माहिती आणि प्रसारण मंत्रालय

महात्मा गांधींच्या संकलित न झालेल्या चित्रिकरणाची 30 रीळ सापडले

Posted On: 27 SEP 2019 6:49PM by PIB Mumbai

मुंबई, 27 सप्टेंबर 2019

 

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला महात्मा गांधींच्या विनासंकलित चित्रिकरणाची 30 रीळे सापडली असून, त्यांचा कालावधी सुमारे 6 तासांचा आहे. ही 35 MM ची रीळ असून, त्या पॅरामाऊंट, वॉर्नर, युनिव्हर्सल, ब्रिटीश मुव्ही टोन, वाडीया मुव्ही टोन यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध स्टूडिओनी हे चित्रिकरण केले आहे.

एनएफएआयसाठी हा अतिशय छान खजिना असून, संपूर्ण जग महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करत असतांना हाती लागला आहे. यातील काही दृष्य अतिशय दुर्मिळ असून, इतर दृष्य लघुपट आणि माहितीपटांमध्ये समाविष्ट आहेत, असे एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम यांनी म्हटले आहे.


  

यापैकी अर्ध्या तासांचे चित्रिकरण महात्मा गांधींच्या अस्थी मद्रासहून रामेश्वरमला नेणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे आहे. यामध्ये हजारो लोक तामिळनाडूतल्या रेल्वे स्थानकांवर साश्रु नयनांनी महात्मा गांधींच्या अस्थींना वंदन करत असल्याचे दिसत आहे. महात्मा गांधींना शेवटची मानवंदना देण्यासाठी हातात झेंडे आणि फलक घेतलेला अथांग जनसमुदाय यात दिसत आहे.

या संग्रहामध्ये मणिलाल गांधी यांचे एक दृष्य आहे. महात्मा गांधींचे ते दुसरे सुपुत्र होते आणि ‘इंडियन ओपिनियन’ या गुजराती, इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक होते. महात्मा गांधींचा मुलगा या शिर्षकाखाली मणिलाल गांधी यांची दृष्य पाहायला मिळतात.

दुसऱ्या महत्वाच्या दृष्यामध्ये महात्मा गांधींचा दक्षिण भारत दौरा आणि जानेवारी-फेब्रुवारी 1946 मधील हरिजन यात्रा टिपली आहे.

या संग्रहामध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचा सेवाग्राम मधील विविध उपक्रमांमधल्या सहभागाचे दृष्य आहे. वृक्षारोपण, रुग्णसेवा आणि यंत्राद्वारे शेत नांगरणी करताना महात्मा गांधी दिसत आहेत. तर अन्य एका दृष्यात कस्तुरबा गांधी आश्रमातल्या एका गाईला चारा घालत असल्याचे दृष्य आहे.

या संग्रहालयातील अन्य एका दृष्यात महात्मा गांधी ‘एस.राजपुताना’ या जहाजातून इंग्लंडला दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जात असल्याचे पाहायला मिळते. जहाजावरील डेकवर महात्मा गांधी चरख्यावर सूत काढतांना एका दृष्यात दिसत आहेत. तर अन्य एका दृष्यात त्यांनी जहाजावरील कॅप्टनसह जहाजाचे नियंत्रण करत असल्याचे पाहायला मिळते.

महात्मा गांधींच्या अहमदाबाद, पोरबंदर आणि राजकोट दौऱ्याची काही दृष्य आहेत, यामध्ये त्यांचे घर, त्यांची शाळा आणि ग्रंथालयातल्या नोंद पुस्तिकेतील त्यांचे नाव पाहायला मिळते. यामध्ये महाराष्ट्रातलया श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमाला महात्मा गांधी उपस्थित असल्याचे दृष्य आहे.

या संग्रहामध्ये त्यांच्या शेवटच्या दिवसातली काही दृष्य आहेत. त्यांचे रक्ताळलेले कपडे, त्यांच्या पार्थिवाचे दर्शन, वृत्तपत्रातील बातम्या, बिर्ला हाऊस इथे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी आणि राजघाटावर अंतिम संस्कारासाठी नेत असल्याची काही दृष्य आहेत.

View image on Twitter

या संग्रहातील काही दृष्यांमध्ये वि.दा.सावरकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद आदी नेत्यांचेही दर्शन घडते. रविंद्रनाथ टागोर यांची महात्मा गांधींनी घेतलेली भेट पाहायला मिळते.

महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या शोक सभेचे दृष्यही या संग्रहालयात आहे.

ही सर्व रीळ चांगल्या स्थितीत असून, लवकरच त्यांचे डिजिटायझेशन करण्याचा विचार असल्याचे मगदुम यांनी सांगितले.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 


(Release ID: 1586502) Visitor Counter : 149
Read this release in: English