भविष्यातल्या कामकाज पद्धतीमध्ये येत असलेल्या परिवर्तनाचा! यालाही खूप महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे निर्णय गुणात्मक मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्याचबरोबर कुशल मनुष्य बळ कोणत्याही कंपनीच्या मूल्यांकनाचा मानदंड बनला आहे. अशा वेळी लोकांना वेगाने कुशल बनवणे, आमच्यासमोर एक आव्हान आहे. ज्याप्रमाणे कार्यपद्धतीमध्ये परिवर्तन घडून आले आहे, त्यानुसार आगामी वर्षांमध्ये आपल्या लोकांना पुन्हा एकदा कौशल्याचे धडे देण्याची गरज पडणार आहे. शिका आणि पुन्हा नव्याने शिका असे चक्र सुरू ठेवावे लागणार आहे.

मित्रांनो !

भारताच्या कुशल मनुष्य बळाला संपूर्ण दुनियेतून आदर आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. बुद्धिमान भारतीयांनी इथं सौदी अरेबियामध्ये शिस्त आणि कायद्यांचे पालन करणाऱ्या परिश्रमी, कुशल कार्यबळाच्या रूपाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतामध्ये कौशल्याचा विकास करण्यासाठी आम्ही एक सर्वंकष दृष्टिकोन तयार केला आहे. आम्ही यावर सातत्याने कार्यरत आहोत. कुशल भारतया संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही आगामी तीन-चार वर्षांमध्ये 400 मिलियन लोकांना वेगवेगळ्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करणार आहोत. भारतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना यामुळेच निश्चितपणे कुशल मनुष्यबळ मिळू शकणार आहे.

मित्रांनो,

कुशल मनुष्यबळाची सहजपणाने उपलब्धता झाली तर, संपूर्ण जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी होईल. आंतरराष्ट्रीय व्यापारी करारांना केवळ वस्तू मालापुरते मर्यादित ठेवू नये असे मला वाटते. तर या करारांमध्ये मनुष्यबळ आणि बौद्धिक गमनशीलता यांचाही अभिन्न अंग म्हणून सरलतेने समावेश करण्याची गरज आहे.

मित्रांनो!

चौथा प्रवाह आहे, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि प्रेम. वास्तविक हा प्रवाह नाही तर आमच्यासाठी आजच्या काळातली सर्वात महत्वाची आवश्यकता आहे. हवामान परिवर्तनाचा प्रभाव आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्व इतके व्यापक आहे की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही. आगामी काळामध्ये आपल्या ऊर्जा वापराच्या पॅटर्नमध्ये आणखी बदल होणर आहेत. कोळसा ते तेल आणि तेल ते गॅस आणि पुन्हा नंतर नवीकरणीय ऊर्जेकडे झुकण्याचा कल वाढत जाणार आहे. वापरली जाणारी ऊर्जा आणि ऊर्जा बचत हे दोन्हीला महत्व येणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा साठवणेही महत्वाचे ठरणार आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचे आव्हान दिवसेंदिवस वाढणार आहे. या गोष्टी लक्षात घेवून भारतामध्ये आम्ही गॅस आणि तेल या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. वर्ष 2024 पर्यंत तेल शुद्धीकरण, तेलवाहिन्या आणि गॅस टर्मिनल्स तयार करणे यासाठी 100 बिलियन डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. सौदी अरॅमकोने भारतामध्ये वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा मला आनंद होत आहे. हा अशियातला सर्वात मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प असणार आहे.  आम्ही अलिकडेच डाउन स्ट्रिमक्षेत्रामध्ये, विशेष करून रीटेलिंगमध्ये गुंतवणुकीचे नियम, कायदे अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये वाढ होवू शकणार आहे. याशिवाय आम्ही नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातून 450 गीगा वॅटपर्यंत वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था लक्षात घेता त्यासाठी ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी गरज निर्माण होणार आहे. म्हणूनच आज येथे उपस्थित असलेल्या ऊर्जा कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत आहे.

मित्रांनो!

