पंतप्रधान कार्यालय

न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या बरोबर पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक

Posted On: 26 SEP 2019 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र आम सभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क येथे 25 सप्टेंबर 2019 रोजी न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि जनतेतील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबाबत उपाययोजनांची चर्चा केली. मनीला येथे नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या बैठकीची आठवण दोन्ही नेत्यांनी काढली. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या ऑक्टोबर 2016 मधील भारत दौऱ्यानंतर नवीन संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्यात आली. ज्यामुळे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र आम सभेच्या पार्श्वभूमीवर 24 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित समकालीन काळात गांधीजींची प्रासंगिकता या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अर्डर्न यांचे आभार मानले.

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी, पंतप्रधान मोदी यांना ‘इंडिया 2022 - इन्व्हेस्टींग इन द रिलेशनशिप’ या नवीन धोरणात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय आणि विद्यार्थी हे दोन्ही देशांना जोडणारे महत्वाचे सेतू असल्याचे सांगत दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे अर्डर्न यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. या मुद्यांवर दोन्ही देशांचे एकमत असल्याबाबत त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही देशांनी पुलवामा आणि ख्राईस्टचर्च दशहतवादी हल्ल्यांचा निषेध केला आणि परस्परांना पाठिंबा दर्शवला. भारताने ख्राईस्टचर्चबाबत न्यूझीलंड आणि फ्रांसच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1586413) Visitor Counter : 97


Read this release in: English