पंतप्रधान कार्यालय
ह्यूस्टन येथे झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला भारतीय समुदायाशी हृद्य संवाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील कायर्क्रमात सहभागी
Posted On:
22 SEP 2019 11:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2019
अमेरिकेतील टेक्सास मधल्या ह्यूस्टन येथील स्टेडियम मध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त भारतीयांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आज या मैदानावर नवा इतिहास आणि नवे समीकरण निर्मण झाले आहे. ‘आज इथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग आणि सिनेटर्सनी भारताच्या प्रगतीविषयी बोलणं म्हणजे 130 कोटी भारतीयांच्या कार्याचा केलेला सन्मानच आहे’ असे पंतप्रधान म्हणाले. इथे आज जाणवणारी ऊर्जा ही भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या एकत्रित ऊर्जेचेच प्रतीक आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
आजच्या कार्यक्रमाचे नाव ‘हाऊडी मोदी’ असे आहे. मात्र एकटे मोदी काहीही नाहीत. मी माझ्या देशातल्या 130 कोटी जनतेसाठी काम करणारी एक सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही विचारता-‘हाऊडी मोदी’ तेव्हा मी त्याचे उत्तर देईन की, भारतात सगळं काही छान आहे. पंतप्रधानांनी यावेळी “देशात सगळं छान सुरु आहे” हे वाक्य विविध भारतीय भाषांमध्ये म्हटले. ही सांस्कृतिक विविधताच भारताच्या जिवंत लोकशाहीची ताकद आहे असे पंतप्रधान म्हणाले.
आज नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही सगळे कटिबद्ध असून त्यासाठी अविरत कष्ट करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले. नवा आणि उत्तम देश घडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत असे त्यांनी सांगितले. भारत आव्हानांना दूर सारत नाही तर त्यांचा समोरासमोर सामना करतो. आज आम्ही तात्पुरते बदल करत नाही तर समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काम करतो आहोत आणि अशक्य ते साध्य करतो आहोत. असे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात रालोआ सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी मांडला. गेल्या पाच वर्षात 300 कोटी भारतीयांनी अशा गोष्टी साध्य केल्या आहेत ज्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. आम्ही आमची उदिृष्टे उच्च ठेवली आहेत आणि ती साध्यही करतो आहोत. भारतातल्या प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचवणे, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा, रस्ते बांधणी, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सुविधा पोहोचवणे अशी कठीण उदिृष्टे आम्ही साध्य केली आहेत असे मोदी यांनी सांगितले.
भारतीय जनतेचे जीवनमान सुकर करण्याप्रतीच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन्ही गोष्टींसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. यात कालबाह्य निरुपयोगी कायदे रद्द करणे, सेवांच्या अंमलबजावणीत सुधारणा, स्वस्त दरात इंटरनेट सुविधा, भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई आणि वस्तू आणि सेवा कर लागू करणे अशा उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक भारतीयापर्यंत विकासाची फळं पोहोचतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. असा महत्वाचा निर्णय दृढ इच्छाशक्तीने घेणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे उभे राहून अभिनंदन करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना केले. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखची जनता विकास आणि प्रगतीपासून वंचित राहिली होती. आज जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेलाही इतर सर्व भारतीयांप्रमाणे समान अधिकार मिळाले आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1585846)
Visitor Counter : 207