आता शेवटचा प्रवाह परंतु हा काही अखेरचा आहे, असे म्हणता येणार नाही. पाचवा प्रवाह आहे तो सरकारच्या बदलत्या भूमिकेचा! मात्र या प्रवाहाचा भविष्यात व्यवसायांवर खूप व्यापक प्रभाव पडणार आहे. माझा जोर नेहमीच कमीतकमी शासन आणि जास्तीत जास्त प्रशासन यावर असतो. मला असं वाटतं की स्पर्धात्मक, नवसंशोधन आणि डायनामिक बिझनेस सेक्टर यांच्यासाठी एक  प्रोअॅक्टिव्हतसेच पारदर्शक सरकार चांगले फॅसिलेटेटरम्हणून भूमिका बजावू शकते. स्पष्ट नियम आणि फेअर सिस्टिमही प्रायव्हेट सेक्टरच्या वृद्धीसाठी आवश्यक असते. याच विचारातून आणि याच भूमिकेतून भारताने गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक मोठे आणि महत्वपूर्ण संरचनात्मक सुधारणा घडवून आणल्या आहेत. परकीय थेट गुंतवणूक धोरण सुगम आणि मुक्त केल्यामुळे आज भारत एक परकीय गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाचे स्थान बनला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतामध्ये 286 बिलियन डॉलर परकीय थेट गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक गेल्या 20 वर्षात भारतामध्ये जी एकूण परकीय थेट गुंतवणूक झाली त्याच्या जवळपास निम्मी आहे. नादारी आणि दिवाळखोरी कायदा असो किंवा देशव्यापी एक कररचना पद्धती असो आम्ही अवघडात अवघड निर्णय घेतले. आज भारताची कररचना आणि आयपीआर रेजिमची संपूर्ण जगामध्ये सर्वात चांगल्या बिझनेस रेजिमच्या बरोबर तुलना केली जाते. आम्ही अशा सुधारणा केल्यामुळे प्रत्येक वैश्विक क्रमवारीमध्ये भारत सातत्याने चांगले प्रदर्शन करीत आहे आणि क्रमवारीत सुधारणा दिसून येत आहे. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 10 अंकांची सुधारणा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 24 अंकांची सुधारणा, जागतिक बँकेच्या ईज ऑफ डुइंग बिझनेसक्रमवारीमध्ये 2014 या वर्षी आम्ही 142क्रमांकावर होतो, त्यामध्ये सुधारणा होवून आज, 2019 मध्ये 63व्या क्रमांकावर आलो आहोत. सुधारणा घडवून आणण्यामध्ये तीन वर्षे सातत्याने आम्ही दुनियेतल्या सर्वोच्च 10 देशांमध्ये आहोत. ज्या कायद्यांमुळे विकासकामे करण्यात अडचण येत होती, असे सर्व कायदे आमच्या सरकारने मोडीत काढले. भारतातले जुने-पुराणे 1500 नियम, कायदे पूर्णतः समाप्त केले आहेत.

मित्रांनो,

गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अतिरिक्त 350 दशलक्षपेक्षा जास्त लोकांना आम्ही बँकिंग सिस्टिममध्ये सहभागी करून घेतलं आहे. भारतामध्ये आज जवळपास प्रत्येक नागरिकाकडे यूनिक आय.डी., मोबाईल फोन आणि बँक खाते आहे.  या व्यवस्थेमुळे थेट लाभ हस्तांतरणामध्ये पारदर्शकता आली आहे. 20 बिलियन डॉलरपेक्षा जास्त निधीची गळती बंद करण्यात आम्हाला यश आले आहे. म्हणजेच 20 बिलियन डॉलरची आम्ही बचत केली आहे. आरोग्य सुविधा देणे हे कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. या क्षेत्रामध्ये गुणात्मक सेवा वृद्धीसाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. दुनियेतला सर्वात मोठा शासकीय आरोग्य सुरक्षा कार्यक्रम म्हणून आयुष्मान भारतही योजना आमच्या सरकारने सुरू केली आहे. भारतातल्या 500 मिलियन म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त लोक या योजनेचा लाभ घेवू शकत आहेत. इतकंच नाही तर या योजनेमुळे भारतातल्या आरोग्य क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या अमर्यादा संधी निर्माण झाल्या आहेत. आज भारत सर्वात मोठा आरोग्य सुरक्षा ग्राहक आणि गुणात्मक आरोग्य सुविधा पुरवठादारही आहे. आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोगाने जणू क्रांती आली आहे. यामुळे केवळ आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत असे नाही तर करोडो लोकांची उत्पादकताही वाढली आहे. 

