पंतप्रधान कार्यालय

युरोपियन पार्लमेंटच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 28 OCT 2019 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2019

 

युरोपियन पार्लमेंटच्या सदस्यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताबरोबरचे संबंध महत्वाचे मानून कार्यकाळाच्या सुरुवातीलाच या सदस्यांनी भारताला भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

लोकशाही मूल्यांप्रती असलेली कटिबद्धता आणि हित या सामाईक मुद्यांवर भारताचे युरोपियन महासंघाशी संबंध आधारलेले आहेत. उचित आणि संतुलित बीटी आयए अर्थात व्यापक व्यापार आणि गुंतवणूक कराराला सकारचे प्राधान्य आहे. प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबत युरोपियन महासंघासमवेत संबंध बळकट करण्याची गरज व्यक्त करतानाच दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी घनिष्ठ आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्व पंतप्रधानांनी आधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या जागतिक भागिदार म्हणून होत असलेल्या वाढीचाही त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधानांनी या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केले आणि जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागांच्या या प्रतिनिधीमंडळाच्या भेटी फलदायी राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरला दिलेल्या भेटीमुळे या प्रतिनिधीमंडळाला जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागातल्या सांस्कृतिक, धार्मिक वैविध्य समजून घ्यायला मदत होईल, तसेच या भागातल्या विकासाचे आणि सरकार देत असलेल्या प्राधान्यांबाबत स्पष्ट चित्र जाणणे शक्य होईल.

व्यवसाय सुलभतेमध्ये भारताने जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेत 2014 मधल्या 142 व्या स्थानावरुन नुकतीच 63 व्या स्थानावर घेतलेली झेप त्यांनी ठळकपणे मांडली ही मोठी कामगिरी असल्याचे ते म्हणाले.

सर्व भारतीयांचे जीवनमान अधिक सुकर करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत, आयुष्मान भारत यासारख्या सरकारच्या महत्वाच्या कार्यक्रमांच्या यशस्वितेचा त्यांनी उल्लेख केले. क्षयरोग निर्मुलनासाठीच्या जागतिक नियोजित वेळेच्या पाच वर्ष आधीच म्हणजे 2025 पर्यंत भारतात क्षयरोग निर्मुलन करण्यासाठीच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. नवीकरणीय ऊर्जेसाठीचे विस्तारित उद्दिष्ट, एकदाच वापरता येण्याजोग्य प्लॅस्टिकच्या वापराविरोधात लोक चळवळीसह पर्यावरण रक्षण आणि जतन यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबाबतही त्यांनी माहिती दिली.

 

 

D.Wankhede/N.Chitale/D.Rane

 

 


(Release ID: 1589374)
Read this release in: English