भारतीय निवडणूक आयोग
शारीरिक दुर्बलतेमुळे मतदानाला उपस्थित राहू न शकणा-या नागरिकांना टपालाने मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोगाची योजना
Posted On:
28 OCT 2019 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2019
काही नागरिकांना शारीरिक दुर्बलतेमुळे मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नाही. अशा उपस्थित राहू न शकणा-या वयोवृद्ध तसेच दिव्यांग नागरिकांना टपालाने मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोग एक योजना तयार केली आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या मतदाराला अशा पद्धतीने टपालाने मत देता येणार आहे, याची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आले आहे. पात्र मतदाराची पडताळणी, त्यांची ओळख पटवणे, तसेच त्या विशिष्ट मतदारसंघातली अशी टपालाने आलेली मते, मोजणीच्यावेळी कशी एकत्रित करावयाची, याचीही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. साधारणपणे वयाची 80 वर्षे ओलांडणा-या पात्र मतदाराला तसेच शारीरिकदृष्ट्या पंगुत्व आलेल्या वयोवृद्धांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित व्हावे लागू नये, यासाठी निवडणूक आयोग ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भामध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत केंद्र सरकारने दि. 2 सप्टेंबर, 2019 रोजी काही शिफारसी केल्या होत्या, त्यावर निवडणूक आयोगाने आता कार्यवाही सुरू केली आहे.
आयोगाने तयार केलेल्या नियमावलीनुसार मतदार जर शारीरिकदृष्टीने मतदान केंद्रापर्यंत येण्यास असमर्थ असेल आणि मतदार जर वयोवृद्ध असेल तर मतदानाची ही सुविधा त्याला कुठंही मिळू शकणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे, या हेतूने ही सुविधा ज्येष्ठ मतदारांना देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने आता विविध नियमांमध्ये दुरूस्ती केल्या आहेत.
नियमांमध्ये केलेल्या सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत:
1. मतदानाला अनुपस्थित राहणारा मतदार म्हणजे नेमका कोण आहे, याची नेमकी व्याख्या करण्यात आली आहे.
2. अनुपस्थित मतदार म्हणजे ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार आहे परंतु त्यांना शारीरिक परिस्थितीमुळे मतदान करता येत नाही.
3. मतदार यादीमध्ये ज्यांचे नाव दिव्यांग म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे, त्यांचाही यामध्ये समावेश आहे.
4. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आता ‘अनुपस्थित मतदार’ या श्रेणीत येवू शकणार आहेत.
5. यासाठी नागरिकांना ‘फॉर्म 12 डी’ मध्ये आवश्यक ती माहिती सादर करण्याची आवश्यकता असेल.
6. अशा विशेष मतदारांना आता टपालाव्दारे मत नोंदवता येणार आहे. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि या अधिकारापासून कोणीही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, अशी भूमिका निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे या नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत.
S.Thakur/S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1589496)
अभ्यागत कक्ष : 274