पंतप्रधान कार्यालय

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधानांनी केले संबोधित

Posted On: 27 SEP 2019 7:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2019

 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्क इथे संबोधित केले.

महात्मा गांधी यांचा सत्य आणि अहिंसेचा संदेश आजही शांतता, प्रगती आणि जगाच्या विकासासाठी समपर्क असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, जनधन योजना, आधार यासारख्या जनकेंद्री उपक्रमांमुळे घडलेले परिवर्तन पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताने असे उपक्रम हाती घेतल्याने संपूर्ण जगासाठी ते आशादायी असते, असे पंतप्रधान म्हणाले.

एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्त होण्यासाठी भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी उल्लेख केला. प्रत्येक घराला पाणी, प्रत्येक कुटुंबाला घर आणि येत्या 5 वर्षात क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठीच्या सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी उच्चार केला.

भारतीय संस्कृतीवर भर देताना जनकल्याण हे आमच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून जन सहभागाद्वारे लोक कल्याण हा आपल्या सरकारचा मंत्र असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

130 कोटी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न हे संपूर्ण जगासाठीही लाभादायक ठरणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही केवळ आमच्या जनतेसाठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करत आहोत म्हणूनच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे आमचे ब्रीद वाक्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दहशतवाद हे जगासमोरचे मोठे आव्हान आहे, मानवतेच्या कल्याणासाठी सर्व जगाने दहशतवादाविरोधात एकवटण्याचे आवाहन त्यांनी सर्व राष्ट्रांना केले. भारताने जगाला युद्ध नव्हे, तर बुद्धांचा शांततेचा संदेश दिला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला.

बहुपक्षीय या संज्ञेला नवा आयाम देण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. जग एका नव्या युगातून जात आहे. विभाजित झालेले जग हे कोणाच्याच हिताचे नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित कृती करण्यासंदर्भात त्यांनी तमिळ तत्ववेत्ते कनियान पुंगुद्रनार आणि स्वामी विवेकानंद यांची वचने नमूद केली. सलोखा आणि शांतता हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उर्वरित जगाला संदेश आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात उर्त्सजनाचे दरडोई प्रमाण कमी असल्याने जागतिक तापमान वाढीत भारताचा वाटा कमी असला, तरीही जागतिक तापमान वाढीचे परिणाम रोखण्यात भारत आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, 450 गिगावॅट नवीकरणीय उर्जेचे उद्दिष्ट यांचा उल्लेख करुन हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासंदर्भात सरकारने उचललेल्या पावलांची त्यांनी माहिती दिली.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1586602) Visitor Counter : 93


Read this release in: English