पंतप्रधान कार्यालय

जम्मू-काश्मीरमधे सीमेवरच्या जवानांसमवेत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी

Posted On: 27 OCT 2019 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळातली परंपरा कायम राखत जम्मू-काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी केली. जम्मू-काश्मीरमधल्या जवानांबरोबर पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा दिवाळी साजरी केली आहे.

पंतप्रधानांनी राजौरी इथल्या ‘हॉल ऑफ फेम’ला भेट देऊन राजौरी आणि पूंछ सेक्टरमधे रक्षण करताना प्राणांचं बलिदान देणारे शूर सैनिक आणि धैर्यवान नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हॉल ऑफ फेम म्हणजे ‘पराक्रम भूमी, प्रेरणा भूमी, पावन भूमी’ असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यानंतर पंतप्रधानांनी पठाणकोट हवाईतळाला भेट देऊन हवाई दलातल्या सैनिकांची भेट घेतली.

दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर साजरी करण्यासाठी प्रत्येक जण दूरदूरचा प्रवास करतो, त्याचबरोबर आपणसुद्धा आपल्या शूर जवान आणि सशस्त्र दल या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवास केला आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

27 ऑक्टोबर 1947 ला सशस्त्र दलाने केलेल्या बलिदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. भारतीय संरक्षण दलाच्या जवानांच्या पराक्रमाची प्रशंसा करत त्यांच्यामुळे, अशक्यप्राय वाटणारे निर्णय घेणे केंद्र सरकारला शक्य झाल्याचे ते म्हणाले. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याची त्यांनी प्रशंसा केली. त्यांच्या या सेवेसाठी देशवासियांच्या वतीने पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

जवानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राजधानीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ, ही जवानांप्रती जनतेला असलेला आदर व्यक्त करते, असे ते म्हणाले.

देशाचे संरक्षण दल अधिक दृढ आणि आधुनिक करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबाबत त्यांनी माहिती दिली. सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

D.Wankhede/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1589373) Visitor Counter : 62
Read this release in: English