मित्रांनो,

आज या व्यासपीठावरून मी आपल्याला विश्वास देवू इच्छितो की, भारताच्या या प्रगतीचा वेग आता आणखी वाढणार आहे. आम्ही देशाच्या विकासाशी संबंधित सर्व निर्णय तातडीने घेत आहोत. आमच्या नीतीमध्ये, धोरणांमध्ये कुठेही शंका, भ्रम नाही, आणि आम्ही जे लक्ष्य निर्धारण केले आहे, त्याविषयीही मनात साशंकता नाही. आम्ही पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे आणि त्यानुसार आवश्यक पथदर्शी कार्यक्रमही तयार केला आहे. हे लक्ष्य फक्त संख्यात्मक वृद्धीचे अजिबात नाही. तर प्रत्येक भारतीयाच्या जीवनामध्ये गुणात्मक फरक यावा, त्यांचा जीवनस्तर उंचावा, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही फक्त ईज ऑफ डुंईंग बिझनेसमध्ये नाही तर ईज ऑफ लिव्हिंगमध्येही सुधारणा करीत आहोत. राजकीय स्थिरता, अपेक्षित धोरण आणि बाजारपेठेतील वैविध्य या कारणांमुळे भारतामध्ये आपण जर गुंतवणूक केली तर सर्वात आधिक लाभदायक ठरणार आहे.

आमच्या मित्र देशांचे सहकार्य म्हणजे आमच्या विकास यात्रेचे अभिन्न अंग आहे. सर्व देशांना बरोबर घेवून पूरक धोरणाचा शोध घेवून आणि सर्वांना बरोबर घेताना तालबद्धतेने  वाटचाल करताना आम्ही विन-विन सोल्यूशनकाढण्यासाठी काम करीत आहोत. सौदी अरेबियाच्या व्हिजन 2030 आणि अर्थव्यवस्थेमध्ये विविधता आणण्याच्या योजनेसाठी आम्ही खांद्याला खांदा लावून वाटचाल करू इच्छितो.

मित्रांनो,

भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. आम्ही या वर्षापर्यंत नवभारतबनवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या नवीन भारतामधल्या प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यामध्ये नवीन स्वप्ने असतील, मनामध्ये या स्वप्नपूर्तीसाठी धाडस असेल, प्रबळ इच्छा असेल आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी पायातही नवीन ऊर्जा असेल. या नवीन भारतामध्ये नवे सामर्थ्य आणि नवीन क्षमता असतील.

मित्रांनो,

असा समर्थ आणि शक्तिमान भारत  फक्त आपल्यासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी शांती आणि उल्हासचा स्त्रोत असेल. ज्यावेळी संपूर्ण जगामध्ये भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, आणि लष्करी रूपामध्येही सबळ होता त्यावेळीही आम्ही कधीच कुणावर दडपण, दबाब टाकला नव्हता, कोणत्याही प्रकारे बळाचा वापर केला नव्हता, या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. भारताने आपल्या क्षमतांच्या बळावर जे काही मिळवलं, साध्य केलं, त्याची नेहमीच वाटणी केली, कारण आम्ही संपूर्ण विश्वालाच एक परिवार, एक कुटुंब मानले आहे - वसुधैव कुटुम्बकम्’!! नवी भारतामध्ये नवीन शक्ती असेल परंतु त्याच्या चिंतनातून पूर्वीचाच सनातन आत्मा प्रदर्शित होईल. आमचा विकास संपूर्ण विश्वात विश्वास निर्माण करणारा ठरेल. आमची प्रगती परस्परांमध्ये प्रेम वाढवेल. विश्व कल्याणाच्या या प्रवासामध्ये भारताबरोबर सहभागी होण्यासाठी मी आपल्याला, संपूर्ण विश्वाच्या व्यावसायिकांना आमंत्रित करीत आहे. मी आणि माझी टीम आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असणार आहे. आपण मला काही विचार मांडण्याची संधी दिली आणि माझे विचार अगदी लक्षपूर्वक ऐकले. यासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा एकदा क्राउन प्रिन्स यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करून आपल्या वाणीला विराम देतो. खूप-खूप

धन्यवाद!!

N.Sapre/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1590011) Visitor Counter : 99


Read this release in: English