पंतप्रधान कार्यालय

युएनजीएच्या 74व्या अधिवेशनात हवामान कृती परिषदेत पंतप्रधानाचे वक्तव्य

Posted On: 23 SEP 2019 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2019

नमस्कार

मान्यवर

जागतिक हवामान परिषदेच्या आयोजनासाठी मी, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मागच्या वर्षी ‘चॅम्पियन ऑफ ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघात माझे हे पहिलेच भाषण आहे आणि माझ्या न्युयॉर्क दौऱ्यादरम्यान, माझी पहिली बैठक हवामान या विषयावर होत आहे हे माझ्यासाठी खूपच सुखद आहे.

महोदय,

हवामान बदलाविषयी जगभरात अनेक प्रयत्न होत आहेत. परंतु आपल्याला हे मान्य करायला हवे की या कठोर आव्हानांचा सामना करण्यासाठी अजूनही आवश्यक तेवढे प्रयत्न केले जात नाहीत.

आज एका सर्वसमावेशक दृष्टीकोनाची गरज आहे, ज्यात शिक्षण, मुल्ये आणि जीवनशैलीपासून विकासात्मक तत्वज्ञानाचा देखील समावेश असला पाहिजे. आपल्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी एक विश्वव्यापी जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. निसर्गाचा सन्मान आणि नसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करणे हा आपल्या परंपरा आणि वर्तमान प्रयत्नांचा भाग आहे. लालसा नको हे आमचे मार्गदर्शक तत्व आहे आणि म्हणूनच भारत आज इथे या विषयावर केवळ चर्चा करायला नाही तर एक व्यावहारिक आराखडा आणि दिशादर्शक घेऊन आला आहे. छोटासा प्रयत्न हा मनभर उपदेशापेक्षा अधिक मोलाचा आहे यावर आमचा विश्वास आहे.

आम्ही भारतात इंधन मिश्रणात जीवाष्म नसलेल्या इंधनाचे प्रमाण वाढवत आहोत. आम्ही वर्ष 2022 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेतील आमची क्षमता वाढवून 175 गिगावॅटपर्यंत वाढवणार आहोत आणि नंतर ही क्षमता 450 गिगावॅट पर्यंत नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या परिवर्तन क्षेत्रात ई-मोबिलीटीला प्रोत्साहन देत आहोत. आम्ही पेट्रोल आणि डीझेल मध्ये जैवइंधन मिसळण्याचे प्रमाण वाढवत आहोत. 

आम्ही 150 दशलक्ष कुटुंबाना स्वयंपाकाच्या स्वच्छ गॅसचे कनेक्शन दिले आहे. आम्ही जल संवर्धन, पावसाच्या पाण्याची साठवण आणि जलसंपदा विकासासाठी मिशन जल जीवन सुरु केले आहे. आणि आगामी काही वर्षामध्ये या अभियानासाठी अंदाजे 50 बिलियन डॉलर खर्च करण्याची आमची योजना आहे.

महोदय,

आंतराष्ट्रीय व्यासपिठाविषयी जर बोलायचे असेल तर आमच्या आंतराष्ट्रीय सौर युती उपक्रमात अंदाजे 80 देश सहभागी झाले आहेत. भारत आणि स्वीडनने आपल्या इतर भागीदारांसोबत उद्योग रुपांतरणाची नोंद ठेवण्यासाठी एका नवीन नेतृत्व गटाची स्थापना केली आहे. हा उपक्रम सरकारी आणि खासगी क्षेत्रासोबत एकत्रित काम करून कमी कार्बन उत्सर्जनाचे मार्ग शोधून काढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

जागतिक पायाभूत सुविधा नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकाव्यात यासाठी भारत आपत्ती निवारक पायाभूत सुविधांसाठी युती करायला सुरुवात करत आहे. यात सहभागी होण्यासाठी मी सर्व सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करतो.

यावर्षी 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनी, प्लास्टिक मुक्त भारतासाठी आम्ही एक व्यापक आंदोलन सुरु करण्याचे आवाहन केले आहे. मला आशा आहे की, वैश्विक स्तरावर सुरु असलेल्या प्लास्टिक बंदीच्या कार्यक्रमाला यामुळे प्रोत्साहन मिळेल.

महोदय,

मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, युएनच्या या इमारतीत उद्या आपण भारताद्वारे लावण्यात आलेल्या सौर पॅनलचे उद्‌घाटन करणार आहोत. बोलण्याची वेळ आता संपली आहे; जगाने आता कृती करण्याची गरज आहे.

धन्यवाद, खूप खूप धन्यवाद!

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1586165) Visitor Counter : 122


Read this release in: English