गृह मंत्रालय
देशाची एकता आणि अखंडतेसाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराची केंद्र सरकारकडून घोषणा
Posted On:
25 SEP 2019 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019
देशाची एकता आणि अखंडतेसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने एक नवा पुरस्कार सुरु केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 20 सप्टेंबरला यासंदर्भातली अधिसूचना जारी केली.
राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांची यथोचित दखल घेऊन सन्मान करण्याच्या हेतुने हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीला म्हणजेच 31 ऑक्टोबर-राष्ट्रीय एकता दिवस-ला हा पुरस्कार घोषित केला जाईल.
राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांच्या वितरणासोबतच हा पुरस्कारही दिला जाईल. पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपतींच्या हस्ते सनद दिली जाईल.
या पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या समितीची स्थापना पंतप्रधान करतील, ज्यात कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, गृहसचिव आणि पंतप्रधानांनी निवडलेल्या मान्यवर व्यक्ती असतील.
एक पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. यासोबत कुठलीही रोख रक्कम दिली जाणार नाही. एका वर्षात 3 पेक्षा अधिक पुरस्कार दिले जाणार नाहीत. तसेच दुर्मिळ अपवाद वगळता हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही. कुठलीही भारतीय व्यक्ती अथवा संस्था या पुरस्कारासाठी कुठल्याही व्यक्तीची शिफारस करु शकेल, तसेच व्यक्ती स्वत: देखील स्वत:ची शिफारस करु शकतील. राज्य सरकारे, केंद्र शासित प्रदेश आणि सरकारची इतर मंत्रालये देखील या पुरस्कारासाठी शिफारस पाठवू शकतील. पुरस्कारासाठी दरवर्षी नामांकन मागवली जातील. गृहमंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन यासंदर्भातला अर्ज ऑनलाईन भरावा लागेल.
M.Chopade/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1586142)
Visitor Counter : 186