जलशक्ती मंत्रालय

पंतप्रधानांनी बापूजी आणि देशवासियांना स्वच्छ भारत मोहीम केली अर्पण

Posted On: 03 OCT 2019 2:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 रोजी स्वच्छ भारत मोहीम देशवासी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्पण केली.

गुजरातमधल्या अहमदाबाद येथे साबरमती नदीकिनारी उपस्थित असलेले देशभरातले 20 हजार स्वच्छाग्रही आणि सरपंच यांना पंतप्रधानांनी संबोधित केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हाती घेतलेल्या वर्तणूक बदल या सखोल कार्यक्रमाद्वारे भारतात उघड्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. 2014 मध्ये हा आकडा 600 दशलक्ष एवढा होता तो आता नगण्य झाला आहे. उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांचे 60 टक्के प्रमाण कमी करत भारताने एसडीजी-6 च्या जागतिक लक्ष्यात मोठा वाटा उचलला आहे.

2 ऑक्टोबर 2019 ला स्वच्छ आणि उघड्यावर शौचमुक्त भारत म्हणजे महात्मा गांधींना 150 जयंती दिनी दिलेली सर्वात समर्पक आदरांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वच्छता हे जन आंदोलन आणि लोक चळवळ करण्याच्या जागृतीसाठी स्वच्छाग्रहींनी केलेल्या कार्याला सलाम करत पंतप्रधानांनी उपस्थितांना अभिवादन केले.

हा कार्यक्रम साबरमती नदी किनारी होत असणे प्रातिनिधीक आहे कारण याच साबरमती आश्रमात बापूंनी सत्याग्रह आणि स्वच्छाग्रह यांना जन्म दिला, असे पंतप्रधान म्हणाले. स्वच्छग्रहाला मिळालेले यश म्हणजेच सत्याग्रहाला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती असल्याचे सांगून या दोन्ही चळवळी जन सहभागावर आधारित होत्या, असेही पंतप्रधान म्हणाले.

या मोहिमेला आतापर्यंत मिळालेले यश म्हणजे स्वच्छ भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असून आतापर्यंत मिळालेले यश कायम राखण्यासाठी ही निरंतर प्रक्रिया असेल, असेही त्यांनी सांगितले. या दिशेने जल जीवन मिशन हे आणखी एक पाऊल असून यासाठी सरकारने 3.5लाख कोटी रक्कम मंजूर केली आहे, असे ते म्हणाले. एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टीकला आळा घालण्यासाठी देशभरातल्या लोकांनी एकत्रित कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

संपूर्ण जग स्वच्छतेच्या संदर्भात मिळालेल्या यशाबद्दल भारताकडे पाहात आहे, असे सांगून गेटस् फाऊंडेशनद्वारा देण्यात आलेल्या ग्लोबल गोल किपर सन्मानामुळे भारत जगाच्या नकाशावर स्वच्छतेच्या बाबत अग्रणी बनला आहे, असे ते म्हणाले.

स्वच्छतेच्या प्रती पंतप्रधानांनी दाखवलेली कटिबद्धता आणि देशभरात या मोहिमेसाठी सरकारने स्वीकारलेले नेतृत्व हे लक्षणीय असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मान यावर होणाऱ्या या मोहिमेच्या सकारात्मक परिणामांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

ही मोहीम सुरू झाल्यापासून भारतातील ग्रामीण स्वच्छतेच्या व्याप्तीत मोठी वाढ झाली असून 2014 मध्ये 39 टक्के असलेले प्रमाण सप्टेंबर 2019 मध्ये 100 टक्क्यांवर पोहोचले आहे. या मोहिमेअंतर्गत एक कोटी घरांमध्ये शौचालयं उभारण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणून 35 राज्यं/केंद्रशासित प्रदेश, 699 जिल्हे आणि 5,99,963 गावे उघड्यावर शौचमुक्त झाली आहेत.

या कार्यक्रमासाठी देशभरातील 20 हजार सरपंच आणि स्वच्छाग्रही उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत प्रदर्शनाला भेट दिली. तसेच स्वच्छता गीताचा प्रारंभ केला. बापूंजींच्या 150 व्या जयंतीच्या स्मरणार्थ  काढण्यात आलेली टपाल तिकिट आणि नाण्यांचे विमोचनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. तसेच या मोहिमेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 जणांना पंतप्रधानांनी स्वच्छ भारत पुरस्कारही प्रदान केले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1587051) Visitor Counter : 154


Read this release in: English